Showing posts with label शेतकरी. Show all posts
Showing posts with label शेतकरी. Show all posts

Friday, January 30, 2015

हायड्रोपोनिक्‍स तंत्राने करा हिरव्या चाऱ्याची निर्मिती

हायड्रोपोनिक्‍स तंत्राद्वारे उत्पादित केलेला हिरवा चारा हा पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या हिरव्या चाऱ्यापेक्षा सकस असतो. चाराटंचाई परिस्थितीत कमी खर्चामध्ये हिरवा चारा निर्मितीचा हा चांगला पर्याय आहे. प्रा. कपिल इंगळे 
1) हायड्रोपोनिक्‍स चारा तयार करण्यासाठी बांबू, तट्या, प्लॅस्टिक ट्रे, 50 टक्के क्षमतेचे शेडनेट, मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर सिस्टिम व टायमर यांची गरज असते. 
2) या साधनसामग्रीचा वापर करून 72 स्क्वेअर फूट जागेत बसेल असा 25 फूट x 10 फूट x 10 फूट आकाराचा सांगाडा अवघ्या 15 हजार रुपये खर्चात तयार होतो. 
3) यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवा चारा तयार करता येतो. 
4) चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली याचा वापर केला जातो. धान्याला ई.एम.च्या द्रावणात बीजप्रक्रिया करावी लागते. 
5) हे धान्य 12 तास भिजत ठेवून, 24 तास गोणपाटात अंधाऱ्या खोलीत ठेवावे. 
6) त्यानंतर प्लॅस्टिक ट्रेमध्ये (3 फूट x 2 फूट x 3 इंच ) साधारणतः 1.5 ते 1.75 किलो बी पसरावे. 
7) अशा प्रकारे प्रतिदुभत्या जनावरांना दहा ट्रे या प्रमाणे जनावरांच्या संख्येवरून ट्रेची संख्या ठरवावी. 
8) हे प्लॅस्टिक ट्रे हायड्रोपोनिक चारा निर्मिती गृहात सात ते आठ दिवस ठेवावेत. 
9) एक इंची विद्युत मोटारीला लॅटरलची जोड देऊन फॉगर पद्धतीद्वारे प्रत्येक दोन तासाला पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून सात वेळा पाणी द्यावे. एका दिवसासाठी 200 लिटर पाणी लागते. ही यंत्रणा स्वयंचलित आहे. पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न हायड्रोपोनिक्‍स चाऱ्यास पाणी देता येते. 
10) चाऱ्याची 7 ते 8 दिवसांत 20 ते 25 सें.मी. उंचीपर्यंत वाढ होते. साधारणपणे एक किलो गव्हापासून नऊ किलो, तर एक किलो मक्‍यापासून 10 किलो हिरवा चारा तयार होतो. 

चारा देण्याचे प्रमाण - - भाकड जनावरे 6 किलो प्रतिदिवस प्रतिजनावर. 
- दुभती जनावरे 15 किलो प्रतिदिवस प्रतिजनावर.

हायड्रोपोनिक्‍स चाऱ्याचे फायदे - 1. चारा टंचाई परिस्थितीत हिरवा चारा निर्मितीचा चांगला पर्याय. 
2. कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक चारानिर्मिती. 
3. जनावरांना 90 टक्के चारा पचतो. 
4. पशुखाद्याचा खर्च 40 टक्के कमी. 
5. जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ. 
6. दुधाच्या फॅटमध्ये वाढ. किमान अर्धा लिटरने दुधात वाढ. 
7. जनावरांची प्रजनन क्षमता सक्षम होते. 
8. जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वाच्या उपलब्धतेत वाढ. 
9. जमिनीवर चारा उत्पादन घेण्याच्या तुलनेत 5 ते 10 टक्के पाण्याची आवश्‍यकता आहे. 
10. प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटीऑक्‍सिडंट्‌स, फॉलिक ऍसिड, ओमेगा-3, स्निग्ध पदार्थ हरितद्रव्य मोठ्या प्रमाणात असतात. 

प्रा. कपिल इंगळे 8380984068 
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे विषय विशेषज्ञ (कृषी विद्या) म्हणून कार्यरत आहेत.) 

Monday, September 22, 2014

शिराळा (जि. सांगली) येथील 35 शेतकरी करतात ऍझोलानिर्मिती

पशुपालनामध्ये सर्वांत महत्त्वाचा व मोठा खर्च हा पशुखाद्याचा असतो. हा खर्च मर्यादित ठेवताना जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. अशा वेळी ऍझोलासारखे आरोग्यदायी पूरक खाद्य पशुखाद्यात फायदेशीर ठरते. शिराळा (जि. सांगली) येथील 35 पेक्षा अधिक शेतकरी ऍझोलानिर्मिती व सातत्यपूर्ण वापर करत आहेत. श्‍यामराव गावडे 
सांगली जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील शिराळा तालुक्‍यामध्ये शेती ही डोंगरकपारीमध्ये केली जाते. डोंगरावरील गवताचा लाभ घेत अनेक शेतकरी जोडीला पशुधन सांभाळतात. पशुधन जपण्यासाठी त्यांच्या खाद्य व्यवस्थेमध्ये ऍझोलासारख्या शैवाल वर्गीय वनस्पती वापर वाढविण्यासाठी तालुका पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्‍यात रेड, उपळावी, मांगले, बिऊर परिसरात 35 शेतकऱ्यांनी ऍझोलानिर्मितीची युनिट उभी केली आहेत. यांतील ऍझोलाचा वापर दुधाळ जनावरांच्या खाद्यामध्ये पूरक केला जात आहे. बियाणे म्हणून ऍझोला महाराष्ट्रासह कर्नाटकातील लोकांनी नेला आहे. 

