Tuesday, November 12, 2013

आठ तरुणांनी यशस्वी केला दुग्ध व्यवसाय

एकत्र आलो अन दुग्धव्यवसायातून प्रगती झाली.. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सासोली, कुडासे (ता. दोडामार्ग) या गावांमधील आठ तरुणांनी एकमेकांना साहाय्य करीत धवलक्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे. परिसरातील बाजारपेठेचा अभ्यासकरीत टप्प्याटप्प्याने या युवकांनी दुग्धोत्पादनातून आर्थिक प्रगती साधली. गेल्या तीन वर्षांतील त्यांची ही प्रगती इतरांना प्रेरणा देणारी आहे. शिवप्रसाद देसाई 
सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या रांगामध्ये गोव्याच्या हद्दीला लागून असलेली सासोली आणि कुडासे ही नारळ, सुपारी बागायती असलेली गावे. या भागातील बहुसंख्य कुटुंबांचे भात, नारळ-सुपारीचे लागवड क्षेत्र मर्यादित असल्यामुळे मुंबई-गोव्यात नोकरी हा अर्थार्जनाचा मुख्य स्रोत. अशा या पारंपरिक मानसिकतेला छेद देत या गावातील मनोज गवस, अनिरुद्ध फाटक, सज्जन धाऊसकर, चिंतन सिद्धये, आनंद घाडी, समीर ठाकूर, रामकृष्ण ठाकूर आणि अरुण नाईक या तरुणांनी पशूपालनामध्ये स्वतःचे "करिअर' घडविले. आत्मविश्‍वास आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. 

आम्ही एकत्र आलो... सन 2010 मध्ये "लुपिन फाउंडेशन' या सेवाभावी संस्थेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन कार्यशाळा आयोजित केली होती. नोकरीच्या शोधात असलेले हे तरुण कार्यशाळेमध्ये सामील झाले. यातून त्यांना पशूपालनाचा मार्ग दिसला. प्रशिक्षणातून हे समविचारी तरुण एकत्र आले. त्यांच्या गावापासून गोवा राज्य पाच किलोमीटरवर असल्याने दुधाला चांगली बाजारपेठही उपलब्ध होती. याचा अंदाज घेऊन पहिल्या टप्प्यात प्रयोग म्हणून "नाबार्ड'च्या योजनेतून "लुपिन'च्या मार्गदर्शनाने एक - दोन होल्स्टिन फ्रिजियन गाई घेण्याचा निर्णय या तरुणांनी घेतला. गेल्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने या तरुणांच्या गोठ्यातील दोन गाईंची संख्या 13 ते 20 गाईंपर्यंत पोचली आहे. 

दुग्धव्यवसायातून साधली आर्थिक प्रगती... दुग्धव्यवसायाबाबत माहिती देताना सासोली गावातील मनोज रामचंद्र गवस म्हणाले, की घरची दोन एकर भातशेती, थोडी नारळ, सुपारीची झाडे आहेत. शेती सांभाळात पहिल्यादा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला; परंतु त्यामध्ये म्हणावा तसा नफा मिळत नव्हता. याच दरम्यान कार्यशाळेतून दुग्धव्यवसायाची माहिती मिळाली. बाजारपेठेचा अभ्यास करून सन 2010 मध्ये पहिल्यांदा एक जर्सी आणि एक होल्स्टिन फ्रिजीयन गाय जिल्हा बॅंकेच्या कर्ज योजनेतून खरेदी केली. या काळात परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांशी संपर्क वाढविला. त्यांच्याकडून गाईंच्या व्यवस्थापनाची माहिती घेतली. गटातील मुलांच्या बरोबरीने चर्चा करून गाईंचे व्यवस्थापन ठेवले. पाच-सहा महिन्यांत दुग्धव्यवसायातून मिळणारा नफा पाहिल्यानंतर गाईंची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. गाईंना पुरेसा हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी दोन एकरांवर चारा पिकांची लागवड केली. 

