Monday, February 17, 2014

संकरीत गायींचे देखबाल

वासरांचे संगोपन- 
वासरांच्या संगोपनाची सुरवात ते गर्भावस्थेत असल्यापासूनच होते. गाय गाभण असताना शेवटच्या तीन महिन्यांत गर्भाची वाढ विशेष होत असते. या दिवसांत गाईंना 10-15 कि. ग्रॅ. हिरवी वैरण, 5-7 कि.ग्रॅ. वाळलेली वैरण व 2.0-2-5 कि.ग्रॅ. अंबोण द्यावे. याबरोबर रोजचे 50 ग्रॅम क्षार मिश्रण द्यावे.
गाईंची प्रसूती स्वच्छ गोठ्यात होईल हे पाहावे. प्रसूतीनंतर वासराला स्वच्छ करावे. त्याच्या नाकपुड्या, तोंड व कान यात असलेला चिकट पदार्थ बोटाने काढून टाकावा. श्‍वासोच्छ्वास व रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी त्याची छाती व अंग चोळून काढावे. स्वच्छ कोरड्या गोणपाटावर ठेवून वासराला गाईच्या पुढे ठेवावे म्हणजे गाय स्वतः चाटून साफ करेल. 

वासराची नाळ शरीरापासून दोन इंच अंतरावर स्वच्छ कात्रीने कापून दोऱ्याने बांधावी व त्याला टिंक्‍चर आयोडीन लावावे. नाळेप्रमाणे वासराचे खूर पण काढावे. 
वासरू जन्मल्यानंतर 30 मिनिटांत पायावर उभे राहते. पहिले दूध म्हणजे चीक ताबडतोब दिला पाहिजे. चिकामध्ये वासरांना रोगप्रतिकारक शक्ती देणारे ऍन्टीबॉडीज असतात व प्रथिने व अन्य उपयोगी सत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. असे असल्याने पहिले तीन दिवस वासरांना चार वेळेस कासेला लावून दूध द्या. प्रत्येक वेळी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लावू नये. जास्त दूध प्यायल्याने वासरांना त्रास होतो. 

थंडी, ऊन, वारा, पाऊस यांपासून वासराचे रक्षण करा. तिसऱ्या आठवड्यापासून वासराला अंबोण खायला उद्युक्त करावे. अंबोणवर दूध टाकून खायला द्यावे म्हणजे हळूहळू सवय लागेल. वासरांना कोवळे, कोरडे गवतदेखील तिसऱ्या आठवड्यापासून सुरू करावे. 

वासरांना पुढीलप्रमाणे दूध द्यावे ः 
45 दिवस वजनाला 10 टक्के दूध पाजावे. 
45 ते 60 दिवस वजनाला 8 टक्के दूध पाजावे. 
60 ते 90 दिवस वजनाला 5 टक्के दूध पाजावे. 

तीन महिन्यांनंतर दूध बंद करावे आणि वासरांसाठी मिळणारे अंबोण द्यावे व कोवळी, पालेदार, उत्तम प्रतीची वैरण द्यावी. 
वासरांना वेगळ्या गोठ्यात ठेवा व वासरांची गर्दी होऊ देऊ नये, तसेच गोठ्यात कोंदट व दमट वातावरण नसावे, कारण अशा वातावरणात माश्‍या, डास, गोचीड व गोमाश्‍यांची वाढ झपाट्याने होते. 

गोठ्यात पिण्याचे पाणी सतत उपलब्ध असावे, तसेच गोठ्यात मलमूत्र, घाण, कचरा वगैरे साठू देऊ नये. 
वासरांना पोटातील जंतासाठी महिन्यातून एक दिवस या प्रमाणे पहिल्या सहा महिन्यांपर्यंत जंताचे औषध पाजावे. सूक्ष्म जिवाणू, विषाणूजन्य रोगांपासून रक्षण करण्याकरता वासरांचे लसीकरण करून द्यावे. 

वासरांच्या गोठ्यात लहान-लहान कप्पे करून वयानुसार वेगवेगळी ठेवावीत. सर्व वासरे एकत्र ठेवल्यास मोठी धडधाकट वासरे लहान वासरांना अंबोण खाऊ देत नाहीत.

गाभण गायींची काळजी-
गर्भधारणा झाल्यापासून सहा महिने गर्भाची वाढ हळूहळू होत असते. या काळात गाय दूधही देत असते. त्यामुळे गाईस योग्य तो आहार नियमितपणे द्यावा म्हणजे त्याचा उपयोग गर्भालाही होतो. गर्भावस्थेच्या शेवटच्या तीन महिन्यांत म्हणजे 7 वा, 8 वा, 9 वा महिना या काळात गर्भाचे वजन पहिल्या सहा महिन्यांच्या साधारणपणे दुप्पट वाढते.
असे असल्याने या तीन महिन्यांत गाईंना शरीरनिभाव व गर्भवृद्धीसाठी रोजचे दोन किलोग्रॅम आंबोण द्यावे व क्षार कमतरता दूर करण्यासाठी रोजचे 50 ग्रॅम क्षार मिश्रण द्यावे. सात महिने पूर्ण झाल्यावर गाय आटवावी व कासेत स्तनदाहविरोधी प्रतिजैविक औषध सोडावे, म्हणजे कास निरोगी राहील. सहा महिन्यांनंतर गाभण गाईस चरण्याची वेळ कमी करावी. 