अशी झाली सुरवात शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पशुसंवर्धन विभागातील डॉ. शिवराज पवार हे प्रशिक्षणासाठी गेले होते. या प्रशिक्षणामध्ये ऍझोलाचे फायदे व त्याची निर्मिती या संदर्भात माहिती मिळाली. शिराळा तालुक्‍यामध्ये ऍझोलाचा पशुखाद्यात वापर वाढल्यास शेतकऱ्यांच्या लाभात वाढ होऊ शकते, या उद्देशाने विभागामार्फत ऍझोला निर्मिती व प्रसार सुरू केला. सुरवातीला शिरवळ येथून 200 रुपये प्रति किलोप्रमाणे ऍझोला बियाणे आणले. 

ऍझोला काय आहे... - ऍझोला ही पाण्यावर वाढणारी शैवालवर्गीय वनस्पती आहे. 
- झाडाच्या सावलीत, छपरात, बाहेर थोडीशी सावली करून ऍझोला वाढवता येते. 
- जनावरांच्या खाद्यामध्ये त्याचा पूरक म्हणून वापर करता येतो. तसेच भातशेतीमध्ये खत म्हणून गाडल्यास त्यातून नत्र उपलब्ध होते. 
- शुष्क ऍझोलामध्ये 25 ते 35 टक्के प्रथिने असून, खनिजांचे प्रमाण 10 ते 15 टक्के असते. अमिनो आम्ले 7 ते 10 टक्के असतात. हे जनावरांसाठी पचनाला हलके असून, अन्य चाऱ्यांच्या पचनाला मदत करते. 

अशी करता येते ऍझोला निर्मिती - घराच्या अंगणात, परसदारात साधारणपणे सावली असलेल्या ठिकाणी किमान नऊ फूट लांब व सहा फूट रुंद व नऊ इंच खोलीचा खड्डा करून घ्यावा. सावली नसल्यास 50 टक्के सावलीचे शेडनेटचे आच्छादन करून घ्यावे. 
- तळाची बाजू समपातळीत करावी. त्यातील प्लॅस्टिक फाटू नये या उद्देशाने खडे, दगड काढून घ्यावेत. त्यावर पॉलिथिनचा पेपर पसरावा. काठाकडील बाजूला दुमडून त्यावर छोटे दगड ठेवावेत. 
- खड्ड्यामध्ये पॉलिथिन पेपरवर चांगल्या चाळलेल्या मातीचा अडीच ते तीन इंचाचा एक थर द्यावा. 
- वरील सहा इंच उंचीपर्यंत पाण्याने तो खड्डा भरावा. 
- त्यामध्ये एक ते दोन किलो शेण, तीस ग्रॅम सिंगल सुपर फॉस्पेट यांचे मिश्रण खड्ड्यात ओतावे. 
- या पाण्यावर साधारण एक किलो ऍझोला बियाणे सोडावे. 
- ऍझोलाची वाढ होऊन साधारणपणे आठ ते दहा दिवसांत ऍझोलाने वाफा भरतो. 
- दररोज त्यातील ऍझोला काढून जनावरांच्या पशुखाद्यासोबत द्यावा. एका जनावराला साधारणपणे अर्धा ते एक किलो ऍझोला दिल्यास फायदा होतो. 
- ऍझोला निर्मितीमध्ये इएम सोल्युशन आणि खनिज मिश्रणाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास अधिक फायदा होतो. 

* पशुसंवर्धन विभागाचे सहकार्य शिराळा तालुका पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने सुरवातीला शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून ऍझोलानिर्मितीकडे वळवले. कामधेनू योजनेतून प्लॅस्टिक कागदखरेदीसाठी पैसे दिले. 
- पशूधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. सुहास देशपांडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. शिवराज पवार यांनी ऍझोलानिर्मिती व वापरासंदर्भात वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 
- आता शेतकरी स्वतः तयार होत असून, ऍझोलावाढीतील विविध टप्प्यांतील कामे स्वतः करत आहेत. शिराळा तालुक्‍यात रेड, उपळावी, मांगले, बिउर, परिसरात 25 हून अधिक शेतकऱ्यांनी ऍझोलानिर्मितीची युनिट साकारली आहेत. 