असे आहे गाईंचे व्यवस्थापन - 1) गाईंच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी 30 मीटर लांब आणि 10 फूट रुंदीचा हवेशीर गोठा बांधला. गाईंना चारा कुट्टी खाता येईल आणि पाणी पिता येईल अशी गव्हाण बांधली. गोठा धुतलेले पाणी, गोमूत्र वाहून जाण्यासाठी कडेला नाली बांधली. नालीतून हे पाणी गोठ्याबाहेरील खड्यात जमा होते. ही शेण, गोमूत्राची स्लरी शेतकऱ्यांना विकली जाते. 
2) खाद्य साठवणुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. सहा महिने पुरेल ऐवढे भात पिंजार, कडबा साठविला जातो. चारा कुट्टीसाठी यंत्र आहे. 
3) सध्या गोठ्यात 16 होल्स्टिन फ्रिजियन आणि चार जर्सी गाई आहेत. त्यातील 15 गाई दुधावर आहेत. 
4) सकाळी चार वाजता गाई आणि गोठा धुऊन गाईंना पशुखाद्य दिले जाते, यंत्राने धारा काढल्या जातात. त्यानंतर चारा कुट्टी दिली जाते. चारा संपल्यानंतर गव्हाण साफ करून पाणी पाजले जाते. त्यानंतर गाई रवंथ करतात. 
5) एक होल्स्टिन फ्रिजियन गाय दिवसाला 18 लिटर तर जर्सी गाय 12 लिटर दूध देते. दुधाळ गाईंना दररोज सकाळ- संध्याकाळ मिळून पाच किलो पशुखाद्य आणि सरासरी 20 किलो सुक्का आणि हिरवा चारा कुट्टी करून दिला जातो. 
6) संध्याकाळी सहा नंतर पुन्हा गाई धुऊन धारा काढल्या जातात. चारा, पाणी दिले जाते. 
7) गाईंना पशुतज्ज्ञांच्याकडून शिफारशीनुसार लसीकरण, कृत्रिम रेतन केले जाते. गाईंचे आरोग्य चांगले असल्याने दुग्धोत्पादनात सातत्य आहे. 
8) गवस स्वतः गाईंचे व्यवस्थापन ठेवतात. मदतीला दोन मजूर आहेत. 
9) आता गोठ्यातच कालवडी तयार केल्या जातात. प्रत्येक गाईंचे आरोग्य आणि दुग्धोत्पादनाची नोंद ठेवली जाते. 
10) सध्या दररोज सकाळ, संध्याकाळ मिळून 150 लिटर दूध गोव्यातील कुमयामळे या गावातील डेअरीला दिले जाते. स्वतःच्या गाडीतून दूध डेअरीला पोचविले जाते. दुधाला सरासरी 22 रुपये दर मिळतो आहे. रोजचे पशुखाद्य, मजुरी, चारा, वाहतूक असा खर्च वजा जाता 1500 रुपये शिल्लक राहतात. सध्या पशुखाद्य, जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापन खर्चात वाढ होत आहे. 
11) गवस शेणखताचा वापर स्वतःच्या भातशेती, आंबा, काजू बागेसाठी करतात. पीक उत्पादनवाढीसाठी याचा फायदा झाला आहे. उरलेले शेणखत परिसरातील शेतकऱ्यांना विकले जाते. दर वर्षी दहा हजार रुपये शेणखतातून मिळतात. 

संपर्कः मनोज गवस - 9673866603 

गटचर्चेतून प्रगती... दुग्धव्यवसायातील प्रगतीबाबत मनोज गवस म्हणाले, की आम्ही आठ जण जनावरांच्या व्यवस्थापनाबाबत चर्चा करतो. एकत्रित चारा, पशुखाद्य खरेदी केले जाते. एकमेकांच्या सल्ल्याने गाई, म्हशींची खरेदी करतो. कोल्हापूर जिल्ह्यातील पशुपालकांच्या गोठ्याला भेटी देऊन व्यवस्थापन समजाऊन घेतो. जमा- खर्चाची नोंद करतो. त्यानुसार काटेकोर नियोजन केले जाते. पशुतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते. आम्ही सुधारित पद्धतीने गोठे बांधले आहेत. पहिल्यांदा लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता; परंतु हेच लोक आता आमच्याकडे प्रशिक्षणाला येतात. 

ऍग्रोवन ठरला मार्गदर्शक... या तरुणांनी ऍग्रोवनमधील पशुपालनाविषयीचे तांत्रिक लेख, यशोगाथांचा संग्रह केला आहे. त्यातून पशुव्यवस्थापनाच्या टिप्स मिळतात. प्रत्येकाने सुधारित पद्धतीने चारा लागवड केली आहे. काहींनी कराराने जमिनी घेऊन चारा लागवड केली. दोघा जणांनी शेळीपालनाला सुरवात केली आहे. गांडूळ खत प्रकल्प उभारण्याचे प्रत्येकाचे नियोजन आहे. 