दिवसातून 2 ते 4 तास मोकळे चरण्यास एकट्याच गाईस सोडावे.गर्भावस्थेत गर्भाला गोलकृमीचा आजार होऊ शकतो. म्हणून सातव्या व आठव्या महिन्यांत गाभण गाईला गोलकृमीनाशक औषध पाजावे. 

कालवडींना गर्भावस्थेच्या शेवटच्या महिन्यात कासेला मालिश करावे, म्हणजे विण्यानंतर दूध काढायच्या क्रियेचा त्यांना सराव होईल. कालवडींना दुभत्या गाईंच्या गोठ्यात ठेवावे, म्हणजे दोहनकाळच्या वेळेत होणाऱ्या हालचालींचीही त्यांना सवय होते. 

प्रसूतिपूर्वी शेवटच्या एक-दोन दिवसांमध्ये गाभण गाईवर 24 तास लक्ष राहील अशा ठिकाणी बांधावे व सतत काळजीपूर्वक निरीक्षण करावे. काही अनियमित लक्षण दिसल्यास त्वरित उपाययोजना करावी. 

गाभण जनावरांना आरामशीरपणे बसण्यासाठी व उभे राहण्यासाठी पुरेशी जागा असावी. ऊन, वारा, पाऊस यांपासून अशा जनावरांचे संरक्षण करणे अत्यंत निकडीचे आहे. गाभण जनावर ज्या ठिकाणी बांधले जाते, ती जागा स्वच्छ, निर्जंतुक केलेली असावी. गोठ्यातील जमीन निसरडी असू नये.

दुभत्या जनावरांची जोपासना करताना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष निगा ठेवणे जरुरीचे असते. यासाठी जनावरांचे गोठे शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेले असावेत. दुधाळ जनावरे व्याल्यापासून 60 ते 90 दिवसांत फळविली गेली पाहिजेत.
त्यामुळे 305 दिवसांचा दुधाचा काळ मिळेल व दोन वेतांतील अंतर 12 ते 14 महिन्यांचे राहील. गाय व्याल्यानंतर 3 महिन्यांनी गर्भधारणा झाली पाहिजे. त्यासाठी वीर्यदान झालेली जनावरे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासून घ्यावीत आणि गाभण असल्याची खात्री करावी. दुधाळ जनावरांना खरारा करावा. दिवसातून तीन वेळा पाणी पाजावे. ओला व सुका चारा योग्य प्रमाणात व योग्य वेळी द्यावा. 

गाभण म्हशींना पाण्याने रोज धुवावे. दिवसातून तीन वेळा स्वच्छ आणि थंड पाणी पाजावे. दिवसातून दोन वेळा सारख्या प्रमाणात आंबोण (खुराक) द्यावे. आंबोण, सुका चारा व हिरवा चारा हा जनावरांच्या वजनाच्या अडीच टक्के शुष्क प्रमाणात असावा. एक किलो आंबोण शरीर पोषणासाठी आणि दीड किलो आंबोण गर्भारपणाच्या काळात, असे एकूण अडीच किलो आंबोण गाभण गाईला द्यावे; तसेच पाच ते सात किलो सुका चारा, पंधरा ते 20 किलो हिरवा चारा द्यावा. 

यात 6 ते 7 किलो प्रथिनयुक्त चारा असावा. गाईचा गाभण काळ नऊ महिने, नऊ दिवस असतो; तर म्हशीचा गाभण काळ दहा महिने 10 दिवस इतका असतो. शेवटच्या गाभण दिवसांत विशेष काळजी घ्यावी. विण्यापूर्वी कासेला सूज आल्यास कास पिळून काढावी आणि कासेला पुढील सडाकडून जांघेकडे चोळावे किंवा जनावरांना थोडा व्यायाम द्यावा म्हणजे सूज कमी होईल. परंतु अशी कास गरम पाण्याने कधीही शेकू नये. 

गाय व्यायल्यानंतर गाईचे मागील पुठ्ठ चांगले शेकून काढावेत तसेच शेपटी, मागील पाय आणि कास स्वच्छ कोमट पाण्याने धुवावी. त्यानंतर तिला कोमट पाणी प्यायला द्यावे, तसेच सुका चारा खायला द्यावा. गाईला थंड पाणी किंवा ओला चारा देऊ नये. त्यामुळे वार पडायला वेळ लागतो. वार 7-8 तासांत पूर्ण पडली पाहिजे. व्याल्यानंतर एका तासात जनावरांची कास पिळून चीक काढावा व तो वासराला योग्य प्रमाणात पाजावा. चीक लवकर काढल्याने जनावरांची ओटी हलकी होते आणि जनावर वार फेकण्यावर आपले लक्ष केंद्रित करते. वार पडल्यानंतर गर्भाशयात चार फ्युरियाच्या गोळ्या भराव्यात ज्यामुळे गर्भाशयातील सर्व घाण बाहेर पडण्यास मदत होते. 

