Tuesday, February 17, 2015

जनावरांच्या आहारात असावीत योग्य पोषकद्रव्ये

दुभत्या जनावरांमध्ये दुधाद्वारा शरीरातील क्षार व इतर घटकांचा विनिमय होत असतो. या क्षारांची कमतरता झाल्यास दुभत्या जनावरांना आजार होतात. हे लक्षात घेता दुभत्या जनावरांच्या आहारात योग्य प्रमाणात खनिजद्रव्ये असावीत. 

पशुखाद्यातील आवश्‍यक पोषकमूल्यांमध्ये प्रथिने, कार्बोदके, खनिजे, जीवनसत्त्वे यांचा समावेश होतो. त्यामध्ये एकूण 22 खनिजे व जीवनसत्त्वे जनावरांच्या आरोग्यासाठी आणि शारीरिक वाढीसाठी आवश्‍यक आहेत. त्याचबरोबर जनावरांमध्ये रोगप्रतिकारशक्ती टिकवणे, प्रजनन सातत्य राखणे, याकरिता आवश्‍यक संप्रेरकासाठी खनिजे व जीवनसत्त्वे आवश्‍यक आहेत. 
1) योग्य पोषणआहार न दिल्यास गर्भाशयाची वाढ अपुरी होते, प्रथम वेताचे वय वाढते. कालवडी किंवा पारड्या लवकर वयात येत नाहीत. माजावर न येणे, मुका माज असणे, फलित गर्भ मरणे, वारंवार उलटणे या प्रक्रिया सुरू होतात. 
2) प्रथिनांच्या कमतरतेमुळे जननक्षमता कमी होते. कर्बोदकांच्या कमतरतेमुळे शरीराची योग्य प्रमाणात वाढ होत नाही. गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते. गायी, म्हशी उलटतात. 
3) मोठ्या प्रमाणात लसूण घास व बरसीम, चवळी, गवार हे सर्व चारा स्वरूपात दिल्यास अशा चाऱ्यात वनस्पती इट्रोजन असल्यास म्युकोमेट्रा हा आजार होतो. 
4) तांदळाचा भेंडा, नेपिअर, उसाचे वाढे या चाऱ्यांमध्ये ऑक्‍झालिक ऍसिडचे प्रमाण जास्त असल्याने त्याची जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमबरोबर रासायनिक क्रिया होऊन कॅल्शियम ऑक्‍झलेट तयार होते, त्यामुळे जनावरांना कॅल्शियम मिळत नाही. याचा परिणाम म्हणजे जनावरांचे मायांग बाहेर पडणे, जार अडकणे, गर्भाशयाचा ताठरपणा कमी होणे, उशिरा गर्भाशय पूर्वस्थितीवर येणे व गायी-म्हशी वारंवार उलटणे या विकृती निर्माण होतात. 

अ) जीवनसत्त्वे ः 
स्निग्ध विद्राव्य जीवनसत्त्वे (ए, डी, ई, के) ही सर्व यकृतामध्ये साठवली जातात. 
1) जीवनसत्त्व अ ः जीवनसत्त्व "अ'मुळे जनावरांच्या पचनसंस्थेच्या अवयवांचा आतील स्तर चांगला राहण्यास मदत होते. शारीरिक वाढीसाठी आवश्‍यक असते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे अथवा अभावामुळे वार न पडणे, जनावर उशिरा माजावर येणे, स्त्रीबीजांड बाहेर पडण्याची क्रिया लांबते. मुका माज असे दोष दिसून येतात. 
उपलब्धता ः हिरवा मका, हिरवे गवत. 
2) जीवनसत्त्व ड ः जीवनसत्त्व "ड' हे कॅल्शियम व स्फुरदाचे रक्तात सुलभ रूपांतर होण्यासाठी आवश्‍यक असते. 
उपलब्धता ः जनावरे दररोज काही काळ उन्हात बांधावीत. वाळलेल्या गवतातून भरपूर प्रमाणात मिळते. 
3) जीवनसत्त्व ई ः जीवनसत्त्व ई व सेलेनियमचा संयुक्त पुरवठा केल्यास जनावरे उलटण्याचे प्रमाण कमी होते. जनावरे माजावर येतात. 