अनुभवाचे बोल... कृषी शिक्षणाचा पुरेपूर वापर... 
सासोलीचा रोहित गवस हा कृषी पदविकाधारक आहे. त्याच्या गोठ्यात 10 संकरित गाई आणि पाच कालवडी आहेत. आंबा, काजू बागायतीच्या बरोबरीने दोन एकर चारा पिके आणि केळी लागवड त्याने केली आहे. शेती आणि पशुपालनातील नवीन माहिती गटातील तरुणांना तो सातत्याने देत असतो. 
रोहित गवस - 7798644057 

पॅकिंग करून दुधाची विक्री अनिरुद्ध फाटक याच्याकडे सध्या दहा जर्सी गायी आणि तीन म्हशी आहेत. दीड एकर शेती आहे. यामध्ये चारा पिकांची लागवड केली आहे. बाजारपेठेचा विचार करून म्हशीचे दूध अर्धा लिटर, पाव लिटरच्या पिशवीत पॅकिंग करून विकतो. चाळीस रुपये लिटर या दराने म्हशीच्या दुधाची विक्री होते. गाईचे दूध डेअरीला दिले जाते. येत्या काळात परिसरातील बागायतदारांना शेणखत, गांडूळ खत तयार करून विकण्याचे त्याचे नियोजन आहे. 
अनिरुद्ध फाटक - 9850550819 

म्हैसपालन ठरले फायद्याचे... चिंतन सिद्धये या तरुणाने कला शाखेतून पदवी आणि नंतर संगणक क्षेत्रातील पदविका मिळविली. नोकरी न करता वडिलोपार्जित शेती-बागायतीत तो रमला. शेतीला जोडधंदा म्हणून त्याने म्हैसपालन सुरू केले. सध्याच्या त्याच्या गोठ्यात 12 म्हशी आहेत. वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी चारा पिकांची लागवड केली आहे. पशुपालन व्यवसाय शेतीप्रगतीला फायदेशीर ठरला आहे. 
चिंतन सिद्धये - 9764231509 

सुधारित व्यवस्थापनाकडे... सज्जन धाऊसकर हे सुमारे 15 वर्षांपासून दुग्धव्यवसायात आहेत. या तरुणांच्याकडून सुधारित तंत्राची माहिती त्यांनी आता होल्स्टिन फ्रिजियन आणि जर्सी संकरित गायी घेऊन दुग्धव्यवसाय वाढविला आहे. 
सज्जन धाऊसकर-8275381476 

अनुकरणातून दुग्धव्यवसायात प्रगती... अरुण नाईक मालवाहू रिक्षा व्यवसाय करतात. थोडीफार शेतीही आहे. या तरुणांनी केलेला यशस्वी व्यवसाय पाहून त्यानेही यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याच्याकडे सध्या सहा जर्सी गायी आहेत. शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. 

इतरांनी केले अनुकरण... कुडासे-वानोशीवाडी हे आनंद घाडी यांचे गाव. नारळ-सुपारी हा येथील उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. त्यांनी पशुसंवर्धन व्यवसाय निवडला आणि यशस्वीही केला. सध्या त्यांच्या गोठ्यात 14 होल्स्टिन फ्रिजियन आणि जर्सी गाई आहेत. त्यांचे अनुकरण गावातील तरुणांनी केले आहे.

सस्ते यांना आदर्शवादी आधुनिक "डेअरी फार्म'