* ऍझोलाचा कर्नाटकातही प्रसार - शिराळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ऍझोलानिर्मितीची माहिती ऐकून कर्नाटकातील उगार येथील शेतकरी दीपक शिंदे यांनी येथील बियाणे नेले आहे. कर्नाटकात ऍझोला तयार केला आहे. 
- रेड हे गाव रस्त्यालगत असल्याने महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनीही ऍझोलाचे बियाणे नेले आहे. शिराळा परिसरातील शेतकरी बियाणे म्हणून ऍझोला देताना मोफत देतात. 

यांना झाला फायदा 1) एक वर्षापूर्वी ऍझोलानिर्मिती सुरू केली. शेतात झाडाच्या सावलीत खड्डा केला आहे. माझ्याकडे चार जनावरे असून, त्यांतील दुभत्या जनावरांसाठी ऍझोला पूरक खाद्य म्हणून वापरतो. फॅटमध्ये फरक पडला आहे. तसेच दुधामध्येही अर्धा ते एक लिटरची वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना मी बियाण्यासाठी ऍझोला दिला आहे. 
- दिनकर निवृत्ती पाटील ( मो 9657811615) 

2) सध्या माझ्याकडे नऊ जनावरे आहेत. ऍझोलाचे एक युनिट आहे. मात्र, ते कमी पडत असल्याने वाढविण्याचा विचार आहे. ऍझोला पूरक खाद्यामुळे जनावरे माजावर येण्यासही मोठी मदत होते. त्यात फक्त पाणी बदलणे, शेण व फॉस्फेटचे मिश्रण टाकणे, ही कामे करावी लागतात. 
- अशोक राजाराम पाटील (मो. 9887428545) 

3) मी खड्डा न काढता अंगणातील स्लॅबवर विटा व पॉलिथीन पेपरच्या साह्याने हे युनिट केले आहे. आमच्याकडे आठ जनावरे आहेत. पाण्यातून चाळणीने ऍझोला काढून जनावरांच्या खाद्यात मिसळला जातो. ऍझोला फायदेशीर वाटत आहे. 
- सूरज दिलीप पाटील 

ऍझोलाचे फायदे -निर्मितीखर्च 9 बाय 6 खड्ड्यासाठी अंदाजे पाचशे रुपये. 
- जनावरांना पूरक खाद्य म्हणून उपयोगी. पचनास हलके. 
- दूध देणाऱ्या जनावरात दुधात अर्धा ते एक लिटरची वाढ. 
- जनावरे माजावर येण्याचे प्रमाण चांगले. 
- दूध उत्पादनखर्चात 10 टक्‍क्‍यांनी बचत. 

या अडचणी येऊ शकतात - उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ऍझोलाचा रंग हिरवट तांबडा किंवा विटकरी होतो. त्याच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच गारव्याला कुत्रे व अन्य प्राणी येऊन बसतात. त्यांच्यासाठी बाजूने खांब रोवून दोरी अथवा कापड लावून घ्यावे. 
- झाडाखाली खड्डा केला असल्यास पालापाचोळा पडून कुजल्याने ऍझोला खराब होऊ शकतो. त्यासाठी वरून आच्छादन आवश्‍यक. 
- शेण उपलब्ध उपलब्ध आहे, म्हणून अधिक वापर होतो. त्यामुळे अमोनिया निर्माण होऊन त्याचा वास ऍझोलाला येतो. योग्य प्रमाणातच शेणखत टाकावे. 
- पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यामध्ये बाहेरून पाणी येऊन ऍझोला वाहून जाऊ शकतो. अधिक पावसाच्या ठिकाणी अधिक उंचावर करावे किंवा विटाच्या साह्याने 9 इंची टाकी करावी. 

डॉ. सुहास देशपांडे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) - 9423267309 
- डॉ. शिवराज पवार, पशुधन विकास अधिकारी - 9665507510

Wednesday, January 16, 2013

गाई- म्हशींमधील कासेच्या आजारावर करा उपचार

गाई, म्हशींना कास आणि सडाचे आजार झाल्यास त्यांच्या दूध उत्पादनावर परिणाम होतो. जनावरांचे आरोग्य खालावते. त्यामुळे व्यवस्थापन खर्च वाढत जातो. हे लक्षात घेऊन गाई, म्हशींच्या कासेची तपासणी करावी. आजाराची लक्षणे ओळखून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत. 

कासेचे व सडाचे आजार हे प्रामुख्याने 1) कासेच्या व सडांच्या त्वचेचे आजार, 2) सडाच्या पोकळीमधील विकार आणि सडाच्या तोंडाचे आजार या प्रकारात विभागले जातात. कास, सडाचे रोजच्या रोज निरीक्षण करावे. सड, कासेवर हात फिरवल्यास सहजासहजी आजाराची लक्षणे दिसतात. निरीक्षण करताना सडांवर ताज्या अथवा जुन्या जखमा झाल्या आहेत का हे पाहावे. अधू झालेल्या सडाचे आकारमान, जाडी या गोष्टींची इतर सडांशी तुलना करून पाहावी. सडाच्या वरच्या भागावर जखमा नसतील, सूज नसेल तर सड दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये अथवा अंगठा व पहिले बोट यामध्ये रोल करून पाहावा. यामुळे सडांची अंतर्गत पोकळीमधील विकार दिसून येतात. शंका असल्यास मधून मधून कासेची, सडांची तसेच दुधाची तपासणी पशुवैद्यकाकडून करून घ्यावी. 

