Showing posts with label दुग्ध यशोगाथा. Show all posts
Showing posts with label दुग्ध यशोगाथा. Show all posts

Tuesday, February 17, 2015

जनावरांच्या आहारात असावीत योग्य पोषकद्रव्ये

दुभत्या जनावरांमध्ये दुधाद्वारा शरीरातील क्षार व इतर घटकांचा विनिमय होत असतो. या क्षारांची कमतरता झाल्यास दुभत्या जनावरांना आजार होतात. हे लक्षात घेता दुभत्या जनावरांच्या आहारात योग्य प्रमाणात खनिजद्रव्ये असावीत. 

पशुखाद्यातील आवश्‍यक पोषकमूल्यांमध्ये प्रथिने, कार्बोदके, खनिजे, जीवनसत्त्वे यांचा समावेश होतो. त्यामध्ये एकूण 22 खनिजे व जीवनसत्त्वे जनावरांच्या आरोग्यासाठी आणि शारीरिक वाढीसाठी आवश्‍यक आहेत. त्याचबरोबर जनावरांमध्ये रोगप्रतिकारशक्ती टिकवणे, प्रजनन सातत्य राखणे, याकरिता आवश्‍यक संप्रेरकासाठी खनिजे व जीवनसत्त्वे आवश्‍यक आहेत. 
1) योग्य पोषणआहार न दिल्यास गर्भाशयाची वाढ अपुरी होते, प्रथम वेताचे वय वाढते. कालवडी किंवा पारड्या लवकर वयात येत नाहीत. माजावर न येणे, मुका माज असणे, फलित गर्भ मरणे, वारंवार उलटणे या प्रक्रिया सुरू होतात. 
2) प्रथिनांच्या कमतरतेमुळे जननक्षमता कमी होते. कर्बोदकांच्या कमतरतेमुळे शरीराची योग्य प्रमाणात वाढ होत नाही. गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते. गायी, म्हशी उलटतात. 
3) मोठ्या प्रमाणात लसूण घास व बरसीम, चवळी, गवार हे सर्व चारा स्वरूपात दिल्यास अशा चाऱ्यात वनस्पती इट्रोजन असल्यास म्युकोमेट्रा हा आजार होतो. 
4) तांदळाचा भेंडा, नेपिअर, उसाचे वाढे या चाऱ्यांमध्ये ऑक्‍झालिक ऍसिडचे प्रमाण जास्त असल्याने त्याची जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमबरोबर रासायनिक क्रिया होऊन कॅल्शियम ऑक्‍झलेट तयार होते, त्यामुळे जनावरांना कॅल्शियम मिळत नाही. याचा परिणाम म्हणजे जनावरांचे मायांग बाहेर पडणे, जार अडकणे, गर्भाशयाचा ताठरपणा कमी होणे, उशिरा गर्भाशय पूर्वस्थितीवर येणे व गायी-म्हशी वारंवार उलटणे या विकृती निर्माण होतात. 

अ) जीवनसत्त्वे ः 
स्निग्ध विद्राव्य जीवनसत्त्वे (ए, डी, ई, के) ही सर्व यकृतामध्ये साठवली जातात. 
1) जीवनसत्त्व अ ः जीवनसत्त्व "अ'मुळे जनावरांच्या पचनसंस्थेच्या अवयवांचा आतील स्तर चांगला राहण्यास मदत होते. शारीरिक वाढीसाठी आवश्‍यक असते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे अथवा अभावामुळे वार न पडणे, जनावर उशिरा माजावर येणे, स्त्रीबीजांड बाहेर पडण्याची क्रिया लांबते. मुका माज असे दोष दिसून येतात. 
उपलब्धता ः हिरवा मका, हिरवे गवत. 
2) जीवनसत्त्व ड ः जीवनसत्त्व "ड' हे कॅल्शियम व स्फुरदाचे रक्तात सुलभ रूपांतर होण्यासाठी आवश्‍यक असते. 
उपलब्धता ः जनावरे दररोज काही काळ उन्हात बांधावीत. वाळलेल्या गवतातून भरपूर प्रमाणात मिळते. 
3) जीवनसत्त्व ई ः जीवनसत्त्व ई व सेलेनियमचा संयुक्त पुरवठा केल्यास जनावरे उलटण्याचे प्रमाण कमी होते. जनावरे माजावर येतात. 