जनावर व्याल्यानंतर एक किलो बाजरी, अर्धा किलो मेथी, पाव किलो गूळ, 100 ग्रॅम गोडेतेल, 100 ग्रॅम खोबरे, 50 ग्रॅम मीठ, ओवा, बाळंतशेप आणि शेपू प्रत्येकी 20 ग्रॅम वापरून खिचडी शिजवावी आणि ही खिचडी दिवसातून दोन वेळा आंबवणात मिसळून द्यावी. गाईच्या दूध काढण्याच्या वेळा नियमित असाव्यात. 

दुभत्या व गाभण गाईचे संगोपन ः सामान्य गाईच्या शरीर पोषणासाठी लागणाऱ्या खाद्याव्यतिरिक्त दुभत्या गाईंना दूध उत्पादनाच्या 40 ते 50 टक्के जादा खुराक द्यावा. गाई धुऊन स्वच्छ ठेवाव्यात. कोणताही रोग झाल्यास त्यावर ताबडतोब उपचार करावेत. गाभण गाईंना गाभण काळातील शेवटच्या दोन ते अडीच महिन्यांत दीड ते अडीच किलो समतोल आहार द्यावा. विण्याच्या अगोदर 7 ते 8 दिवसांपासून पचनास सोपे व हलके खाद्य खाऊ घालावे. दररोज दोन तास फिरण्याचा व्यायाम द्यावा. प्रसूतीच्यावेळी अडचण येत असल्यास ताबडतोब पशुवैद्यकीय मदत घ्यावी. व्याल्यानंतर गाईची वार संपूर्ण पडली आहे याची खात्री करून ती त्वरित पुरून नष्ट करावी
जनावरांना नियमित खरारा करावा, नियमित अंघोळ घालावी. गोचीड हाताने प्रत्यक्ष काढून त्यांना जाळून टाकावे.
मोकाट पद्धतीऐवजी बंदिस्त गोपालनाचा अंगीकार करावा. 
गोठ्यांची व जनावरांची स्वच्छता राखावी. गोठ्यात अडगळ नको. गोठ्यातील जमीन, गव्हाण, खांब, भिंती इ. ठिकाणी फटी, खाचा, खोचा, छिद्रे नकोत. 
पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार गोचीड प्रतिबंधक कीटकनाशकांचा दक्षतापूर्वक वापर करावा. 

गोचीड प्रतिबंधक कीटकनाशकांच्या फवाऱ्याने गोठ्याचा परिसर, जमीन, भिंती फवारून घ्याव्यात, फटी, खाचा, खोचा, छिद्रे नष्ट करावीत. 
गोठ्याभोवती दलदल नको, झाडे, झुडपे नकोत, जेणे करून गोचिडांच्या पुनरुत्पादनास मदत होईल. गोठ्याभोवती 1-1.5 इंचाचा पाण्याचा पाट असावा. 
उंदीर, घूस यांसारख्या प्राण्यांचा बंदोबस्त करावा. सहायकांमार्फत तसेच इतर साधनांमार्फत गोचिडांचे संक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी. 

गोचीडनाशक वापरताना घ्यावयाची काळजी ः 
वरील गोचीडनाशके वापरताना डॉक्‍टरांचे मार्गदर्शन व उत्पादक कंपनीच्या सूचना काळजीपूर्वक अमलात आणाव्यात. 

एकच एक औषध नेहमी वापरण्याऐवजी विविध प्रकारची औषधे वापरावीत जेणे करून प्रभावी गोचीड निर्मूलन साध्य करता येईल. 
कीटकनाशक फवारणी वारा असताना, किंवा पावसाळ्यात करू नये. 

जखमेच्या ठिकाणी फवारणी करू नये. 
औषधे विषारी असल्यामुळे विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी. 
विषबाधेचे लक्षण दिसल्यास प्रथम भरपूर पाण्याने जनावरास अंघोळ घालावी व तत्काळ पशुवैद्यकांची मदत घ्यावी. 

अशा रीतीने व्यापक उपद्रव मूल्य असणाऱ्या व पशुसंवर्धनातील उत्पन्नाच्या 15 टक्केपर्यंत उत्पन्नाच्या नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या गोचिडांच्या नियंत्रणास व निर्मूलनास सातत्यपूर्ण व प्रामाणिक प्रयत्नांची नितांत आवश्‍यकता आहे.

व्यावसायिक दूध उत्पादनाच्या दृष्टीने होलस्टिन फ्रिजीयन, जर्सी या जातींना मागणी आहे. होलस्टिन फ्रिजीयन ही जात एका वेतात 6,000 लिटर दूध देते. दुधामध्ये स्निग्धता 3.5 टक्के असते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेली फुले त्रिवेणी ही जात आपल्या वातावरणात दूध उत्पादनाच्या दृष्टीने चांगली आहे. 

ही संकरित गाय अधिक दूध उत्पादन, अधिक फॅट, उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असणारी जात आहे. या जातीचे वितातील सरासरी दुग्धोत्पादन 3,000 ते 3,500 लिटर असून, दुधातील फॅटचे प्रमाण 3.8 ते 4.2 टक्के आहे. 

फुले त्रिवेणी वळूचे गोठीत वीर्य गोसंशोधन व विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर (दूरध्वनी क्र. 02426 - 243361) यांच्याशी संपर्क साधावा. या प्रकल्पावर गो व्यवस्थापनाबाबत माहिती मिळू शकेल.