1) सडांची संख्या चारपेक्षा जास्त असणे -
गाई-म्हशींमध्ये मागच्या किंवा पुढच्या सडाच्या जोडीच्या मध्ये लहान आकाराचे सड वाढलेले असतात. अशा सडांची दूध देण्याची कार्यक्षमता जनावर व्यायल्यानंतर कळून येते. अशा सडांचा धारा काढताना अडथळा निर्माण होतो. शास्त्रीयदृष्ट्या असे आढळून आले आहे, की अशा सडांचा दूध उत्पादनावर कोणताही फायदा आढळून येत नाही. 
उपचार -
अशा सडांमधून दूध येत असल्यास उपचार नाही केला तरी चालतो. मात्र सडांमधून दूध येत नसेल आणि धार काढताना अडथळा निर्माण होत असेल तर ते सड पशुवैद्यकाकडून स्थानिक पद्धतीची भूल देऊन शस्त्रक्रिया करून काढून घ्यावे. ही शस्त्रक्रिया जनावराच्या भाकड काळामध्येच करावी. 

2) इजा होऊन सड फाटणे - 
सडांवर जखमा होणे, ओरखडणे हे गाई-म्हशींच्या तुलनेने शेळ्या-मेंढ्यांमध्ये जास्त आढळून येते. कारण त्यांच्या कासेचा आकार निमुळता असतो व सडांची लांबी जास्त असते. शेळ्यांमध्ये काटेरी झुडपांमधून चरताना कासेवर व सडांवर काटेरी जखमा होतात. गोठ्यामध्ये ओबडधोबड दगडगोटे असल्यास बसताना, उठताना कासेवर, सडांवर जखमा होतात. 
उपचार -
जखम जर त्वचेच्या वरच्या भागावर असेल तर स्वच्छ पाण्यामध्ये जंतुनाशकाचे द्रावण टाकून धुऊन घ्यावी. 
जखमेवरची सडलेली त्वचा व घाण काढून घ्यावी. जखमेवर चार ते पाच दिवस प्रतिजैविके असलेले मलम लावावे. 
जखम अतिखोल असल्यास ताबडतोब जखमेवर टाके घालून घ्यावेत. टाके घातलेल्या सडामधील दूध शक्‍यतो सायफन ट्यूब टाकून काढावे. जखम संपूर्ण बरी होईपर्यंत जखमेची स्वच्छता ठेवावी व प्रतिजैविकाचे इंजेक्‍शन द्यावे. 

3) सडांवर इजा होऊन अनैसर्गिक छिद्र पडणे (टीट फिस्टुला) -
काटेरी वनस्पतींमध्ये चरताना काट्यांची इजा होणे, तार कुंपणाची इजा होणे इत्यादी धारदार व टोकदार वस्तूच्या इजेमुळे सडांवर खोलवर जखम होऊन सडाला छिद्र पडते. 
लक्षणे - 
सडांवर कापल्यासारखी खोल जखम होते, सडांवर सूज येते, जखमेतून दूध गळती होते, जखम लहान असल्यास फक्त कास भरल्यानंतर व दूध काढताना गळती होते. जखम मोठी असल्यास नेहमी जखमेतून दूध गळती होत राहते. 
उपचार - 
जखम लहान असल्यास पोटॅशिअम परमॅंगनेटच्या खड्याने छिद्रावर दाब द्यावा व जखमेची मलमपट्टी करावी. 
छिद्राचा आकार मोठा असल्यास त्यावर शस्त्रक्रिया करून घेऊन छिद्र बंद करून घ्यावे. 
अशा प्रकारची शस्त्रक्रिया जनावराच्या भाकड काळामध्ये करून घेतल्यास फायदेशीर ठरते. मात्र दुभत्या जनावरांमध्ये तातडीचा उपाय म्हणून करावी लागते. 

4) एकमेकांना जुळलेले सड असणे - 
यामध्ये दोन किंवा अधिक सड कातडीच्या भागावर एकमेकांना जुळलेले असतात. 
उपचार - अशा सडांवर छोटीशी शस्त्रक्रिया करून एकमेकांपासून मोकळे करता येतात. 