अ) खनिजांच्या कमतरतेची लक्षणे ः 
1) कॅल्शियम ः 
1) व्याल्यानंतर गर्भाशय पूर्ववत होण्यास विलंब होतो. 
2) प्रोजेस्टेरॉन कमी श्रवते. 
3) स्त्रीबीजांडावर गाठी येतात. 
4) वार अडकतो. 
- अधिक कॅल्शियममुळे फॉस्फेरस , मॅंगेनिज, झिंक, कॉपर यांच्या शोषणात अडथळा निर्माण होतो. 

2) फॉस्फरस ः 
1) जननक्षमता कमी होते, तसेच ऋतुचक्रात अनियमितता दिसून येते. 
2) स्त्रीबीजांड अकार्यक्षम राहते. 
3) माजावर न येणे. 
4) उशिरा वयात येणे. 
5) मृत वासरे जन्मतात किंवा जन्मतःच अशक्त असतात. 

3) मॅगेनीज ः 
1) माजावर न येणे. 
2) गर्भपात. 
3) वासरांच्या पायांच्या नसा आखडलेल्या असतात. 

4) कॉपर (तांबे) ः 
1) जननक्षमता कमी होणे. 
2) माजावर न येणे. 
3) वीर्य निकृष्ट दर्जाचे होणे. 

5) कोबाल्ट ः 
1) जनन क्षमता कमी. 
2) कालवडी उशिरा वयात येतात. 
3) गर्भपात. 
4) अकार्यक्षम ग्रंथी. 
5) अशक्त वासरे जन्मतात. 

6) आयोडीन ः गर्भाची योग्य वाढ व शारीरिक क्रिया सामान्य ठेवण्यासाठी आवश्‍यक असते. याच्या कमतरतेमुळे खालील परिणाम दिसतात. 
1) स्त्रीबीजांडाची विकृती. 
2) अकार्यक्षम बीजांड. 
3) वार अडकणे. 
4) गायी-म्हशी उलटणे. 
5) केस नसलेले वासरू जन्मास येणे. 
6) कमी प्रतीचे वीर्य तयार होणे. 

7) सेलेनियम ः 
1) वार न पडणे, मुका माज, शुक्राणूंची हालचाल मंदावतात. 
2) गर्भपात होणे. 
3) मृत वासरास जन्म देणे. 

8) झिंक ः व्याल्यानंतर गर्भाशय पूर्ववत करण्यास अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून झिंक कार्य करते. कमतरतेची लक्षणे ः 
1) स्त्रीबीजांडावर गाठी. 
2) लवकर वयात न येणे. 
3) माज अनियमित. 
4) नरामध्ये लैंगिक पैशींची वाढ न होणे. 
5) विर्याची प्रत घटणे. 
6) वृषणाचा आकार कमी होतो. 

9) मॅग्नेशियम ः 
1) भूक मंदावणे. 
2) वजन कमी होणे. 
3) संप्रेरके मंदावतात. 

10) क्रोमीअम ः 
1) स्त्रीबीजांड वाढ न होणे. 
2) अपुरे ल्युटीनायझिंग हार्मोनची निर्मिती. 

11) सोडियम व पोटॅशियम ः 
1) सोडियमच्या अभावामुळे शरीरात प्रथिने व ऊर्जेचे योग्य शोषण होत नाही. 
2) पोटॅशियमच्या अभावामुळे मांसपेशीक्षमता कमी होते. प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. 

12) मॉलिब्डेनम ः 
1) प्रजनन संस्थेचे कार्य बिघडते. 
2) प्रजनन इच्छा कमी होते. 
3) नरामध्ये शुक्राणू संख्येचे प्रमाण कमी तसेच वंध्यत्व. 
4) माज उशिरा दाखवणे. 
5) गर्भधारणेचे प्रमाण कमी. 