दुधाळ जनावरांची निगा ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी गोठे हे शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेले असावेत. दुधाळ जनावरे व्यायल्यानंतर 60 ते 90 दिवसांत फळवली पाहिजेत, त्यामुळे 305 दिवसांचा दुधाचा काळ मिळेल व दोन वेतांतील अंतर 12 ते 14 महिन्यांचे राहील. गाय व्यायल्यानंतर 3 महिन्यांनी गर्भधारणा झाली पाहिजे. 
त्यासाठी वीर्यदान झालेली जनावरे पशुवैद्यक अधिकाऱ्यांकडून तपासून घ्यावीत आणि गाभण असल्याची खात्री करून घ्यावी. दुधाळ जनावरांना खरारा करावा. दिवसातून तीन वेळा पाणी पाजावे. ओला व सुका चारा योग्य प्रमाणात योग्य वेळी द्यावा. गाभण म्हशींना रोज पाण्याने धुवावे. दिवसातून दोन वेळा सारख्या प्रमाणात आंबोण द्यावे. आंबोण, सुका चारा, हिरवा चारा हा जनावरांच्या वजनाच्या अडीच टक्के शुष्क प्रमाणात असावा. गाभण गाईला 1 किलो आंबोण शरीर पोषणासाठी आणि दीड किलो आंबोण गर्भारपणाच्या काळात द्यावे. तसेच पाच ते सात किलो सुका चारा व 20 किलो हिरवा चारा द्यावा. 

विण्यापूर्वी कासेला सूज आल्यास कास पिळून काढावी व कासेला पुढील सडाकडून जांघेकडे चोळावे किंवा जनावरांना थोडा व्यायाम द्यावा म्हणजे सूज कमी होईल. गाय व्यायल्यानंतर शेपटी मागील पाय, कास स्वच्छ कोमट पाण्याने धुवावी. त्यानंतर तिला कोमट पाणी प्यायला द्यावे. तसेच सुका चारा खायला द्यावा. गाईला थंड पाणी किंवा ओला चारा देऊ नये, त्यामुळे वार पडायला वेळ लागतो. वार 7 ते 8 तासांत पडली पाहिजे. व्यायल्यानंतर एका तासात जनावरांची कास पिळून चीक काढावा व तो वासराला योग्य प्रमाणात पाजावा. जनावर व्यायल्यानंतर एक किलो बाजरी, अर्धा किलो मेथी, पाव किलो गूळ, 100 ग्रॅम गोडेतेल, 100 ग्रॅम खोबरे, 50 ग्रॅम मीठ, ओवा, बाळंतशेप आणि शेपू प्रत्येकी 20 ग्रॅम वापरून खिचडी शिजवावी आणि ही खिचडी दिवसातून दोन वेळा आंबोणातून द्यावी. गाईचे दूध काढण्याच्या वेळा नियमित असाव्यात.
गोठा बांधताना गोठ्यासाठी किती खर्च झाला आहे, हे महत्त्वाचे नसून त्या गोठ्यामध्ये जनावरांचे संवर्धन किती प्रमाणात शास्त्रीय पद्धतीने करणे शक्‍य होईल व जनावरांना काय काय सुविधा आहेत हे महत्त्वाचे आहे. उत्तम गोठ्यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत. 
गोठा कमी खर्चाचा असावा. 
गोठ्यात जनावरांना चारा खाण्यासाठी उत्तम गव्हाण असावी. 


गव्हाणीची उंची अशी असावी, की त्यामुळे जनावरास सहज चारा, खाद्य खाता येईल. त्यामध्ये शेण अगर मूत्र जाणार नाही. तसेच जनावरांना गव्हाणीत पाय ठेवता येणार नाही. गव्हाण स्वच्छ करणे सोपे जाईल. 
गोठ्यामध्ये पावसाचे पाणी येणार नाही, चिखल होणार नाही, पाणी व मूत्र यांचा ताबडतोब निचरा होईल अशी रचना असावी. 
जनावरांना गोठ्यामध्ये सहज सुलभतेने बसणे व उभे राहणे शक्‍य होईल एवढी जागा असावी. 
जनावर गोठ्यात बांधल्यावर त्यांचे पाऊस, ऊन व वारा यांपासून संरक्षण झाले पाहिजे. 
गोठे हवेशीर असावेत. त्यात चांगले वायुविजन होईल, असे बांधकाम असावे. 
गोठ्यामध्ये जनावरांना पुरेसे, स्वच्छ, थंड पाणी पिण्याची सोय असावी.