5) कास, सडांवर चामखिळीसारख्या गाठी वाढणे -
यामध्ये सडांवर व कासेवर एक किंवा एकापेक्षा जास्त गाठी वाढलेल्या असतात. याचा प्रादुर्भाव पॅपिलोमा विषाणूंमुळे होतो. अशा गाठी संसर्गजन्य असतात. याचा प्रादुर्भाव गोठ्यातील दुसऱ्या जनावरांना होतो. काही गाठी जन्मजात असतात. 
लक्षणे - 
सडांवर किंवा कासेवर चामखिळीसारख्या गाठींची वाढ झालेली दिसून येते. याचा दूध उत्पादनावर जास्त कोणताही परिणाम होत नाही. 
गाठी तडकल्यानंतर फुटून कासेवर व सडांवर जखमा होतात व धार काढताना जनावरास वेदना होतात. धारा काढताना अडथळा निर्माण होतो. 
उपचार -
गाठी मोठ्या आकाराच्या असतील तर गाठीच्या तळाशी नायलॉनचा धागा घट्ट बांधून ठेवावा. कालांतराने रक्तपुरवठा बंद होऊन गाठ गळून पडते. छोट्या आकाराच्या जास्त गाठी असतील तर पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार मलम लावावे. 
मोठ्या आकाराच्या गाठी शस्त्रक्रिया करून घेऊन काढाव्यात. अशा गाठी काढून त्यापासून लस बनवून ती जनावरास कातडीखाली टोचली असता गाठी संपूर्णपणे नाहीशा होतात. पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ येथे लस तयार करून दिली जाते. 

6) सडामध्ये दुधाचे खडे तयार होणे -
दुधातील क्षाराचा थर जमा होऊन कालांतराने त्याचे खड्यात रूपांतर होते; परंतु अशा प्रकारचा आजार दुर्मिळ आहे. 
लक्षणे - दूध काढताना अडथळा निर्माण होतो, दुधाची धार सरळ येत नाही, सडांवर दाबून पाहिले असता खडे जाणवतात. 
उपचार - 
क्षाराचे खडे लहान असल्यास दुधावाटे आपोआप बाहेर पडतात. खडे मोठे असल्यास बाहेरून सड दाबल्यास लक्षात येते. 
असे खडे चिमट्याच्या साह्याने पशुवैद्यकाकडून फोडून घ्यावेत, दुधावाटे पिळल्यास खडे बाहेर पडतात. खडा फारच मोठा असल्यास शस्त्रक्रिया करून काढावा लागतो. 

7) सडाच्या पोकळीमध्ये पडद्याची जाळी वाढणे (टीट स्पायडर) - 
यामध्ये सडाच्या अंतर्गत पोकळीमध्ये पडदा वाढलेला असतो. त्यामुळे दूध येण्यास अडथळा निर्माण होतो. हा विकार आनुवंशिक असू शकतो. सडांची अंतर्गत वाढ संपूर्णपणे झालेली नसते. सडांवर इजा होणे, गाठ वाढणे तसेच जंतुसंसर्गामुळे होऊ शकतो. 
दूध काढण्याची अयोग्य पद्धतीमुळे हा आजार होतो. 
लक्षणे - सडातून दूध येण्यास अडथळा निर्माण होतो. अडथळ्याच्या वरच्या भागावर दूध साकळलेले असते. खालच्या भागावर पोकळी असल्याचा भास होतो. काही वेळेस सडातून दूध पूर्णपणे बंद होते 
उपचार -
पडदा लहान असेल तर हडसन स्पायरल टीट नावाच्या हत्याराने काढता येतो. अडथळा मोठा असेल तर शस्त्रक्रिया करून काढावा लागतो. जनावराच्या भाकड काळामध्येच शस्त्रक्रिया करून घ्यावी. 

8) सडाच्या पोकळीमध्ये गाठ वाढणे (टीट सिर्स्टन) -
यामध्ये सडाच्या पोकळीमध्ये अनियमित आकाराची गाठ वाढलेली असते. त्यामुळे सडामधून दूध येण्यास अडथळा निर्माण होतो. दुभत्या जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणावर हा आजार दिसतो. अयोग्य पद्धतीने दूध काढल्याने हा आजार होतो. वारंवार सडांना होणाऱ्या इजा यासाठी कारणीभूत ठरतात. 
लक्षणे - आजाराची सुरवात सडाच्या एका भागावर होते, पूर्ण सडामध्ये गाठ पसरते. गाठीचा आकार तिचे स्वरूप व मूळ कारणावर अवलंबून असतो. गाठ जर सडाच्या टोकावर असेल तर आजार बरा होण्याची शक्‍यता वाढते, मात्र गाठ खूप आतल्या भागात असेल तर उपचार करणे त्रासदायक होते. गाठीमुळे दुधाची धार नीट येत नाही. 
उपचार -
गाठ लहान असेल तर छोट्या शस्त्रक्रियेने टीट ट्यूमर एक्‍सट्राक्‍टर काढून ठीक करता येते. गाठ मोठी असल्यास मोठी शस्त्रक्रिया करून काढून घ्यावी लागते. 

9) सडाच्या तोंडाचे आकुंचन होणे (कॉन्ट्राक्‍टेड स्पिंक्‍टर) - 
सडाच्या तोंडाचे आकुंचन होऊन दूध येण्यास त्रास होतो. सडाच्या तोंडावर इजा होणे, विकार आनुवंशिक असू शकतो, अतिरिक्त गाठीची तोंडाशी झालेली वाढ ही या आजाराची कारणे आहेत. 