---------------- 
इन्फो ः 
खनिजांचा दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर होणारा परिणाम ः 
दुभत्या जनावरांमध्ये दुधाद्वारा शरीरातील क्षारांचा व इतर घटकांचा विनिमय होत असतो, याची कमतरता झाल्यास दुभत्या जनावरांना आजार होतात. हे लक्षात घेता दुभत्या जनावरांच्या आहारात खनिजद्रव्यांचे योग्य प्रमाण असावे. 
मुख्य खनिजे ः कॅल्शियम, फॉस्फरस मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम इ. 
अल्पप्रमाणात लागणारी खनिजे ः लोह, तांबे, झिंक, सेलोनियम, मॉलिब्डेनम इ. 
1) कॅल्शियम जनावरांच्या शरीरात सर्वाधिक प्रमाणात असते. शरीरात कॅल्शियमचे प्रमाण 1.30-1.35 टक्के एवढे असते. यामुळे दुधनिर्मितीचे कार्य व्यवस्थित चालते. 
2) याच्या कमतरतेमुळे दुधाळ जनावरात दुग्धज्वर यासारखे आजार होतात. 
3) हा आजार जनावर व्याल्यानंतर 24 ते 72 तासांनंतर आढळून येतो. 
4) हा आजार प्रामुख्याने तिसऱ्या-चौथ्या वेतानंतर हिवाळ्यात अधिक प्रमाणात दिसतो. याचे मुख्य कारण म्हणजे दुधाद्वारा कॅल्शियमचा जास्त प्रमाणात निचरा होणे, चाऱ्यात कॅल्शियमचे प्रमाण कमी असणे आणि "ड' जीवनसत्त्वाचा अभाव हे आहे. 
उपाययोजना ः 
1) रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण तपासून निश्‍चित निदान करावे. 
2) प्रमाण कमी असल्यास पशुवैद्यकाकडून ताबडतोब कॅल्शियमयुक्त व इतर औषधे शिरेतून द्यावीत. 
3) पौष्टिक आहार व स्वच्छ पाणी द्यावे. 
4) प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दुधाळ जनावरांना दररोज 30-50 ग्रॅम कॅल्शियमयुक्त क्षार मिश्रण द्यावे. थंडीपासून संरक्षण करावे. 

खाद्य घटकातील खनिजे ः 
संपर्क ः 02189-233001 
कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर.

Friday, January 30, 2015

हायड्रोपोनिक्‍स तंत्राने करा हिरव्या चाऱ्याची निर्मिती

हायड्रोपोनिक्‍स तंत्राद्वारे उत्पादित केलेला हिरवा चारा हा पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या हिरव्या चाऱ्यापेक्षा सकस असतो. चाराटंचाई परिस्थितीत कमी खर्चामध्ये हिरवा चारा निर्मितीचा हा चांगला पर्याय आहे. प्रा. कपिल इंगळे 
1) हायड्रोपोनिक्‍स चारा तयार करण्यासाठी बांबू, तट्या, प्लॅस्टिक ट्रे, 50 टक्के क्षमतेचे शेडनेट, मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर सिस्टिम व टायमर यांची गरज असते. 
2) या साधनसामग्रीचा वापर करून 72 स्क्वेअर फूट जागेत बसेल असा 25 फूट x 10 फूट x 10 फूट आकाराचा सांगाडा अवघ्या 15 हजार रुपये खर्चात तयार होतो. 
3) यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवा चारा तयार करता येतो. 
4) चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली याचा वापर केला जातो. धान्याला ई.एम.च्या द्रावणात बीजप्रक्रिया करावी लागते. 
5) हे धान्य 12 तास भिजत ठेवून, 24 तास गोणपाटात अंधाऱ्या खोलीत ठेवावे. 
6) त्यानंतर प्लॅस्टिक ट्रेमध्ये (3 फूट x 2 फूट x 3 इंच ) साधारणतः 1.5 ते 1.75 किलो बी पसरावे. 
7) अशा प्रकारे प्रतिदुभत्या जनावरांना दहा ट्रे या प्रमाणे जनावरांच्या संख्येवरून ट्रेची संख्या ठरवावी. 
8) हे प्लॅस्टिक ट्रे हायड्रोपोनिक चारा निर्मिती गृहात सात ते आठ दिवस ठेवावेत. 
9) एक इंची विद्युत मोटारीला लॅटरलची जोड देऊन फॉगर पद्धतीद्वारे प्रत्येक दोन तासाला पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून सात वेळा पाणी द्यावे. एका दिवसासाठी 200 लिटर पाणी लागते. ही यंत्रणा स्वयंचलित आहे. पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न हायड्रोपोनिक्‍स चाऱ्यास पाणी देता येते. 
10) चाऱ्याची 7 ते 8 दिवसांत 20 ते 25 सें.मी. उंचीपर्यंत वाढ होते. साधारणपणे एक किलो गव्हापासून नऊ किलो, तर एक किलो मक्‍यापासून 10 किलो हिरवा चारा तयार होतो. 