सातारा जिल्ह्यातील निंबळक (ता. फलटण) येथील हिरालाल हणमंत सस्ते यांनी नोकरी सोडून दुग्ध व्यवसायाचा मार्ग पत्करला. पारंपरिक पद्धतीतील गोठा व्यवस्थापनात नफा व खर्चाचा मेळ घालताना त्यांची चांगलीच दमछाक व्हायची. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी मुक्त संचार गोठा पद्धती, त्याचबरोबर चारा व खुराकाचे सूत्रबद्ध नियोजन केले. एक व्यक्ती-एक गोठा ही संकल्पनाही साकारल्याने आजमितीला हा व्यवसाय नफ्यात आणण्यात त्यांना यश मिळाले आहे. अमोल जाधव 
फलटणपासून पूर्वेला सुमारे 17 किलोमीटरवर ऊस बागायत पट्ट्यात निंबळक गाव आहे. येथील हिरालाल सस्ते एका फार्मास्युटिकल कंपनीत जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यात मार्केटिंग क्षेत्रात नोकरीस होते. तेथे दोन वर्षे नोकरी केली. कुटुंब विभक्त झाल्यानंतर नोकरी सोडून वाट्याला आलेली शेतीच त्यांनी कसण्यास सुरवात केली. वडील श्री. हणमंत व बंधू राहुल यांच्या समवेत ते सध्या शेती व दुग्ध व्यवसाय सांभाळतात. वडिलोपार्जित सात एकर काळी कसदार स्वरूपाची त्यांची शेती असून, साडेतीन एकरांत ऊस, दोन एकरांवर डाळिंब आहे. दहा गुंठ्यांत डीएचएन-6 चारा पीक, 10 गुंठे मेथी घास, दहा गुंठे मारवेल व 20 गुंठ्यांत मका आहे. या क्षेत्रातून उपलब्ध होणाऱ्या चाऱ्याचा उपयोग सुमारे दहा गाई, चार कालवडी व एका म्हशीसाठी होतो. 

पूर्वीची परिस्थिती हिरालाल नोकरीत व्यस्त असतानाच्या काळात त्यांच्याकडे पारंपरिक स्वरूपाच्या गोठ्यात सुमारे 22 जनावरांचा सांभाळ व्हायचा. नोकरीनंतर हिरालाल यांनी भाजीपाला शेती सुरू केली, परंतु पुरेशा मजुरांअभावी ते ऊस शेतीकडे वळले. पूर्वी उसाचे एकरी 60 ते 65 टन उत्पादन मिळायचे. सेंद्रिय खतांचा वापर, पाण्याचे योग्य नियोजन यातून उत्पादनात किमान 20 ते 30 टक्के वाढ झाली. याच कालावधीत दुग्ध व्यवसायात ते पूर्ण ताकदीने उतरले. त्या वेळी गोठ्यात 50 ते 60 टक्के प्रमाणात सुमारे 22 संकरित गाई (होलस्टीन फ्रिजियन) होत्या. त्यातून दुधाचे अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन त्यांनी गायींची पैदास सुरू केली. त्याच वेळी टप्प्याटप्प्याने जुन्या गाईदेखील विकल्या. 

केलेले बदल 1) दुग्ध व्यवसायाचे मूल्यवर्धन करताना दोन वर्षांपासून मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केला. 
2) 55 बाय 40 फूट अंतरात गोठा. मध्यभागी गाईंना अंग घासण्यासाठी लाकडी खांब. 
3) बांबूच्या वापरातून अल्प खर्चात गोठा उभारणे शक्‍य झाले. 
4) ओल्या चाऱ्याची बचत करण्यासाठी गोठ्यालगत प्रायोगिक तत्त्वावर हायड्रोपोनिक तंत्रावर आधारित, मक्‍यावर आधारित बीजांकुर खाद्यनिर्मिती पद्धत विकसित केली. त्यासाठी 15 बाय 10 फूट आकारात शेड आहे. 
- यात वाळलेला मका कोमट पाण्यात बारा तास भिजवला जातो. त्यानंतर पोत्यात बारा तास ठेवतात. त्यानंतर प्रति ट्रेमध्ये एक ते दीड किलो या प्रमाणात ठेवला जातो. ट्रेवर दर तीन तासांनंतर दीड मिनिट तुषार सिंचन प्रणाली सुरू ठेवून पाणी फवारले जाते. सुमारे आठ दिवसांनंतर तयार झालेले बीजांकुररूपी खाद्य गाईंना दिले जाते. प्रति किलो मक्‍यापासून 14 ते 15 किलो खाद्य प्राप्त होते. हा प्रयत्न प्रायोगिक तत्त्वावर असून, पुढील कालावधीत हे प्रमाण आणखी वाढवले जाणार आहे. 

- 12 बाय 10 फूट व 21 बाय 10 फूट अशा दोन आकारांतील तीन बेडवर ऍझोलानिर्मितीही केली जाते. 

दर सहा महिन्यांनी लसीकरण केले जाते. 