10) कास दाह -
दूध काढण्याची अयोग्य पद्धतीमुळे कासदाह होतो. धार काढताना दूध सहजासहजी बाहेर येत नाही. सडांवर खूप दाब द्यावा लागतो 
दुधाची धार बारीक येते व सरळ येत नाही. पूर्ण दूध काढण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो. 
उपचार - 
सूज नसेल तर सड स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. सडाचे निर्जंतुकीकरण करावे. सडाच्या तोंडाच्या छिद्रामध्ये टीट प्लग हळुवारपणे आत सरकवावा. पाच ते सहा दिवसांसाठी प्लग तसाच ठेवावा, त्यामुळे तोंडाचे प्रसारण होते. विकार बरा न झाल्यास पशुवैद्यकाकडून शस्त्रक्रिया करून घ्यावी. 

11) सडाचे तोंड मोठे होणे -
सडाच्या तोंडावर तीव्र इजा झाल्याने त्या छिद्राचा आकार मोठा झालेला असतो. त्यामुळे सतत दूध गळत राहते. 
या आजारामुळे सडातून सतत दूध गळत राहते, कासदाह होतो. 
उपचार - 
सडाच्या तोंडाशी लहान आकाराच्या सुईने ल्युगॉल्स आयोडीन टोचले असता सडाच्या तोंडाचे आकुंचन होते. 

12) सडाचे तोंड बंद होणे (ब्लाईड टीट) - 
या आजाराचे कारण आनुवंशिक असू शकते. सडाच्या तोंडावर तीव्र इजा होणे, पैलारू कालवडीमध्ये सडांची वाढ नीट झालेली नसणे या कारणाने हा आजार होतो.
आजाराची लक्षणे म्हणजे अशा सडांवर तोंडाशी छिद्र नसते, सडामध्ये दूध असते मात्र दूध बाहेर येत नाही 
उपचार -
पशुवैद्यकाकडून सुईच्या साह्याने सडास छिद्र करून घ्यावे. जखम बरी होईपर्यंत जखमेवर मलम लावावे. 

... असे आहेत कास, सडांचे आजार -
1) चारपेक्षा जास्त सड असणे, एकमेकांना चिकटलेले सड, जुळलेले सड 
2) सडाच्या बाह्य भागावरील जखमा. 
3) सडांना अनैसर्गिक छिद्र पडणे, फिस्टुला तयार होणे 
4) सडांवर आणि कासेवर चामखिळीसारख्या गाठी वाढणे, सडावरच्या कातडीवर चिरा पडणे 

सडाच्या पोकळीमधील आजार -
1) पोकळीमधील अंतर्गत झालेली गाठीची वाढ 
2) मुतखड्याप्रमाणे दुधाचे खडे तयार होणे 
3) सडाच्या पोकळीमध्ये पडद्याची वाढ होणे 
4) सडांची पोकळी पूर्णतः अथवा अर्धवट बंद होणे 

सडाच्या तोंडाचे आजार - 
1) सडाच्या तोंडाचे आकुंचन पावणे, सडाच्या तोंडाचे छिद्र मोठे होणे 
2) सडाच्या तोंडाचे छिद्र फाटणे, सडाचे तोंड बंद होणे 

संपर्क - डॉ. शाहीर गायकवाड - 9004226664 
(लेखक पशुवैद्यकीय शल्यचिकित्सा विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

Sunday, January 13, 2013

दुग्ध व्यवसायातील कष्टाने दिली आर्थिक प्रगतीची संधी...

सातारा जिल्ह्यातील मसूर (ता. कऱ्हाड) येथील किशोर जगदाळे यांनी शेतीच्या बरोबरीने दुग्ध व्यवसायातही चांगला जम बसविला आहे. पशू व्यवस्थापनातील बारकावे लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने त्यांनी म्हशींची संख्या वाढवत नेत दुग्ध व्यवसाय किफायतशीर केला आहे. दुग्ध व्यवसायातील त्यांचे अनुभव मार्गदर्शक आहेत. 

सातारा जिल्ह्यातील मसूर (ता. कऱ्हाड) येथील किशोर निवृत्ती जगदाळे सात वर्षांपूर्वी स्थानिक बॅंकेत पिग्मी एजंट म्हणून काम करत होते. यासाठी त्यांना मसूर गावासह कोरेगाव तालुक्‍यातील गावांमध्ये रोजची सुमारे 30 किलोमीटरची फिरती व्हायची. त्यातून महिन्याकाठी चार हजारांचा मोबदला मिळायचा; परंतु स्वतःची शेती विकसित करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. नोकरीच्या फिरतीमधून त्यांना शेतीमधील पीक बदल आणि दुग्ध व्यवसायाची माहिती लोकांकडून मिळत गेली. या माहितीतून त्यांनी सन 2003 पासून वडिलोपार्जित शेतीच्याबरोबरीने टप्प्याटप्प्याने दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. एकाचवेळी 10 ते 15 म्हशी खरेदी न करता पहिल्यांदा एका म्हशीपासून त्यांनी दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. पुढे आर्थिक जोखमीचा अंदाज घेत त्यांनी एकीच्या दोन, दोनच्या चार, चारच्या आठ या सूत्राने गोठ्यात म्हशी वाढविल्या. म्हशींपासून मिळणारे शेण न विकता चांगल्या पद्धतीने शेणखत तयार करून स्वतःच्या शेतीला वापरले, त्यामुळे जमिनीचा कसही सुधारला, त्यामुळे पीक उत्पादनही वाढले. गेल्या सात वर्षांत दुग्ध व्यवसायात प्रगती करताना त्यांनी खपेल एवढ्या दुधाची घरातूनच हातविक्री केली. या दुग्ध व्यवसायातून आता त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिरावले आहे. 