अ) खनिजांच्या कमतरतेची लक्षणे ः 
1) कॅल्शियम ः 
1) व्याल्यानंतर गर्भाशय पूर्ववत होण्यास विलंब होतो. 
2) प्रोजेस्टेरॉन कमी श्रवते. 
3) स्त्रीबीजांडावर गाठी येतात. 
4) वार अडकतो. 
- अधिक कॅल्शियममुळे फॉस्फेरस , मॅंगेनिज, झिंक, कॉपर यांच्या शोषणात अडथळा निर्माण होतो. 

2) फॉस्फरस ः 
1) जननक्षमता कमी होते, तसेच ऋतुचक्रात अनियमितता दिसून येते. 
2) स्त्रीबीजांड अकार्यक्षम राहते. 
3) माजावर न येणे. 
4) उशिरा वयात येणे. 
5) मृत वासरे जन्मतात किंवा जन्मतःच अशक्त असतात. 

3) मॅगेनीज ः 
1) माजावर न येणे. 
2) गर्भपात. 
3) वासरांच्या पायांच्या नसा आखडलेल्या असतात. 

4) कॉपर (तांबे) ः 
1) जननक्षमता कमी होणे. 
2) माजावर न येणे. 
3) वीर्य निकृष्ट दर्जाचे होणे. 

5) कोबाल्ट ः 
1) जनन क्षमता कमी. 
2) कालवडी उशिरा वयात येतात. 
3) गर्भपात. 
4) अकार्यक्षम ग्रंथी. 
5) अशक्त वासरे जन्मतात. 

6) आयोडीन ः गर्भाची योग्य वाढ व शारीरिक क्रिया सामान्य ठेवण्यासाठी आवश्‍यक असते. याच्या कमतरतेमुळे खालील परिणाम दिसतात. 
1) स्त्रीबीजांडाची विकृती. 
2) अकार्यक्षम बीजांड. 
3) वार अडकणे. 
4) गायी-म्हशी उलटणे. 
5) केस नसलेले वासरू जन्मास येणे. 
6) कमी प्रतीचे वीर्य तयार होणे. 

7) सेलेनियम ः 
1) वार न पडणे, मुका माज, शुक्राणूंची हालचाल मंदावतात. 
2) गर्भपात होणे. 
3) मृत वासरास जन्म देणे. 

8) झिंक ः व्याल्यानंतर गर्भाशय पूर्ववत करण्यास अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून झिंक कार्य करते. कमतरतेची लक्षणे ः 
1) स्त्रीबीजांडावर गाठी. 
2) लवकर वयात न येणे. 
3) माज अनियमित. 
4) नरामध्ये लैंगिक पैशींची वाढ न होणे. 
5) विर्याची प्रत घटणे. 
6) वृषणाचा आकार कमी होतो. 

9) मॅग्नेशियम ः 
1) भूक मंदावणे. 
2) वजन कमी होणे. 
3) संप्रेरके मंदावतात. 

10) क्रोमीअम ः 
1) स्त्रीबीजांड वाढ न होणे. 
2) अपुरे ल्युटीनायझिंग हार्मोनची निर्मिती. 

11) सोडियम व पोटॅशियम ः 
1) सोडियमच्या अभावामुळे शरीरात प्रथिने व ऊर्जेचे योग्य शोषण होत नाही. 
2) पोटॅशियमच्या अभावामुळे मांसपेशीक्षमता कमी होते. प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. 

12) मॉलिब्डेनम ः 
1) प्रजनन संस्थेचे कार्य बिघडते. 
2) प्रजनन इच्छा कमी होते. 
3) नरामध्ये शुक्राणू संख्येचे प्रमाण कमी तसेच वंध्यत्व. 
4) माज उशिरा दाखवणे. 
5) गर्भधारणेचे प्रमाण कमी. 