गोठ्यातील दैनंदिन व्यवस्थापन सूत्रबद्ध 1) सकाळी दूध काढणीनंतर प्रति गाय 15 किलो मक्‍याचे बीजांकुर खाण्यास दिले जातात. ऍझोला प्रति गाय एक पावशेर ते अर्धा किलोपर्यंत दिले जाते. संध्याकाळी दूध काढणीनंतर कडवळ, मेथी घास, मका व गवताची कुट्टी एकत्रित करून प्रति गाय 15 किलोप्रमाणे दिली जाते. 
2) गोठ्यात 24 तास पाण्याची सोय व्हावी यासाठी जागोजागी पाण्याच्या टाक्‍या आहेत. 
3) ऍझोलाच्या वाढत्या प्रमाणानुसार अन्य खुराकाचे प्रमाणही कमी करत आणले आहे. खुराकासाठी शेतातील उत्पादित मक्‍याचा वापर केला जातो. दर पंधरा दिवसाला 150 किलो मक्‍याचा घरातील चक्कीद्वारा भरडा केला जातो. गाईंना दररोजच्या खुराकात सरकी पेंड, सोयाबीन भरडा, मिनरल मिक्‍श्चर, मीठ एकत्रित मिसळून दिले जाते. 
व्यायलेली, गाभण, कालवड याप्रमाणे खाद्याचे प्रमाण बदलले जाते. 
4) दूधकाढणी यंत्राचा वापर होतो. 

हे झाले फायदे 1) हायड्रोपोनिक तत्त्वावरील बीजांकुर व ऍझोलाच्या वापरामुळे गाईंना ओला चारा नियंत्रितपणे देता आला. यामुळे याचा फायदा असा झाला, की मोठ्या संख्येतील गाईंच्या वैरण व्यवस्थापनासाठी आरक्षित होणाऱ्या दोन ते तीन एकरांऐवजी एका एकरातील चारा लागवडीद्वारा गाईंचा सांभाळ शक्‍य झाला. 
2) मका भरडा घरी करत असल्यामुळे खुराकातील खर्चात प्रति किलो 3 ते 4 रुपयांची बचत होते. 
3) मुक्त संचार पद्धतीमुळे गाईंचे आरोग्य तंदुरुस्त राहिले. आजारांचे प्रमाण कमी झाले. परिणामी, औषध व्यवस्थापनात सुमारे 70 टक्के बचत झाली. 
4) पूर्वीच्या उत्पादित दुधाचे फॅट 3.8 ते 3.9 व एसएनएफ 8.5 ते 8.6 होते. सुधारित पद्धतीतून फॅट आजघडीला 4.5 ते 4.7 व एसएनएफ 9 पर्यंत पोचले आहे.

अर्थशास्त्र थोडक्‍यात - सध्या सुमारे दहा गायी आहेत. सुमारे सहा ते सात गायींपासून (प्रति गाय प्रति दिन 20 ते 22 लिटर) दररोज सुमारे 140 ते 160 लिटर दूध मिळते. 
- दुधाची विक्री फलटण येथील एका डेअरीला केली जाते. प्रति लिटर 24 ते 27 रुपये दर मिळतो. मुक्त संचार पद्धत, हायड्रोपोनिक व ऍझोला पद्धत अवलंबल्यामुळे डेअरीकडून प्रति लिटर 3 ते 10 रुपये या प्रमाणात प्रोत्साहनपर वाढवूनही दिले जातात. 
- खुराक, वीजबिल, औषध व्यवस्थापन या कामी महिन्याकाठी प्रति गाय सुमारे बारा हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. निविष्ठांच्या खर्चानुसार तो वाढतोही. 
- वर्षाला काही कालवडींची विक्रीही होते. त्यातून तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. 
- 14 ते 15 ट्रेलर शेणखतावर प्रक्रिया करून त्याचा वापर शेतीत होतो. यामुळे उसाचे एकरी उत्पादन वाढवता आले. 

दृश्‍य परिणाम समोर आले 1) सुधारित तंत्रज्ञान वापरल्याने नफ्याचे प्रमाण वाढले. वडील, बंधूही व्यवस्थापन पाहतात. त्यामुळे बाहेरील मजुरांची गरज कमी झाली. 
2) एक व्यक्ती-एक गोठा संकल्पना वाढीस लागली. 
3) पूर्वी वडिलोपार्जित साडेतीन एकर शेती होती. शेती व पूरक व्यवसायातील उत्पन्नातून नवीन साडेतीन एकर शेती खरेदी केली. पाइपलाइनद्वारा पाण्याची सुविधा निर्माण झाली. 