Tuesday, November 12, 2013

काशीद बंधूंची आदर्श शेती मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब

सातारा जिल्ह्यातील वाघेरी (ता. कराड) येथील विजय व सुरेश भीमराव काशीद या भावंडांनी कष्ट, प्रामाणिक प्रयत्न, आधुनिक तंत्रज्ञान व मुक्त गोठा पद्धतीचा वापर या बाबींच्या जोरावर दुग्ध व्यवसायात दखलपात्र मजल मारली आहे. त्यांची ही धडपड शेतीतील तरुण पिढीला प्रेरणादायक आहे. अमोल जाधव 

शेतीची पार्श्‍वभूमी 
कराड शहरापासून उत्तरेस साधारण तेरा किलोमीटर अंतरावर वाघेरी गाव आहे. गावच्या डोंगरकुशीत काशीद यांची वडिलार्जित साडेतीन एकर शेती आहे. सतरा गुंठ्यांत घासगवत, 10 गुंठ्यांत मका, 35 गुंठे क्षेत्रात कडवळ, वीस गुंठे क्षेत्रात उसाचे पीक आहे. उर्वरित क्षेत्रात कडधान्याची पिके घेतात. शेतालगत तीन गुंठ्यांत सुसज्ज असा मुक्त संचार पद्धतीचा गोठा आहे. गाईंना फिरण्यासाठी मुक्त मैदान, स्वतंत्र पाण्याची सोय, निवाऱ्यासाठी शेड, तसेच खाद्य उपयोगी साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र खोलीही तेथे आहे. होल्स्टिन फ्रिजीयन जातीच्या 11 गाई व पाच कालवडी आहेत. सर्व जनावरे सशक्त आहेत. 

व्यवसायाला सुरवात विजय काशीद यांचे शिक्षण दहावी झाले. त्यांनी सुरवातीला नोकरीसाठी खूप धडपड केली. मात्र यश मिळाले नाही. सन 2007 पूर्वी त्यांनी तीन वर्षे चालक (ड्रायव्हर) म्हणून नोकरी केली. नोकरीऐवजी शेती व्यवसायच चांगल्या प्रकारे करण्याच्या इराद्याने त्यांनी 2007 ला दुग्ध व्यवसाय करण्याचा मनोदय आखला. सुरवातीला भांडवल नव्हते. मात्र कष्ट करण्याची तयारी असल्याने दूध खरेदीदाराकडून पन्नास टक्के रक्कम उचलस्वरूपी व उर्वरित रक्कम स्वतःकडील गुंतवून 27 हजार पाचशे रुपये खर्चून कराडमधील जनावरांच्या बाजारातून गाई घेतल्या. त्यांचे संगोपन सुरू केल्यानंतर उत्पादित दूध विक्रीतून सुमारे चार ते पाच महिन्यांत खरेदीदाराकडील उचल फिटली. त्यानंतर त्याच पद्धतीने दुसरी गाय खरेदी केली. अशा पद्धतीने पुढे चार गाईंचे सुसूत्रपणे संगोपन केले. त्यांना बंधू सुरेश यांचीही बारावीच्या शिक्षणानंतर साथ मिळू लागली. 

गोठा व्यवस्थापन चोख ठेवले दोघा भावंडांनी चिकाटीने कष्ट करत काही महिन्यांतच अंगावरील उचलीचा बोजा कमी केला. तेथून पुढे रोखीने गाई खरेदी केल्या. सुरवातीला पाच गाईंचा गोठा बांधीव होता. गाईंना स्तनदाह व जखमा होऊ लागल्याने बैठकीसाठी मॅटची सोय केली. गाईंना मोकळ्या वातावरणात हिंडता यावे यासाठी दोन वर्षांपासून मुक्त संचार पद्धतीचा गोठा बांधला. सुमारे 25 फूट रुंद व 85 फूट लांबीच्या आवारात गाईंना मुक्तपणे फिरण्याची सोय आहे. उर्वरित 15 फूट रुंद व 85 फूट लांबीच्या क्षेत्रफळात शेड आहे. गोठा उभारणीसाठी सुमारे तीन लाख 75 हजार रुपये खर्च आला. यात दूध खरेदीदाराकडून उचल घेऊन टप्प्याटप्प्याने काम पूर्ण केले. दूध काढणीवेळी गाई शेडमध्ये येतात. तेथे त्यांना वैरणीची कुट्टी व खाद्य देतात. दूध काढणीनंतर गाई मुक्त संचार करतात. मुक्त गोठ्यामुळे शेण काढणी, पाणी पाजणे, गोठ्याच्या स्वच्छतेकामी लागणारे 40 टक्के श्रम कमी झाले आहेत. त्याचबरोबर व्यवस्थापन खर्चात बचत घडली. 

दुग्धोत्पादन काशीद यांच्याकडील व्यायलेली गाय चार महिन्यांपर्यंत प्रति दिन 25 लिटर व गाभण कालावधीतील गाय चार ते सात महिन्यांच्या कालावधीपर्यंत 16 ते 17 लिटर दूध देते. प्रतिदिन एकूण सरासरी 110 लिटर दूध उत्पादित होते. प्रति लिटर सरासरी वीस रुपयांपर्यंत दर मिळतो. यातून दरमहा 66 हजारांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यातील सुमारे पन्नास ते साठ टक्के व्यवस्थापन खर्च होतो. मुक्त संचार पद्धतीमुळे रोगराई निवारणासाठी होणाऱ्या खर्चात 70 ते 80 टक्‍क्‍यापर्यंत बचत झाली आहे. खाद्य, सुकी वैरण, टंचाईवेळी आणलेल्या ओल्या वैरणीसाठीही खर्च होतो. 

दोन वर्षांपासून पैदाशीच्या वासरांचे संगोपन केले आहे. तसेच तीन ते चार वेत झालेल्या गाईंची विक्रीही केली आहे. त्यापासून उत्पन्न जोडले आहे. वडील भीमराव काशीद, आई सौ. कमल यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन व आत्मविश्‍वास मिळतो. पुढील कालावधीत प्रति दिन 225 ते 250 लिटर उत्पादन करण्याचे नियोजन आहे.