चारा देण्याचे प्रमाण - - भाकड जनावरे 6 किलो प्रतिदिवस प्रतिजनावर. 
- दुभती जनावरे 15 किलो प्रतिदिवस प्रतिजनावर.

हायड्रोपोनिक्‍स चाऱ्याचे फायदे - 1. चारा टंचाई परिस्थितीत हिरवा चारा निर्मितीचा चांगला पर्याय. 
2. कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक चारानिर्मिती. 
3. जनावरांना 90 टक्के चारा पचतो. 
4. पशुखाद्याचा खर्च 40 टक्के कमी. 
5. जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ. 
6. दुधाच्या फॅटमध्ये वाढ. किमान अर्धा लिटरने दुधात वाढ. 
7. जनावरांची प्रजनन क्षमता सक्षम होते. 
8. जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वाच्या उपलब्धतेत वाढ. 
9. जमिनीवर चारा उत्पादन घेण्याच्या तुलनेत 5 ते 10 टक्के पाण्याची आवश्‍यकता आहे. 
10. प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटीऑक्‍सिडंट्‌स, फॉलिक ऍसिड, ओमेगा-3, स्निग्ध पदार्थ हरितद्रव्य मोठ्या प्रमाणात असतात. 

प्रा. कपिल इंगळे 8380984068 
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे विषय विशेषज्ञ (कृषी विद्या) म्हणून कार्यरत आहेत.) 

Monday, February 17, 2014

संकरीत गायींचे देखबाल

वासरांचे संगोपन- 
वासरांच्या संगोपनाची सुरवात ते गर्भावस्थेत असल्यापासूनच होते. गाय गाभण असताना शेवटच्या तीन महिन्यांत गर्भाची वाढ विशेष होत असते. या दिवसांत गाईंना 10-15 कि. ग्रॅ. हिरवी वैरण, 5-7 कि.ग्रॅ. वाळलेली वैरण व 2.0-2-5 कि.ग्रॅ. अंबोण द्यावे. याबरोबर रोजचे 50 ग्रॅम क्षार मिश्रण द्यावे.
गाईंची प्रसूती स्वच्छ गोठ्यात होईल हे पाहावे. प्रसूतीनंतर वासराला स्वच्छ करावे. त्याच्या नाकपुड्या, तोंड व कान यात असलेला चिकट पदार्थ बोटाने काढून टाकावा. श्‍वासोच्छ्वास व रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी त्याची छाती व अंग चोळून काढावे. स्वच्छ कोरड्या गोणपाटावर ठेवून वासराला गाईच्या पुढे ठेवावे म्हणजे गाय स्वतः चाटून साफ करेल. 

वासराची नाळ शरीरापासून दोन इंच अंतरावर स्वच्छ कात्रीने कापून दोऱ्याने बांधावी व त्याला टिंक्‍चर आयोडीन लावावे. नाळेप्रमाणे वासराचे खूर पण काढावे. 
वासरू जन्मल्यानंतर 30 मिनिटांत पायावर उभे राहते. पहिले दूध म्हणजे चीक ताबडतोब दिला पाहिजे. चिकामध्ये वासरांना रोगप्रतिकारक शक्ती देणारे ऍन्टीबॉडीज असतात व प्रथिने व अन्य उपयोगी सत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. असे असल्याने पहिले तीन दिवस वासरांना चार वेळेस कासेला लावून दूध द्या. प्रत्येक वेळी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लावू नये. जास्त दूध प्यायल्याने वासरांना त्रास होतो. 

थंडी, ऊन, वारा, पाऊस यांपासून वासराचे रक्षण करा. तिसऱ्या आठवड्यापासून वासराला अंबोण खायला उद्युक्त करावे. अंबोणवर दूध टाकून खायला द्यावे म्हणजे हळूहळू सवय लागेल. वासरांना कोवळे, कोरडे गवतदेखील तिसऱ्या आठवड्यापासून सुरू करावे. 

वासरांना पुढीलप्रमाणे दूध द्यावे ः 
45 दिवस वजनाला 10 टक्के दूध पाजावे. 
45 ते 60 दिवस वजनाला 8 टक्के दूध पाजावे. 
60 ते 90 दिवस वजनाला 5 टक्के दूध पाजावे. 