नोकरीपेक्षा शेती व शेतीपूरक व्यवसाय केव्हाही चांगला, असे हिरालाल यांचे इतरांना सांगणे आहे. त्यांचे बंधू राहुल गेल्या वर्षी चॉकलेट कंपनीत नोकरीस होते. घरच्या दुग्ध व्यवसायात आशावाद निर्माण झाल्यानंतर नोकरी सोडून तेही शेतीत उतरले. दुग्ध व्यवसायात सातत्याने घडणारे बदल त्यांना परिसरातील संबंधित डेअरीच्या माध्यमातून समजतात. तेथील विषयतज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. 

संपर्क - हिरालाल सस्ते - 9881487275.

Thursday, May 30, 2013

पशू व्यवस्थापनातील दैनंदिनी

आपल्या गोठ्यामध्ये रोज सकाळी व सायंकाळी ठराविक वेळा चक्कर मारणे महत्त्वाचे असते. जनावरांच्या गोठ्यामध्ये वैरण, पेंड, हिरवा चारा यांचे व्यवस्थापन, तसेच निघालेले दूध वासरांना पाजायचे. दूध, भांड्यांची स्वच्छता, इतर सर्व गोष्टींचे व्यवस्थापन यांकडे लक्ष देणे गरजेचे असते. जनावरांच्या गोठ्यामध्ये प्रत्येक गोष्टीची ठराविक वेळ असली पाहिजे व ती पाळली गेली पाहिजे. उदा.ः पाणी पाजण्याची वेळ, वैरण टाकण्याची वेळ, अंबोण ठेवण्याची वेळ, दूध काढण्याची वेळ इत्यादी. 

यामध्ये बदल केल्यास अथवा ठराविक वेळेत न केल्यास जनावरांच्या दूध देण्याच्या उत्पादनावर परिणाम होत असतो, तसेच जनावरांना हाताळताना पशुवृत्ती न दाखविता मायेने काळजी घेतली पाहिजे. जनावरांस मारहाण केल्यास गाईच्या खाण्यावर प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होऊन उत्पादनात घट होते.

जनावरांना खरारा करणे महत्त्वाचे असते. नियमित खरारा केल्यास अंगावरील खराब केस व घाण, धूळ निघून जाईल व रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित होते.

उन्हाळ्यात गाईंना नियमित पाण्याने धुणे फार महत्त्वाचे असते. तापमानात वाढ झाल्यामुळे दुधावर, तसेच जनावरांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो.

धार काढण्याच्या ठराविक वेळांमध्ये बदल करू नका. दोन धारांमध्ये ठराविक तासांचे अंतर ठेवा. जनावरे धुतल्यानंतर शक्‍यतो धारा काढा, तसेच गाईंची पूर्ण धार काढा. अर्धवट धार काढल्यास कासेचे रोग होतात.

पशू व्यवस्थापनामध्ये सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणून प्रजनन ओळखले जाते. गाईचा माज ओळखणे हा फार महत्त्वाचा भाग आहे. योग्य वेळी माज ओळखून कृत्रिम रेतनाद्वारे किंवा वळूकडून भरणे फार महत्त्वाचे आहे. गाईंचा माज वेळेत न ओळखल्यास फार मोठे नुकसान होते. त्यासाठी दररोज गोठ्यामध्ये सकाळी चक्कर मारून माजावर आलेल्या गाई 24 तासांच्या आत भरणे महत्त्वाचे असते.

गर्भ तपासणी ः ज्याप्रमाणे माज महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे गर्भ तपासणी करणे फार महत्त्वाचे आहे. गाई भरल्यानंतर ती गाभण आहे किंवा नाही या गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गाय भरल्याची तारीख लिहून ठेवून अंदाजे दोन महिन्यांनी तपासून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी गोठ्यातील सर्व गाईंची माहिती तपासून पाहणे गरजेचे आहे. अंदाजे विण्याची तारीख काढून त्या गाईंची त्याप्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे.

जनावरांचे आरोग्य ः पशू व्यवस्थापनामध्ये जनावरांचे आरोग्य हे दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे, त्यासाठी जनावरांच्या आरोग्याकडे दररोज लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. रोगप्रतिबंधक लस टोचणे, जनावरांचे रोगनिदान, तसेच जंतनिर्मूलन हे सर्व वेळेवर करणे फार महत्त्वाचे आहे. एखादे जनावर आजारी असल्यास त्वरित औषधोपचार करणे, तसेच आजारी जनावरांना वेगळे ठेवणे फार महत्त्वाचे आहे.