दूध खरेदीदार शाश्‍वत असल्यास हा व्यवसाय फायद्यात राहतो. असे काशीद बंधूंचे म्हणणे आहे. त्यामुळे शाश्‍वत खरेदीदाराकडेच ते दूध विक्री करतात. गोठ्यात दूध काढणी यंत्र आहे. प्रति चार मिनिटास 14 लिटर दूध काढणी क्षमता असणारे हे यंत्र आहे. भारनियमनावेळी पर्यायी व्यवस्था आहे. कष्ट व प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करण्याकडे त्यांचा कल असतो. सूत्रबद्धपणे व्यवस्थापन सांभाळल्याने विना थांबा दर्जेदार दूध उत्पादन घेणे त्यांना शक्‍य झाले आहे. 

अनुभवी शेतकऱ्यांकडील गोठ्यांना भेटी देऊन व्यवसायातील बरे-वाईट अनुभव जाणून घेतल्यानंतर त्यानुसार व्यवसाय सांभाळल्यामुळेही प्रगती साधता आली. पहाटे पाच ते सात व सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेत गोठ्यातील व्यवस्थापन, तसेच वैरण काढणीची कामे काशीद बंधू स्वतः सांभाळतात. त्यातून मजुरीचा खर्च कमी केला आहे. 

गाईंना चाऱ्याबरोबर गोळी खाद्य, सरकी पेंड आदींचा वापर होतो. मुक्त गोठा पद्धत असल्याने रोगराईचे प्रमाण नगण्य आहे. जनावरांत कृत्रीम रेतन तंत्र वापरण्याच्या दृष्टीने पशुवैद्यक गोठ्यावर येतात. 

नैसर्गिक अपघाताने गाईंचा मृत्यू झाल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी गाईंचे विमा संरक्षणही घेतले आहे. 

दूध विक्री व खाद्यदराच्या हिशेबाने व्यवस्थापन नियंत्रित ठेवतात. 

साडेतीन एकर शेती व्यवस्थापनाकडेही लक्ष दिले जाते. ऊस, घासगवत, मका, कडवळ व कडधान्ये ही पिके घेतात. शेणाचे उत्कृष्ट पद्धतीचे भुकटीस्वरूपी खत तयार होते. ते पिकांसाठी वापरले जाते. 

नोकरीच्या मागे न लागता एखाद्या कठीण प्रसंगालाही धाडसाने सामोरे जात व्यवसाय कायमस्वरूपी टिकविण्याच्या हेतूने काशीद बंधूंची धडपड सुरू आहे. काहीही झाले तरी भांडवल उशाला असल्याने ते डगमगत नाहीत. 

कष्टाची आणखी बाजू सांगायची तर काशीद यांच्या गोठ्याकडे येणारा मार्ग शेतातून आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या वाहनांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अशावेळी काशीद बंधू सायकलीला दुधाच्या किटल्या अडकवून अर्धा किलोमीटर अंतर दूध वाहतूक करतात. त्याच पद्धतीने खाद्याचीही वाहतूक करतात. दरमहा दोन ट्रेलर शेणखत मिळते. वर्षाकाठी पंधरा ट्रेलर शेणखत विकून त्यामधील रकमेतून सुकी वैरण विकत आणतात. उर्वरित शेणखत शेतात वापरतात. 

संपर्क - विजय काशीद, 9011921272 
सुरेश काशीद, 9921572634

आठ तरुणांनी यशस्वी केला दुग्ध व्यवसाय

एकत्र आलो अन दुग्धव्यवसायातून प्रगती झाली.. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सासोली, कुडासे (ता. दोडामार्ग) या गावांमधील आठ तरुणांनी एकमेकांना साहाय्य करीत धवलक्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे. परिसरातील बाजारपेठेचा अभ्यासकरीत टप्प्याटप्प्याने या युवकांनी दुग्धोत्पादनातून आर्थिक प्रगती साधली. गेल्या तीन वर्षांतील त्यांची ही प्रगती इतरांना प्रेरणा देणारी आहे. शिवप्रसाद देसाई 
सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या रांगामध्ये गोव्याच्या हद्दीला लागून असलेली सासोली आणि कुडासे ही नारळ, सुपारी बागायती असलेली गावे. या भागातील बहुसंख्य कुटुंबांचे भात, नारळ-सुपारीचे लागवड क्षेत्र मर्यादित असल्यामुळे मुंबई-गोव्यात नोकरी हा अर्थार्जनाचा मुख्य स्रोत. अशा या पारंपरिक मानसिकतेला छेद देत या गावातील मनोज गवस, अनिरुद्ध फाटक, सज्जन धाऊसकर, चिंतन सिद्धये, आनंद घाडी, समीर ठाकूर, रामकृष्ण ठाकूर आणि अरुण नाईक या तरुणांनी पशूपालनामध्ये स्वतःचे "करिअर' घडविले. आत्मविश्‍वास आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. 