---------------- 
इन्फो ः 
खनिजांचा दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर होणारा परिणाम ः 
दुभत्या जनावरांमध्ये दुधाद्वारा शरीरातील क्षारांचा व इतर घटकांचा विनिमय होत असतो, याची कमतरता झाल्यास दुभत्या जनावरांना आजार होतात. हे लक्षात घेता दुभत्या जनावरांच्या आहारात खनिजद्रव्यांचे योग्य प्रमाण असावे. 
मुख्य खनिजे ः कॅल्शियम, फॉस्फरस मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम इ. 
अल्पप्रमाणात लागणारी खनिजे ः लोह, तांबे, झिंक, सेलोनियम, मॉलिब्डेनम इ. 
1) कॅल्शियम जनावरांच्या शरीरात सर्वाधिक प्रमाणात असते. शरीरात कॅल्शियमचे प्रमाण 1.30-1.35 टक्के एवढे असते. यामुळे दुधनिर्मितीचे कार्य व्यवस्थित चालते. 
2) याच्या कमतरतेमुळे दुधाळ जनावरात दुग्धज्वर यासारखे आजार होतात. 
3) हा आजार जनावर व्याल्यानंतर 24 ते 72 तासांनंतर आढळून येतो. 
4) हा आजार प्रामुख्याने तिसऱ्या-चौथ्या वेतानंतर हिवाळ्यात अधिक प्रमाणात दिसतो. याचे मुख्य कारण म्हणजे दुधाद्वारा कॅल्शियमचा जास्त प्रमाणात निचरा होणे, चाऱ्यात कॅल्शियमचे प्रमाण कमी असणे आणि "ड' जीवनसत्त्वाचा अभाव हे आहे. 
उपाययोजना ः 
1) रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण तपासून निश्‍चित निदान करावे. 
2) प्रमाण कमी असल्यास पशुवैद्यकाकडून ताबडतोब कॅल्शियमयुक्त व इतर औषधे शिरेतून द्यावीत. 
3) पौष्टिक आहार व स्वच्छ पाणी द्यावे. 
4) प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दुधाळ जनावरांना दररोज 30-50 ग्रॅम कॅल्शियमयुक्त क्षार मिश्रण द्यावे. थंडीपासून संरक्षण करावे. 

खाद्य घटकातील खनिजे ः 
संपर्क ः 02189-233001 
कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर.

Friday, January 30, 2015

हायड्रोपोनिक्‍स तंत्राने करा हिरव्या चाऱ्याची निर्मिती

हायड्रोपोनिक्‍स तंत्राद्वारे उत्पादित केलेला हिरवा चारा हा पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या हिरव्या चाऱ्यापेक्षा सकस असतो. चाराटंचाई परिस्थितीत कमी खर्चामध्ये हिरवा चारा निर्मितीचा हा चांगला पर्याय आहे. प्रा. कपिल इंगळे 
1) हायड्रोपोनिक्‍स चारा तयार करण्यासाठी बांबू, तट्या, प्लॅस्टिक ट्रे, 50 टक्के क्षमतेचे शेडनेट, मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर सिस्टिम व टायमर यांची गरज असते. 
2) या साधनसामग्रीचा वापर करून 72 स्क्वेअर फूट जागेत बसेल असा 25 फूट x 10 फूट x 10 फूट आकाराचा सांगाडा अवघ्या 15 हजार रुपये खर्चात तयार होतो. 
3) यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवा चारा तयार करता येतो. 
4) चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली याचा वापर केला जातो. धान्याला ई.एम.च्या द्रावणात बीजप्रक्रिया करावी लागते. 
5) हे धान्य 12 तास भिजत ठेवून, 24 तास गोणपाटात अंधाऱ्या खोलीत ठेवावे. 
6) त्यानंतर प्लॅस्टिक ट्रेमध्ये (3 फूट x 2 फूट x 3 इंच ) साधारणतः 1.5 ते 1.75 किलो बी पसरावे. 
7) अशा प्रकारे प्रतिदुभत्या जनावरांना दहा ट्रे या प्रमाणे जनावरांच्या संख्येवरून ट्रेची संख्या ठरवावी. 
8) हे प्लॅस्टिक ट्रे हायड्रोपोनिक चारा निर्मिती गृहात सात ते आठ दिवस ठेवावेत. 
9) एक इंची विद्युत मोटारीला लॅटरलची जोड देऊन फॉगर पद्धतीद्वारे प्रत्येक दोन तासाला पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून सात वेळा पाणी द्यावे. एका दिवसासाठी 200 लिटर पाणी लागते. ही यंत्रणा स्वयंचलित आहे. पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न हायड्रोपोनिक्‍स चाऱ्यास पाणी देता येते. 
10) चाऱ्याची 7 ते 8 दिवसांत 20 ते 25 सें.मी. उंचीपर्यंत वाढ होते. साधारणपणे एक किलो गव्हापासून नऊ किलो, तर एक किलो मक्‍यापासून 10 किलो हिरवा चारा तयार होतो. 