जनावरांच्या वाईट सवयी मोडणे - जनावरांच्या अनेक प्रकारच्या वाईट सवयी असू शकतात. उदा.ः अंग चाटणे, दुसऱ्या गाईचे दूध पिणे, लाथा मारणे व मारामारी करणे इत्यादी सवयी असतात. त्यासाठी या वाईट सवयी बदलणे गरजेचे असते. अन्यथा दूध उत्पादनात घट होऊ शकते, तसेच जनावरे हाताळताना त्रास होऊ शकतो.

जनावरांची विक्री - सर्वसाधारणपणे गोठ्यामध्ये संसर्गजन्य रोगी जनावरे, माजावर येणारी जनावरे, कमी दूध देणारी जनावरे, भाकड काळ जास्त असणारी, जास्त वेत झालेली जनावरे ही आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसतात. त्यासाठी प्रत्येक वर्षी जनावरांची संख्या कमी करणे महत्त्वाचे असते.

स्वच्छ पाणी - दुग्ध व्यवसायात स्वच्छ पाणी हा फार महत्त्वाचा भाग आहे. उन्हाळ्यात थंड पाणी पाजावे. एक लिटर दूध उत्पादनासाठी चार लिटर पाणी लागते.
 
गाई विण्याच्या दोन महिने आधी दूध काढणे बंद करावे, त्यामुळे प्रजनन अवयवांना विश्रांती मिळते आणि गर्भाची वाढ व्यवस्थित होते, तसेच प्रसूतीच्या वेळी लागणारी ऊर्जा शरीरात साठविली जाते.

गहू भुशाचा करा पशुखाद्यासाठी वापर

दरवर्षी गहू मळणीनंतर मोठ्या प्रमाणात गव्हाचा भुसा निघतो. हा भुसा निरुपयोगी, निकृष्ट आहे असे समजून अनेक शेतकरी मळणी झाल्याबरोबर तो पेटवून देतात; मात्र या भुशावर युरिया आणि उसाची मळी किंवा गुळाची प्रक्रिया करून भुशाचा कस वाढविता येतो. त्याचा पशुखाद्यासाठी चांगला उपयोग होतो. कमी खर्चात पशुपालकांना स्वतः घरच्या घरी ही पद्धत अवलंबिता येऊ शकते.

गव्हाच्या भुशात पोषणमूल्ये कमी प्रमाणात असतात; मात्र उसाची मळी अथवा गूळ आणि युरिया भुशाची पोषणमूल्ये वाढविण्यास मदत करतात. ते कसे याची माहिती घेऊ.

युरिया - रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटातील उपयुक्त सूक्ष्मजीव प्रथिने नसलेल्या, परंतु नत्र असलेल्या पदार्थांपासून शरीरास लागणारी प्रथिने बनवितात. जनावरांच्या आहारात युरियाचा उपयोग शरीर प्रथिने बनविण्यासाठी होऊ शकतो. युरिया शरीरात गेल्यानंतर त्यावर "युरियेज' या आंत्रसचेकाची क्रिया होऊन त्यापासून अमोनिया तयार होतो व या अमोनियापासून पोटातील सूक्ष्मजीव स्वतःची शरीर प्रथिने तयार करतात. ही तयार झालेली प्रथिने अन्ननलिकेत अमिनो आम्लामध्ये विघटित होतात व जनावरांच्या शरीरवाढीसाठी व प्रजोत्पादनासाठी वापरली जातात. पशुआहारात युरियाच्या दोन टक्‍क्‍यांपर्यंतच उपयोग करता येतो. जास्त वापर केल्यास जनावरांना विषबाधा होऊन जनावर दगावण्याची शक्‍यता असते. तेव्हा युरियाचा वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावा. 
उसाची मळी (मोलॅसिस) - 
साखर शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत मळी तयार होते. मळी म्हणजे साखर, हेमिसेक्‍युलोज आणि क्षार यांचे पाण्यातील तीव्र मिश्रण होय. उसाच्या मळीचा वापर केल्यास असे खाद्य चविष्ट होते व जनावरे आवडीने खातात. याशिवाय मळी खाद्यात ऊर्जा पुरविते, जनावरांच्या पोटातील उपयोगी अशा सूक्ष्म जीवजंतूचे प्रमाण वाढविते व खाद्य पचनास मदत करते, शिवाय खाद्याचा कोरडेपणा कमी करते. पशुखाद्यामध्ये मळीचा उपयोग 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत करता येतो. यापेक्षा जास्त प्रमाण असू नये. जास्त वाटल्यास जनावरांचे पोट दुखणे, अतिसार, लघवीवाटे जास्त मूत्र बाहेर पडणे, पायांना आकडे येणे इत्यादी लक्षणे आढळतात. दुर्लक्ष झाल्यास जनावर दगावण्याची शक्‍यता असते. 