आम्ही एकत्र आलो... सन 2010 मध्ये "लुपिन फाउंडेशन' या सेवाभावी संस्थेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन कार्यशाळा आयोजित केली होती. नोकरीच्या शोधात असलेले हे तरुण कार्यशाळेमध्ये सामील झाले. यातून त्यांना पशूपालनाचा मार्ग दिसला. प्रशिक्षणातून हे समविचारी तरुण एकत्र आले. त्यांच्या गावापासून गोवा राज्य पाच किलोमीटरवर असल्याने दुधाला चांगली बाजारपेठही उपलब्ध होती. याचा अंदाज घेऊन पहिल्या टप्प्यात प्रयोग म्हणून "नाबार्ड'च्या योजनेतून "लुपिन'च्या मार्गदर्शनाने एक - दोन होल्स्टिन फ्रिजियन गाई घेण्याचा निर्णय या तरुणांनी घेतला. गेल्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने या तरुणांच्या गोठ्यातील दोन गाईंची संख्या 13 ते 20 गाईंपर्यंत पोचली आहे. 

दुग्धव्यवसायातून साधली आर्थिक प्रगती... दुग्धव्यवसायाबाबत माहिती देताना सासोली गावातील मनोज रामचंद्र गवस म्हणाले, की घरची दोन एकर भातशेती, थोडी नारळ, सुपारीची झाडे आहेत. शेती सांभाळात पहिल्यादा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला; परंतु त्यामध्ये म्हणावा तसा नफा मिळत नव्हता. याच दरम्यान कार्यशाळेतून दुग्धव्यवसायाची माहिती मिळाली. बाजारपेठेचा अभ्यास करून सन 2010 मध्ये पहिल्यांदा एक जर्सी आणि एक होल्स्टिन फ्रिजीयन गाय जिल्हा बॅंकेच्या कर्ज योजनेतून खरेदी केली. या काळात परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांशी संपर्क वाढविला. त्यांच्याकडून गाईंच्या व्यवस्थापनाची माहिती घेतली. गटातील मुलांच्या बरोबरीने चर्चा करून गाईंचे व्यवस्थापन ठेवले. पाच-सहा महिन्यांत दुग्धव्यवसायातून मिळणारा नफा पाहिल्यानंतर गाईंची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. गाईंना पुरेसा हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी दोन एकरांवर चारा पिकांची लागवड केली. 

असे आहे गाईंचे व्यवस्थापन - 1) गाईंच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी 30 मीटर लांब आणि 10 फूट रुंदीचा हवेशीर गोठा बांधला. गाईंना चारा कुट्टी खाता येईल आणि पाणी पिता येईल अशी गव्हाण बांधली. गोठा धुतलेले पाणी, गोमूत्र वाहून जाण्यासाठी कडेला नाली बांधली. नालीतून हे पाणी गोठ्याबाहेरील खड्यात जमा होते. ही शेण, गोमूत्राची स्लरी शेतकऱ्यांना विकली जाते. 
2) खाद्य साठवणुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. सहा महिने पुरेल ऐवढे भात पिंजार, कडबा साठविला जातो. चारा कुट्टीसाठी यंत्र आहे. 
3) सध्या गोठ्यात 16 होल्स्टिन फ्रिजियन आणि चार जर्सी गाई आहेत. त्यातील 15 गाई दुधावर आहेत. 
4) सकाळी चार वाजता गाई आणि गोठा धुऊन गाईंना पशुखाद्य दिले जाते, यंत्राने धारा काढल्या जातात. त्यानंतर चारा कुट्टी दिली जाते. चारा संपल्यानंतर गव्हाण साफ करून पाणी पाजले जाते. त्यानंतर गाई रवंथ करतात. 
5) एक होल्स्टिन फ्रिजियन गाय दिवसाला 18 लिटर तर जर्सी गाय 12 लिटर दूध देते. दुधाळ गाईंना दररोज सकाळ- संध्याकाळ मिळून पाच किलो पशुखाद्य आणि सरासरी 20 किलो सुक्का आणि हिरवा चारा कुट्टी करून दिला जातो. 
6) संध्याकाळी सहा नंतर पुन्हा गाई धुऊन धारा काढल्या जातात. चारा, पाणी दिले जाते. 
7) गाईंना पशुतज्ज्ञांच्याकडून शिफारशीनुसार लसीकरण, कृत्रिम रेतन केले जाते. गाईंचे आरोग्य चांगले असल्याने दुग्धोत्पादनात सातत्य आहे. 
8) गवस स्वतः गाईंचे व्यवस्थापन ठेवतात. मदतीला दोन मजूर आहेत. 
9) आता गोठ्यातच कालवडी तयार केल्या जातात. प्रत्येक गाईंचे आरोग्य आणि दुग्धोत्पादनाची नोंद ठेवली जाते. 
10) सध्या दररोज सकाळ, संध्याकाळ मिळून 150 लिटर दूध गोव्यातील कुमयामळे या गावातील डेअरीला दिले जाते. स्वतःच्या गाडीतून दूध डेअरीला पोचविले जाते. दुधाला सरासरी 22 रुपये दर मिळतो आहे. रोजचे पशुखाद्य, मजुरी, चारा, वाहतूक असा खर्च वजा जाता 1500 रुपये शिल्लक राहतात. सध्या पशुखाद्य, जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापन खर्चात वाढ होत आहे. 
11) गवस शेणखताचा वापर स्वतःच्या भातशेती, आंबा, काजू बागेसाठी करतात. पीक उत्पादनवाढीसाठी याचा फायदा झाला आहे. उरलेले शेणखत परिसरातील शेतकऱ्यांना विकले जाते. दर वर्षी दहा हजार रुपये शेणखतातून मिळतात. 