तीन महिन्यांनंतर दूध बंद करावे आणि वासरांसाठी मिळणारे अंबोण द्यावे व कोवळी, पालेदार, उत्तम प्रतीची वैरण द्यावी. 
वासरांना वेगळ्या गोठ्यात ठेवा व वासरांची गर्दी होऊ देऊ नये, तसेच गोठ्यात कोंदट व दमट वातावरण नसावे, कारण अशा वातावरणात माश्‍या, डास, गोचीड व गोमाश्‍यांची वाढ झपाट्याने होते. 

गोठ्यात पिण्याचे पाणी सतत उपलब्ध असावे, तसेच गोठ्यात मलमूत्र, घाण, कचरा वगैरे साठू देऊ नये. 
वासरांना पोटातील जंतासाठी महिन्यातून एक दिवस या प्रमाणे पहिल्या सहा महिन्यांपर्यंत जंताचे औषध पाजावे. सूक्ष्म जिवाणू, विषाणूजन्य रोगांपासून रक्षण करण्याकरता वासरांचे लसीकरण करून द्यावे. 

वासरांच्या गोठ्यात लहान-लहान कप्पे करून वयानुसार वेगवेगळी ठेवावीत. सर्व वासरे एकत्र ठेवल्यास मोठी धडधाकट वासरे लहान वासरांना अंबोण खाऊ देत नाहीत.

गाभण गायींची काळजी-
गर्भधारणा झाल्यापासून सहा महिने गर्भाची वाढ हळूहळू होत असते. या काळात गाय दूधही देत असते. त्यामुळे गाईस योग्य तो आहार नियमितपणे द्यावा म्हणजे त्याचा उपयोग गर्भालाही होतो. गर्भावस्थेच्या शेवटच्या तीन महिन्यांत म्हणजे 7 वा, 8 वा, 9 वा महिना या काळात गर्भाचे वजन पहिल्या सहा महिन्यांच्या साधारणपणे दुप्पट वाढते.
असे असल्याने या तीन महिन्यांत गाईंना शरीरनिभाव व गर्भवृद्धीसाठी रोजचे दोन किलोग्रॅम आंबोण द्यावे व क्षार कमतरता दूर करण्यासाठी रोजचे 50 ग्रॅम क्षार मिश्रण द्यावे. सात महिने पूर्ण झाल्यावर गाय आटवावी व कासेत स्तनदाहविरोधी प्रतिजैविक औषध सोडावे, म्हणजे कास निरोगी राहील. सहा महिन्यांनंतर गाभण गाईस चरण्याची वेळ कमी करावी. 

दिवसातून 2 ते 4 तास मोकळे चरण्यास एकट्याच गाईस सोडावे.गर्भावस्थेत गर्भाला गोलकृमीचा आजार होऊ शकतो. म्हणून सातव्या व आठव्या महिन्यांत गाभण गाईला गोलकृमीनाशक औषध पाजावे. 

कालवडींना गर्भावस्थेच्या शेवटच्या महिन्यात कासेला मालिश करावे, म्हणजे विण्यानंतर दूध काढायच्या क्रियेचा त्यांना सराव होईल. कालवडींना दुभत्या गाईंच्या गोठ्यात ठेवावे, म्हणजे दोहनकाळच्या वेळेत होणाऱ्या हालचालींचीही त्यांना सवय होते. 

प्रसूतिपूर्वी शेवटच्या एक-दोन दिवसांमध्ये गाभण गाईवर 24 तास लक्ष राहील अशा ठिकाणी बांधावे व सतत काळजीपूर्वक निरीक्षण करावे. काही अनियमित लक्षण दिसल्यास त्वरित उपाययोजना करावी. 

गाभण जनावरांना आरामशीरपणे बसण्यासाठी व उभे राहण्यासाठी पुरेशी जागा असावी. ऊन, वारा, पाऊस यांपासून अशा जनावरांचे संरक्षण करणे अत्यंत निकडीचे आहे. गाभण जनावर ज्या ठिकाणी बांधले जाते, ती जागा स्वच्छ, निर्जंतुक केलेली असावी. गोठ्यातील जमीन निसरडी असू नये.