चारा देण्याचे प्रमाण - - भाकड जनावरे 6 किलो प्रतिदिवस प्रतिजनावर. 
- दुभती जनावरे 15 किलो प्रतिदिवस प्रतिजनावर.

हायड्रोपोनिक्‍स चाऱ्याचे फायदे - 1. चारा टंचाई परिस्थितीत हिरवा चारा निर्मितीचा चांगला पर्याय. 
2. कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक चारानिर्मिती. 
3. जनावरांना 90 टक्के चारा पचतो. 
4. पशुखाद्याचा खर्च 40 टक्के कमी. 
5. जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ. 
6. दुधाच्या फॅटमध्ये वाढ. किमान अर्धा लिटरने दुधात वाढ. 
7. जनावरांची प्रजनन क्षमता सक्षम होते. 
8. जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वाच्या उपलब्धतेत वाढ. 
9. जमिनीवर चारा उत्पादन घेण्याच्या तुलनेत 5 ते 10 टक्के पाण्याची आवश्‍यकता आहे. 
10. प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटीऑक्‍सिडंट्‌स, फॉलिक ऍसिड, ओमेगा-3, स्निग्ध पदार्थ हरितद्रव्य मोठ्या प्रमाणात असतात. 

प्रा. कपिल इंगळे 8380984068 
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे विषय विशेषज्ञ (कृषी विद्या) म्हणून कार्यरत आहेत.) 

Monday, September 22, 2014

शिराळा (जि. सांगली) येथील 35 शेतकरी करतात ऍझोलानिर्मिती

पशुपालनामध्ये सर्वांत महत्त्वाचा व मोठा खर्च हा पशुखाद्याचा असतो. हा खर्च मर्यादित ठेवताना जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. अशा वेळी ऍझोलासारखे आरोग्यदायी पूरक खाद्य पशुखाद्यात फायदेशीर ठरते. शिराळा (जि. सांगली) येथील 35 पेक्षा अधिक शेतकरी ऍझोलानिर्मिती व सातत्यपूर्ण वापर करत आहेत. श्‍यामराव गावडे 
सांगली जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील शिराळा तालुक्‍यामध्ये शेती ही डोंगरकपारीमध्ये केली जाते. डोंगरावरील गवताचा लाभ घेत अनेक शेतकरी जोडीला पशुधन सांभाळतात. पशुधन जपण्यासाठी त्यांच्या खाद्य व्यवस्थेमध्ये ऍझोलासारख्या शैवाल वर्गीय वनस्पती वापर वाढविण्यासाठी तालुका पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्‍यात रेड, उपळावी, मांगले, बिऊर परिसरात 35 शेतकऱ्यांनी ऍझोलानिर्मितीची युनिट उभी केली आहेत. यांतील ऍझोलाचा वापर दुधाळ जनावरांच्या खाद्यामध्ये पूरक केला जात आहे. बियाणे म्हणून ऍझोला महाराष्ट्रासह कर्नाटकातील लोकांनी नेला आहे. 