गव्हाच्या भुशावर युरिया आणि उसाची मळी किंवा गूळ यांची प्रक्रिया करून भुशातील पोषणमूल्ये वाढविता येऊ शकतात. उसाची मळी आणि युरिया किंवा कमी प्रतीचा गूळ व युरिया या कमी खर्चाच्या तसेच सहज करता येण्याजोग्या दोन पद्धती आहेत. प्रक्रिया करून गव्हाच्या भुशाचा कस वाढतो.

उसाची मळी आणि युरिया यांचा वापर - 
गव्हाचा भुसा 100 किलो, युरिया दोन किलो, उसाची मळी दहा किलो, मीठ दोन किलो, क्षारांचे मिश्रण एक किलो व 50 लिटर पाणी आणि प्लॅस्टिकचा कागद किंवा पोत्याचा तळवट एवढे साहित्य वापरावे. प्रक्रिया ही सावलीमध्ये करावी. भुशाचा चार इंच जाडीचा थर पसरावा. 50 लिटर पाण्यात युरिया विरघळल्यानंतर त्यात उसाची मळी, मीठ व क्षार टाकून ते मिश्रण चांगले एकजीव करावे. यातील निम्मे मिश्रण भुशाच्या चार इंच जाडीच्या थरावर समप्रमाणात फवारावे. त्यानंतर मिश्रण फवारलेल्या थराला पलटी मारावी आणि उरलेले निम्मे मिश्रण समप्रमाणात फवारावे. सर्व भुसा व्यवस्थित भिजलेला आहे की नाही याची खात्री करावी. भिजलेला भुसा गोळा करून त्याचा ढीग करावा व पोत्याचे तळवट किंवा प्लॅस्टिक कागदाच्या आवरणाखाली हवाबंद स्थितीत दोन ते तीन आठवडे झाकून ठेवावा. युरियातील अमोनिया चाऱ्यामध्ये शोषला जाईल. या प्रक्रियेमुळे गव्हाच्या भुशात सहा ते सात टक्के प्रथिने तयार होतात. तयार झालेला गव्हाचा भुसा प्रति जनावरास तीन ते चार किलो या प्रमाणात खाऊ घालावा.

कमी प्रतीचा गूळ व युरिया यांचा वापर -
या पद्धतीतही चार इंच जाडीचा 100 किलो भुशाचा थर तयार करावा. नंतर पाच किलो खराब प्रतीचा गूळ, एक किलो मीठ, 500 ग्रॅम युरिया, एक किलो खनिज मिश्रण, 50 लिटर पाण्यात विरघळून ते पाणी गव्हाच्या भुशावर समप्रमाणात शिंपडावे व हे मिश्रण एकजीव मिसळून नंतर गाईंना खाऊ घालावे. या पद्धतीने तयार केलेला गव्हाचा भुसा पशुधनासाठी खाद्य म्हणून प्रक्रियेनंतर दोन तासांनंतर खायला घालता येतो. याचे प्रमाण गाई व म्हशीत तीन ते चार किलो प्रति जनावर, प्रति दिन या प्रमाणात ठेवावे. 

 श्री. देशमुख, 9422737089
(लेखक गो-संशोधन व विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)

प्रक्रिया केलेल्या भुशाचे फायदे -1) वाया जाणाऱ्या निकृष्ट भुशाचे पोषण मूल्य वाढून उत्कृष्ट पशुखाद्य मिळते. 2) कुट्टी करण्याची गरज नाही. 3) हिरव्या चाऱ्याला चांगला पर्याय आहे. 4) कडब्याच्या तुलनेत सुमारे तीन टक्के प्रथिने व सहा टक्के पचनीय पदार्थ जनावरांस अतिरिक्त मिळतात. 5) वर्षभर वाळलेला चारा उपलब्ध होतो.