टप्प्याटप्प्याने वाढविल्या म्हशी - 
शेती आणि दुग्धोत्पादनाबाबत श्री. जगदाळे म्हणाले, की माझ्याकडे वडिलोपार्जित साडेचार एकर शेती आहे. शेतीच्या बरोबरीने घरी दोन बैल, दोन म्हशी आणि एक गाय होती. त्यामुळे जनावरांच्या व्यवस्थापनाची माहिती होती. शेतीच्या बरोबरीने दुग्ध व्यवसाय करायचा असल्याने भांडवलाचा प्रश्‍न होता. हाती घेतलेला व्यवसाय टिकावा आणि वाढावा या हेतूने सुधारित तंत्रज्ञानाची माहिती घेतली. दुग्ध व्यवसायाला सुरवात करताना मुऱ्हा आणि मेहसाणा जातीच्या दोन म्हशी विकत घेतल्या. त्याबरोबरीने वडिलांनी सांभाळलेल्या म्हशींचेदेखील चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले. गोठ्यातच रेडक्‍यांचे चांगले नियोजन केले. पुढील टप्प्यात गोठ्यात चांगल्या म्हशी ठेवण्याच्यादृष्टीने भांडवल गोळा करून चार मुऱ्हा म्हशी विकत घेतल्या. जनावरांच्या बाजारात खरेदीचा अनुभव नसल्याने पहिल्यांदा म्हैस खरेदीमध्ये फसवणूक झाली, त्यामुळे दूध उत्पादन घटले; परंतु न डगमगता अभ्यासू पशुपालक, पशुतज्ज्ञ तसेच दै. "ऍग्रोवन'मध्ये आलेल्या पशुपालनासंबंधी लेखांच्या वाचनातून म्हशींचे व्यवस्थापन सुधरविले. या अभ्यासाचा व्यवसायात उपयोग केल्याने पुढे म्हशींची निवड करताना फसगत झाली नाही. म्हैस खरेदीसाठी कोणतेही कर्ज न घेता एकीच्या दोन, दोनच्या चार, चारच्या आठ म्हशींच्या पैदाशीतून गोठ्याचा विस्तार वाढवला. शेती तसेच पशुपालनाचा व्याप वाढल्याने नोकरी सोडून दिली. सध्या माझ्याकडे मुऱ्हा जातीच्या 11, मेहसाणा जातीची एक आणि मुऱ्हा जातीचा संकर केलेल्या तीन म्हशी अशा एकूण 15 म्हशी, चार रेडक्‍या, एक मुऱ्हा जातीचा रेडा आहे. 

म्हशींचे व्यवस्थापन -
म्हशींच्या व्यवस्थापनाबाबत श्री. जगदाळे म्हणाले, की सुरवातीपासून स्वभांडवल उभारणीच्या मूलमंत्राचा उपयोग मला चांगला झाला, त्यामुळे केवळ गोठ्याच्या नूतनीकरणासाठी बॅंकेचे 65 हजारांचे साहाय्य घ्यावे लागले. त्यातून तीन टप्प्यांत गोठा व मजुरांना निवाऱ्याची सोय केली आहे. बॅंकेची नोकरी सोडल्याने मला अडीच लाख रुपये इतका फंड मिळाला, त्यातून ट्रॅक्‍टरची खरेदी केली. वैरणीसाठी कुट्टी मशिन घेतले आहे. गोठ्यातील व्यवस्थापनासाठी दोन मजूर आहेत. गोठ्याची इमारत राहत्या घराइतकी सुसज्ज ठेवली आहे. तीन टप्प्यांत 44 फूट बाय 44 फूट आकाराचा गोठा बांधला आहे. गोठ्यात दोन फूट रुंद आणि तीन फूट उंचीची गव्हाण आहे. गव्हाणीपासून मलमूत्राच्या नाल्यापर्यंत साधारण 14 फुटांचे अंतर राखले आहे. दोन म्हशींतील अंतर पाच फुटांचे राखून दावण केली आहे. 

गोठ्यातील व्यवस्थापन पहाटे साडेचारला सुरू होते. शेण बाजूला केल्यानंतर प्रत्येक म्हशीला वीस किलो ओला व वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी दिली जाते. दूध उत्पादनानुसार म्हशींना पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार पशुखाद्य मिश्रण दिले जाते. रेडकांना वयानुसार चारा व पशुखाद्य देतो. चाऱ्याच्या बरोबरीने गहू भुश्‍श्‍याचा वापर करतो. सकाळी सहा वाजेपर्यंत दूध काढणी पूर्ण होते. त्यानंतर म्हशींना गव्हाणीत पाणी पिण्यासाठी दिले जाते. जनावरांच्या पाण्यासाठी शेतातील विहिरीतून दोन हजार फूट पाइपलाइनने बांधीव टाकीत पाणी सोडले आहे. त्या टाकीतील पाणी योग्य उतार देऊन सायफन पद्धतीने गव्हाणीत सोडले जाते. सकाळी दूध काढल्यानंतर जनावरे व गोठा स्वच्छ केला जातो. दुपारी साडेतीनच्या दरम्यान मजूर गोठा स्वच्छ करतात. चार वाजता ठरलेल्या प्रमाणानुसार चारा व खाद्यमिश्रण दिले जाते. त्यानंतर पाचपर्यंत दूध काढणी पूर्ण होते. 