दुभत्या जनावरांची जोपासना करताना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष निगा ठेवणे जरुरीचे असते. यासाठी जनावरांचे गोठे शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेले असावेत. दुधाळ जनावरे व्याल्यापासून 60 ते 90 दिवसांत फळविली गेली पाहिजेत.
त्यामुळे 305 दिवसांचा दुधाचा काळ मिळेल व दोन वेतांतील अंतर 12 ते 14 महिन्यांचे राहील. गाय व्याल्यानंतर 3 महिन्यांनी गर्भधारणा झाली पाहिजे. त्यासाठी वीर्यदान झालेली जनावरे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासून घ्यावीत आणि गाभण असल्याची खात्री करावी. दुधाळ जनावरांना खरारा करावा. दिवसातून तीन वेळा पाणी पाजावे. ओला व सुका चारा योग्य प्रमाणात व योग्य वेळी द्यावा. 

गाभण म्हशींना पाण्याने रोज धुवावे. दिवसातून तीन वेळा स्वच्छ आणि थंड पाणी पाजावे. दिवसातून दोन वेळा सारख्या प्रमाणात आंबोण (खुराक) द्यावे. आंबोण, सुका चारा व हिरवा चारा हा जनावरांच्या वजनाच्या अडीच टक्के शुष्क प्रमाणात असावा. एक किलो आंबोण शरीर पोषणासाठी आणि दीड किलो आंबोण गर्भारपणाच्या काळात, असे एकूण अडीच किलो आंबोण गाभण गाईला द्यावे; तसेच पाच ते सात किलो सुका चारा, पंधरा ते 20 किलो हिरवा चारा द्यावा. 

यात 6 ते 7 किलो प्रथिनयुक्त चारा असावा. गाईचा गाभण काळ नऊ महिने, नऊ दिवस असतो; तर म्हशीचा गाभण काळ दहा महिने 10 दिवस इतका असतो. शेवटच्या गाभण दिवसांत विशेष काळजी घ्यावी. विण्यापूर्वी कासेला सूज आल्यास कास पिळून काढावी आणि कासेला पुढील सडाकडून जांघेकडे चोळावे किंवा जनावरांना थोडा व्यायाम द्यावा म्हणजे सूज कमी होईल. परंतु अशी कास गरम पाण्याने कधीही शेकू नये. 

गाय व्यायल्यानंतर गाईचे मागील पुठ्ठ चांगले शेकून काढावेत तसेच शेपटी, मागील पाय आणि कास स्वच्छ कोमट पाण्याने धुवावी. त्यानंतर तिला कोमट पाणी प्यायला द्यावे, तसेच सुका चारा खायला द्यावा. गाईला थंड पाणी किंवा ओला चारा देऊ नये. त्यामुळे वार पडायला वेळ लागतो. वार 7-8 तासांत पूर्ण पडली पाहिजे. व्याल्यानंतर एका तासात जनावरांची कास पिळून चीक काढावा व तो वासराला योग्य प्रमाणात पाजावा. चीक लवकर काढल्याने जनावरांची ओटी हलकी होते आणि जनावर वार फेकण्यावर आपले लक्ष केंद्रित करते. वार पडल्यानंतर गर्भाशयात चार फ्युरियाच्या गोळ्या भराव्यात ज्यामुळे गर्भाशयातील सर्व घाण बाहेर पडण्यास मदत होते. 

जनावर व्याल्यानंतर एक किलो बाजरी, अर्धा किलो मेथी, पाव किलो गूळ, 100 ग्रॅम गोडेतेल, 100 ग्रॅम खोबरे, 50 ग्रॅम मीठ, ओवा, बाळंतशेप आणि शेपू प्रत्येकी 20 ग्रॅम वापरून खिचडी शिजवावी आणि ही खिचडी दिवसातून दोन वेळा आंबवणात मिसळून द्यावी. गाईच्या दूध काढण्याच्या वेळा नियमित असाव्यात. 