अशी झाली सुरवात शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पशुसंवर्धन विभागातील डॉ. शिवराज पवार हे प्रशिक्षणासाठी गेले होते. या प्रशिक्षणामध्ये ऍझोलाचे फायदे व त्याची निर्मिती या संदर्भात माहिती मिळाली. शिराळा तालुक्‍यामध्ये ऍझोलाचा पशुखाद्यात वापर वाढल्यास शेतकऱ्यांच्या लाभात वाढ होऊ शकते, या उद्देशाने विभागामार्फत ऍझोला निर्मिती व प्रसार सुरू केला. सुरवातीला शिरवळ येथून 200 रुपये प्रति किलोप्रमाणे ऍझोला बियाणे आणले. 

ऍझोला काय आहे... - ऍझोला ही पाण्यावर वाढणारी शैवालवर्गीय वनस्पती आहे. 
- झाडाच्या सावलीत, छपरात, बाहेर थोडीशी सावली करून ऍझोला वाढवता येते. 
- जनावरांच्या खाद्यामध्ये त्याचा पूरक म्हणून वापर करता येतो. तसेच भातशेतीमध्ये खत म्हणून गाडल्यास त्यातून नत्र उपलब्ध होते. 
- शुष्क ऍझोलामध्ये 25 ते 35 टक्के प्रथिने असून, खनिजांचे प्रमाण 10 ते 15 टक्के असते. अमिनो आम्ले 7 ते 10 टक्के असतात. हे जनावरांसाठी पचनाला हलके असून, अन्य चाऱ्यांच्या पचनाला मदत करते. 

अशी करता येते ऍझोला निर्मिती - घराच्या अंगणात, परसदारात साधारणपणे सावली असलेल्या ठिकाणी किमान नऊ फूट लांब व सहा फूट रुंद व नऊ इंच खोलीचा खड्डा करून घ्यावा. सावली नसल्यास 50 टक्के सावलीचे शेडनेटचे आच्छादन करून घ्यावे. 
- तळाची बाजू समपातळीत करावी. त्यातील प्लॅस्टिक फाटू नये या उद्देशाने खडे, दगड काढून घ्यावेत. त्यावर पॉलिथिनचा पेपर पसरावा. काठाकडील बाजूला दुमडून त्यावर छोटे दगड ठेवावेत. 
- खड्ड्यामध्ये पॉलिथिन पेपरवर चांगल्या चाळलेल्या मातीचा अडीच ते तीन इंचाचा एक थर द्यावा. 
- वरील सहा इंच उंचीपर्यंत पाण्याने तो खड्डा भरावा. 
- त्यामध्ये एक ते दोन किलो शेण, तीस ग्रॅम सिंगल सुपर फॉस्पेट यांचे मिश्रण खड्ड्यात ओतावे. 
- या पाण्यावर साधारण एक किलो ऍझोला बियाणे सोडावे. 
- ऍझोलाची वाढ होऊन साधारणपणे आठ ते दहा दिवसांत ऍझोलाने वाफा भरतो. 
- दररोज त्यातील ऍझोला काढून जनावरांच्या पशुखाद्यासोबत द्यावा. एका जनावराला साधारणपणे अर्धा ते एक किलो ऍझोला दिल्यास फायदा होतो. 
- ऍझोला निर्मितीमध्ये इएम सोल्युशन आणि खनिज मिश्रणाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास अधिक फायदा होतो. 

* पशुसंवर्धन विभागाचे सहकार्य शिराळा तालुका पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने सुरवातीला शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून ऍझोलानिर्मितीकडे वळवले. कामधेनू योजनेतून प्लॅस्टिक कागदखरेदीसाठी पैसे दिले. 
- पशूधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. सुहास देशपांडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. शिवराज पवार यांनी ऍझोलानिर्मिती व वापरासंदर्भात वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 
- आता शेतकरी स्वतः तयार होत असून, ऍझोलावाढीतील विविध टप्प्यांतील कामे स्वतः करत आहेत. शिराळा तालुक्‍यात रेड, उपळावी, मांगले, बिउर, परिसरात 25 हून अधिक शेतकऱ्यांनी ऍझोलानिर्मितीची युनिट साकारली आहेत. 