एका मुऱ्हा म्हशीपासून प्रति दिन सरासरी 12 लिटर, मुऱ्हा संकर असलेल्या एका म्हशीपासून दहा लिटर आणि मेहसाणा म्हशीपासून प्रति दिन 12 लिटर दूध मिळते. म्हशींच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी खासगी पशुवैद्यकाचा सल्ला घेतला जातो. वेळेवर लसीकरण केले जाते, तसेच योग्यवेळीच रेतन केले जाते. 

सद्य:स्थितीत प्रति दिन सरासरी 100 ते 120 लिटर दूध उत्पादन होते. त्यापैकी खपेल एवढ्या दुधाची घरातूनच हातविक्री होते. दुधाची गुणवत्ता चांगली असल्याने रतीब आणि ठरलेली गिऱ्हाईके घरी येऊन दूध खरेदी करतात. हातविक्रीच्या दुधातून नफ्याची अपेक्षा न ठेवता बाजारभावापेक्षा दोन रुपये कमी दराने विक्रीचे धोरण ठेवले आहे, त्यामुळे दुधाला चांगली मागणी असते. सध्या प्रति दिन 40 लिटर दुधाची हातविक्री होते. दुधाच्या हातविक्रीचे काम पत्नी सौ. वंदना, मुले श्‍वेता व शुभम पाहतात. हातविक्रीतून उरलेले दूध गावातील खासगी डेअरीस दिले जाते. डेअरीमध्ये फॅटच्या हिशेबाने दर मिळत असल्याने चांगला नफा मिळतो. शेतातील व्यवस्थापनासाठी वडिलांची मदत होते. 

चाऱ्याचे नियोजन - 
साडेचार एकरांपैकी गोठा, वैरण ठेवण्यासाठी आणि दळणवळणासाठी 10 गुंठे जागा ठेवली आहे. उरलेल्या क्षेत्रात उसाबरोबर सोयाबीन, भुईमूग, चारापिकांची लागवड केली जाते. चाराटंचाईच्या काळात काही गुंठ्यांतील उसाचा वापर चाऱ्यासाठी केला जातो. काही वेळेस चाऱ्यासाठी ऊस विकत घेतला जातो. परिसरातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन आणि गव्हाचे सुमारे 25 ट्रेलर भुसकट गोळा करून ठेवले आहे. गरजेनुसार कडबा विकत घेतला जातो. जवळच्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर सुमारे सहा महिने दररोज साधारण पाचशे रुपयांचे ऊसवाढे चाराकुट्टीसाठी विकत घेतले जातात. म्हशींना चारा कुट्टी करून दिला जातो. 

गेल्या सात वर्षांत दूध व्यवसायातून श्री. जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळाले. दिवसेंदिवस वाढलेले खतांचे दर व मजुरीवर मात करीत त्यांनी स्वकष्टातून शेती समृद्ध करण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. स्वतःच्या शेतीबरोबर दुसऱ्याची दोन एकर शेती त्यांनी निम्म्या हिश्‍श्‍याने कसण्यास घेतली आहे. या वर्षी त्यांनी दीड एकरावर हळदीची लागवड केली आहे. सव्वा दोन एकर ऊस लागवडीतून 125 टन उत्पादन मिळते. गोठ्यामुळे त्यांच्याकडे शेणखत मोठ्या प्रमाणात तयार होते; परंतु या शेणखताची त्यांनी आतापर्यंत एकदाही विक्री केलेली नाही. सर्व शेणखत ते स्वतःच्या शेतीसाठी वापरतात. यामुळे जमिनीचा पोत सुधारून पीक उत्पादन वाढले आहे. 

श्री. जगदाळे यांची दुग्ध व्यवसायातील उलाढाल.... 
जून 2011 ते डिसेंबरअखेरची मिळकत ः 
1) 8400 लिटर दुधाच्या हातविक्रीतून ः दोन लाख 68 हजार 800 रुपये (दर प्रति लिटर 32 रुपये). 
2) डेअरीला 14 हजार 700 लिटर दुधाच्या विक्रीतून ः चार लाख 11 हजार 600 रुपये (दर प्रति लिटर सरासरी 28 रुपये). 
3) आतापर्यंत एकूण व्यवस्थापन खर्च ः तीन लाख 83 हजार 400 रुपये (प्रति दिन सरासरी 1800 रुपये). 

संपर्क - श्री. जगदाळे - 9850813601