संपर्कः मनोज गवस - 9673866603 

गटचर्चेतून प्रगती... दुग्धव्यवसायातील प्रगतीबाबत मनोज गवस म्हणाले, की आम्ही आठ जण जनावरांच्या व्यवस्थापनाबाबत चर्चा करतो. एकत्रित चारा, पशुखाद्य खरेदी केले जाते. एकमेकांच्या सल्ल्याने गाई, म्हशींची खरेदी करतो. कोल्हापूर जिल्ह्यातील पशुपालकांच्या गोठ्याला भेटी देऊन व्यवस्थापन समजाऊन घेतो. जमा- खर्चाची नोंद करतो. त्यानुसार काटेकोर नियोजन केले जाते. पशुतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते. आम्ही सुधारित पद्धतीने गोठे बांधले आहेत. पहिल्यांदा लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता; परंतु हेच लोक आता आमच्याकडे प्रशिक्षणाला येतात. 

ऍग्रोवन ठरला मार्गदर्शक... या तरुणांनी ऍग्रोवनमधील पशुपालनाविषयीचे तांत्रिक लेख, यशोगाथांचा संग्रह केला आहे. त्यातून पशुव्यवस्थापनाच्या टिप्स मिळतात. प्रत्येकाने सुधारित पद्धतीने चारा लागवड केली आहे. काहींनी कराराने जमिनी घेऊन चारा लागवड केली. दोघा जणांनी शेळीपालनाला सुरवात केली आहे. गांडूळ खत प्रकल्प उभारण्याचे प्रत्येकाचे नियोजन आहे. 

अनुभवाचे बोल... कृषी शिक्षणाचा पुरेपूर वापर... 
सासोलीचा रोहित गवस हा कृषी पदविकाधारक आहे. त्याच्या गोठ्यात 10 संकरित गाई आणि पाच कालवडी आहेत. आंबा, काजू बागायतीच्या बरोबरीने दोन एकर चारा पिके आणि केळी लागवड त्याने केली आहे. शेती आणि पशुपालनातील नवीन माहिती गटातील तरुणांना तो सातत्याने देत असतो. 
रोहित गवस - 7798644057 

पॅकिंग करून दुधाची विक्री अनिरुद्ध फाटक याच्याकडे सध्या दहा जर्सी गायी आणि तीन म्हशी आहेत. दीड एकर शेती आहे. यामध्ये चारा पिकांची लागवड केली आहे. बाजारपेठेचा विचार करून म्हशीचे दूध अर्धा लिटर, पाव लिटरच्या पिशवीत पॅकिंग करून विकतो. चाळीस रुपये लिटर या दराने म्हशीच्या दुधाची विक्री होते. गाईचे दूध डेअरीला दिले जाते. येत्या काळात परिसरातील बागायतदारांना शेणखत, गांडूळ खत तयार करून विकण्याचे त्याचे नियोजन आहे. 
अनिरुद्ध फाटक - 9850550819 

म्हैसपालन ठरले फायद्याचे... चिंतन सिद्धये या तरुणाने कला शाखेतून पदवी आणि नंतर संगणक क्षेत्रातील पदविका मिळविली. नोकरी न करता वडिलोपार्जित शेती-बागायतीत तो रमला. शेतीला जोडधंदा म्हणून त्याने म्हैसपालन सुरू केले. सध्याच्या त्याच्या गोठ्यात 12 म्हशी आहेत. वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी चारा पिकांची लागवड केली आहे. पशुपालन व्यवसाय शेतीप्रगतीला फायदेशीर ठरला आहे. 
चिंतन सिद्धये - 9764231509 

सुधारित व्यवस्थापनाकडे... सज्जन धाऊसकर हे सुमारे 15 वर्षांपासून दुग्धव्यवसायात आहेत. या तरुणांच्याकडून सुधारित तंत्राची माहिती त्यांनी आता होल्स्टिन फ्रिजियन आणि जर्सी संकरित गायी घेऊन दुग्धव्यवसाय वाढविला आहे. 
सज्जन धाऊसकर-8275381476 

अनुकरणातून दुग्धव्यवसायात प्रगती... अरुण नाईक मालवाहू रिक्षा व्यवसाय करतात. थोडीफार शेतीही आहे. या तरुणांनी केलेला यशस्वी व्यवसाय पाहून त्यानेही यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याच्याकडे सध्या सहा जर्सी गायी आहेत. शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. 

इतरांनी केले अनुकरण... कुडासे-वानोशीवाडी हे आनंद घाडी यांचे गाव. नारळ-सुपारी हा येथील उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. त्यांनी पशुसंवर्धन व्यवसाय निवडला आणि यशस्वीही केला. सध्या त्यांच्या गोठ्यात 14 होल्स्टिन फ्रिजियन आणि जर्सी गाई आहेत. त्यांचे अनुकरण गावातील तरुणांनी केले आहे.