* ऍझोलाचा कर्नाटकातही प्रसार - शिराळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ऍझोलानिर्मितीची माहिती ऐकून कर्नाटकातील उगार येथील शेतकरी दीपक शिंदे यांनी येथील बियाणे नेले आहे. कर्नाटकात ऍझोला तयार केला आहे. 
- रेड हे गाव रस्त्यालगत असल्याने महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनीही ऍझोलाचे बियाणे नेले आहे. शिराळा परिसरातील शेतकरी बियाणे म्हणून ऍझोला देताना मोफत देतात. 

यांना झाला फायदा 1) एक वर्षापूर्वी ऍझोलानिर्मिती सुरू केली. शेतात झाडाच्या सावलीत खड्डा केला आहे. माझ्याकडे चार जनावरे असून, त्यांतील दुभत्या जनावरांसाठी ऍझोला पूरक खाद्य म्हणून वापरतो. फॅटमध्ये फरक पडला आहे. तसेच दुधामध्येही अर्धा ते एक लिटरची वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना मी बियाण्यासाठी ऍझोला दिला आहे. 
- दिनकर निवृत्ती पाटील ( मो 9657811615) 

2) सध्या माझ्याकडे नऊ जनावरे आहेत. ऍझोलाचे एक युनिट आहे. मात्र, ते कमी पडत असल्याने वाढविण्याचा विचार आहे. ऍझोला पूरक खाद्यामुळे जनावरे माजावर येण्यासही मोठी मदत होते. त्यात फक्त पाणी बदलणे, शेण व फॉस्फेटचे मिश्रण टाकणे, ही कामे करावी लागतात. 
- अशोक राजाराम पाटील (मो. 9887428545) 

3) मी खड्डा न काढता अंगणातील स्लॅबवर विटा व पॉलिथीन पेपरच्या साह्याने हे युनिट केले आहे. आमच्याकडे आठ जनावरे आहेत. पाण्यातून चाळणीने ऍझोला काढून जनावरांच्या खाद्यात मिसळला जातो. ऍझोला फायदेशीर वाटत आहे. 
- सूरज दिलीप पाटील 

ऍझोलाचे फायदे -निर्मितीखर्च 9 बाय 6 खड्ड्यासाठी अंदाजे पाचशे रुपये. 
- जनावरांना पूरक खाद्य म्हणून उपयोगी. पचनास हलके. 
- दूध देणाऱ्या जनावरात दुधात अर्धा ते एक लिटरची वाढ. 
- जनावरे माजावर येण्याचे प्रमाण चांगले. 
- दूध उत्पादनखर्चात 10 टक्‍क्‍यांनी बचत. 

या अडचणी येऊ शकतात - उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ऍझोलाचा रंग हिरवट तांबडा किंवा विटकरी होतो. त्याच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच गारव्याला कुत्रे व अन्य प्राणी येऊन बसतात. त्यांच्यासाठी बाजूने खांब रोवून दोरी अथवा कापड लावून घ्यावे. 
- झाडाखाली खड्डा केला असल्यास पालापाचोळा पडून कुजल्याने ऍझोला खराब होऊ शकतो. त्यासाठी वरून आच्छादन आवश्‍यक. 
- शेण उपलब्ध उपलब्ध आहे, म्हणून अधिक वापर होतो. त्यामुळे अमोनिया निर्माण होऊन त्याचा वास ऍझोलाला येतो. योग्य प्रमाणातच शेणखत टाकावे. 
- पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यामध्ये बाहेरून पाणी येऊन ऍझोला वाहून जाऊ शकतो. अधिक पावसाच्या ठिकाणी अधिक उंचावर करावे किंवा विटाच्या साह्याने 9 इंची टाकी करावी. 

डॉ. सुहास देशपांडे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) - 9423267309 
- डॉ. शिवराज पवार, पशुधन विकास अधिकारी - 9665507510