दुभत्या व गाभण गाईचे संगोपन ः सामान्य गाईच्या शरीर पोषणासाठी लागणाऱ्या खाद्याव्यतिरिक्त दुभत्या गाईंना दूध उत्पादनाच्या 40 ते 50 टक्के जादा खुराक द्यावा. गाई धुऊन स्वच्छ ठेवाव्यात. कोणताही रोग झाल्यास त्यावर ताबडतोब उपचार करावेत. गाभण गाईंना गाभण काळातील शेवटच्या दोन ते अडीच महिन्यांत दीड ते अडीच किलो समतोल आहार द्यावा. विण्याच्या अगोदर 7 ते 8 दिवसांपासून पचनास सोपे व हलके खाद्य खाऊ घालावे. दररोज दोन तास फिरण्याचा व्यायाम द्यावा. प्रसूतीच्यावेळी अडचण येत असल्यास ताबडतोब पशुवैद्यकीय मदत घ्यावी. व्याल्यानंतर गाईची वार संपूर्ण पडली आहे याची खात्री करून ती त्वरित पुरून नष्ट करावी
जनावरांना नियमित खरारा करावा, नियमित अंघोळ घालावी. गोचीड हाताने प्रत्यक्ष काढून त्यांना जाळून टाकावे.
मोकाट पद्धतीऐवजी बंदिस्त गोपालनाचा अंगीकार करावा. 
गोठ्यांची व जनावरांची स्वच्छता राखावी. गोठ्यात अडगळ नको. गोठ्यातील जमीन, गव्हाण, खांब, भिंती इ. ठिकाणी फटी, खाचा, खोचा, छिद्रे नकोत. 
पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार गोचीड प्रतिबंधक कीटकनाशकांचा दक्षतापूर्वक वापर करावा. 

गोचीड प्रतिबंधक कीटकनाशकांच्या फवाऱ्याने गोठ्याचा परिसर, जमीन, भिंती फवारून घ्याव्यात, फटी, खाचा, खोचा, छिद्रे नष्ट करावीत. 
गोठ्याभोवती दलदल नको, झाडे, झुडपे नकोत, जेणे करून गोचिडांच्या पुनरुत्पादनास मदत होईल. गोठ्याभोवती 1-1.5 इंचाचा पाण्याचा पाट असावा. 
उंदीर, घूस यांसारख्या प्राण्यांचा बंदोबस्त करावा. सहायकांमार्फत तसेच इतर साधनांमार्फत गोचिडांचे संक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी. 

गोचीडनाशक वापरताना घ्यावयाची काळजी ः 
वरील गोचीडनाशके वापरताना डॉक्‍टरांचे मार्गदर्शन व उत्पादक कंपनीच्या सूचना काळजीपूर्वक अमलात आणाव्यात. 

एकच एक औषध नेहमी वापरण्याऐवजी विविध प्रकारची औषधे वापरावीत जेणे करून प्रभावी गोचीड निर्मूलन साध्य करता येईल. 
कीटकनाशक फवारणी वारा असताना, किंवा पावसाळ्यात करू नये. 

जखमेच्या ठिकाणी फवारणी करू नये. 
औषधे विषारी असल्यामुळे विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी. 
विषबाधेचे लक्षण दिसल्यास प्रथम भरपूर पाण्याने जनावरास अंघोळ घालावी व तत्काळ पशुवैद्यकांची मदत घ्यावी. 

अशा रीतीने व्यापक उपद्रव मूल्य असणाऱ्या व पशुसंवर्धनातील उत्पन्नाच्या 15 टक्केपर्यंत उत्पन्नाच्या नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या गोचिडांच्या नियंत्रणास व निर्मूलनास सातत्यपूर्ण व प्रामाणिक प्रयत्नांची नितांत आवश्‍यकता आहे.

व्यावसायिक दूध उत्पादनाच्या दृष्टीने होलस्टिन फ्रिजीयन, जर्सी या जातींना मागणी आहे. होलस्टिन फ्रिजीयन ही जात एका वेतात 6,000 लिटर दूध देते. दुधामध्ये स्निग्धता 3.5 टक्के असते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेली फुले त्रिवेणी ही जात आपल्या वातावरणात दूध उत्पादनाच्या दृष्टीने चांगली आहे. 

ही संकरित गाय अधिक दूध उत्पादन, अधिक फॅट, उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असणारी जात आहे. या जातीचे वितातील सरासरी दुग्धोत्पादन 3,000 ते 3,500 लिटर असून, दुधातील फॅटचे प्रमाण 3.8 ते 4.2 टक्के आहे. 

फुले त्रिवेणी वळूचे गोठीत वीर्य गोसंशोधन व विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर (दूरध्वनी क्र. 02426 - 243361) यांच्याशी संपर्क साधावा. या प्रकल्पावर गो व्यवस्थापनाबाबत माहिती मिळू शकेल.

दुधाळ जनावरांची निगा ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी गोठे हे शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेले असावेत. दुधाळ जनावरे व्यायल्यानंतर 60 ते 90 दिवसांत फळवली पाहिजेत, त्यामुळे 305 दिवसांचा दुधाचा काळ मिळेल व दोन वेतांतील अंतर 12 ते 14 महिन्यांचे राहील. गाय व्यायल्यानंतर 3 महिन्यांनी गर्भधारणा झाली पाहिजे. 
त्यासाठी वीर्यदान झालेली जनावरे पशुवैद्यक अधिकाऱ्यांकडून तपासून घ्यावीत आणि गाभण असल्याची खात्री करून घ्यावी. दुधाळ जनावरांना खरारा करावा. दिवसातून तीन वेळा पाणी पाजावे. ओला व सुका चारा योग्य प्रमाणात योग्य वेळी द्यावा. गाभण म्हशींना रोज पाण्याने धुवावे. दिवसातून दोन वेळा सारख्या प्रमाणात आंबोण द्यावे. आंबोण, सुका चारा, हिरवा चारा हा जनावरांच्या वजनाच्या अडीच टक्के शुष्क प्रमाणात असावा. गाभण गाईला 1 किलो आंबोण शरीर पोषणासाठी आणि दीड किलो आंबोण गर्भारपणाच्या काळात द्यावे. तसेच पाच ते सात किलो सुका चारा व 20 किलो हिरवा चारा द्यावा. 

विण्यापूर्वी कासेला सूज आल्यास कास पिळून काढावी व कासेला पुढील सडाकडून जांघेकडे चोळावे किंवा जनावरांना थोडा व्यायाम द्यावा म्हणजे सूज कमी होईल. गाय व्यायल्यानंतर शेपटी मागील पाय, कास स्वच्छ कोमट पाण्याने धुवावी. त्यानंतर तिला कोमट पाणी प्यायला द्यावे. तसेच सुका चारा खायला द्यावा. गाईला थंड पाणी किंवा ओला चारा देऊ नये, त्यामुळे वार पडायला वेळ लागतो. वार 7 ते 8 तासांत पडली पाहिजे. व्यायल्यानंतर एका तासात जनावरांची कास पिळून चीक काढावा व तो वासराला योग्य प्रमाणात पाजावा. जनावर व्यायल्यानंतर एक किलो बाजरी, अर्धा किलो मेथी, पाव किलो गूळ, 100 ग्रॅम गोडेतेल, 100 ग्रॅम खोबरे, 50 ग्रॅम मीठ, ओवा, बाळंतशेप आणि शेपू प्रत्येकी 20 ग्रॅम वापरून खिचडी शिजवावी आणि ही खिचडी दिवसातून दोन वेळा आंबोणातून द्यावी. गाईचे दूध काढण्याच्या वेळा नियमित असाव्यात.
गोठा बांधताना गोठ्यासाठी किती खर्च झाला आहे, हे महत्त्वाचे नसून त्या गोठ्यामध्ये जनावरांचे संवर्धन किती प्रमाणात शास्त्रीय पद्धतीने करणे शक्‍य होईल व जनावरांना काय काय सुविधा आहेत हे महत्त्वाचे आहे. उत्तम गोठ्यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत. 
गोठा कमी खर्चाचा असावा. 
गोठ्यात जनावरांना चारा खाण्यासाठी उत्तम गव्हाण असावी. 


गव्हाणीची उंची अशी असावी, की त्यामुळे जनावरास सहज चारा, खाद्य खाता येईल. त्यामध्ये शेण अगर मूत्र जाणार नाही. तसेच जनावरांना गव्हाणीत पाय ठेवता येणार नाही. गव्हाण स्वच्छ करणे सोपे जाईल. 
गोठ्यामध्ये पावसाचे पाणी येणार नाही, चिखल होणार नाही, पाणी व मूत्र यांचा ताबडतोब निचरा होईल अशी रचना असावी. 
जनावरांना गोठ्यामध्ये सहज सुलभतेने बसणे व उभे राहणे शक्‍य होईल एवढी जागा असावी. 
जनावर गोठ्यात बांधल्यावर त्यांचे पाऊस, ऊन व वारा यांपासून संरक्षण झाले पाहिजे. 
गोठे हवेशीर असावेत. त्यात चांगले वायुविजन होईल, असे बांधकाम असावे. 
गोठ्यामध्ये जनावरांना पुरेसे, स्वच्छ, थंड पाणी पिण्याची सोय असावी.