Wednesday, April 17, 2013

काटेकोर नियोजनातून रेड्डी बंधूंनी मिळवले दुग्धोत्पादनात यश

सावली माऊली (जि. नागपूर) येथील रेड्डी बंधूंनी स्वतःच्या हॉटेलसाठी पूरक म्हणून छोटा गोठा सुरू केला होता. त्यात हळूहळू जनावरांच्या संख्येत वाढ होत दुग्धोत्पादनाचा व्यवसाय चांगलाच वाढला आहे. केवळ दर्जेदार दुधाची विक्री करून न थांबता ते प्रक्रिया पदार्थ निर्मिती आणि विक्रीतून चांगला फायदा मिळवत आहेत.- देवेंद्र वानखेडे 
सावली माऊली (ता. कळमेश्‍वर, जि. नागपूर) येथील मनवर ऊर्फ मुन्ना रेड्‌डी नागपूर शहरातील हॉटेल व्यावसायिक आहेत. हॉटेल व्यवसायासाठी आवश्‍यक असणाऱ्या ताज्या भाज्या आणि दूध यांचे उत्पादन आपणच करावे, या उद्देशाने सुरवातीला शेती आणि नंतर पशुपालनाकडे वळले. शेतीसाठी त्यांनी सावली माऊली येथे 22 एकर शेती विकत घेतली, त्यामध्ये ते पारंपरिक पद्धतीने भाजीपाल्याचे उत्पादन घेत असत. त्यातून जमीन आहे, पाणी आहे, मजूर आहेत, त्यांचा पुरेपूर वापर करण्यासाठी दूध उत्पादनाकडे वळले. हॉटेलपुरते दूध उत्पादन हाच त्यांचा मुख्य उद्देश होता, त्यासाठी त्यांनी आठ मुऱ्हा म्हशी आणि दहा हरियाणवी गाई विकत घेतल्या. टुमदार गोठा बांधून त्यांनी म्हशी- गाईंचे संगोपन सुरू केले. आपल्या हॉटेलमध्ये लागणारे 40 लिटर दूध इथपर्यंतच हा दुग्धव्यवसाय त्यांनी मर्यादित ठेवला. 

वृत्तीने व्यावसायिक असलेले रेड्‌डी बंधू शेतीत नवीन पीक आणि तंत्र राबविण्याविषयी कृषी अधिकारी आणि तज्ज्ञांकडे सातत्याने चाचपणी करीत होते. मात्र, त्यांचे पशुपालन पाहिलेल्या तज्ज्ञांनी त्यांनी दुधाचाच व्यवसाय वाढविण्याचा सल्ला दिला. दर्जेदार दुधाला असलेली मागणी पाहून त्यांनी या व्यवसायात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मग त्यासाठी त्यांनी एकदम 25 मुऱ्हा म्हशी विकत घेत आपल्या गोठ्यात वाढ केली. मजुरांची संख्या वाढविली. 

जनावरांचे व्यवस्थापन... रेड्‌डींनी शेतातील पाण्याचे नियोजन करत चाऱ्यासाठी नेपियर गवताचे क्षेत्र पाच एकर, मका पिकाचे चार एकरपर्यंत वाढविले. या हिरव्या चाऱ्यासोबत अन्य पशुखाद्याचाही मेळ बसवला. पशुखाद्य बनविण्यासाठी पिठाची चक्की घेतली आहे. त्यात धान्यापासून पशुखाद्य बनविले जाते. कडबा, हिरवा चारा आणि पशुखाद्य यांचा योग्य वापर ते जनावरांसाठी करतात. 
- जनावरांतील आजार कमी राहण्यासाठी जनावरांचा गोठा स्वच्छ असलाच पाहिजे, हा त्यांचा दंडक आहे. वेळच्यावेळी लसीकरण करतानाच पशुवैद्यकांच्या मदतीने जनावरांवर बारीक लक्ष ठेवले जाते. 
- प्रत्येक जनावराने रोजच्या प्रमाणात दूध दिले की नाही, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. 
- दिवसातून दोन वेळा जनावरांना पाण्याने स्वच्छ केले जाते. 

गोठा व संगोपनगृह... आता त्यांच्याकडे एकूण 48 जनावरे आहेत. त्यांच्या निवाऱ्यासाठी त्यांनी दोन गोठे बांधले आहेत. जनावरांना मोकळे फिरता यावे, यासाठी त्यांनी तीन एकर शेती तारांचे कंपाउंड टाकून बंदिस्त केली आहे. सकाळी दूध काढणी झाल्यावर या सर्व जनावरांना मोकळ्या जागेत सोडण्यात येते. या कंपाउंडमध्ये काही प्रमाणात खाद्य आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे. 

आणि व्यवसाय फायद्यात आला... दुग्धोत्पादनाची सुरवात जरी हॉटेलच्या दूध गरजेसाठी झाली असली, तरी व्यवसाय वाढविल्यानंतर त्यांच्याकडील दुधाचे प्रमाण वाढले. बाहेरील डेअरी आणि अन्य मार्गांचा अवलंब त्यांनी विक्रीसाठी करून पाहिला; मात्र त्यातून त्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर दुधाच्या प्रक्रियेकडे लक्ष दिले. शहरात डेअरी सुरू करतानाच दुधापासून पनीर आणि दही तयार करण्याचे युनिट चालू केले. त्यांची विक्री सुरू केली, तरीही दूध शिल्लक राहत असल्याने त्यांनी बासुंदी, चक्‍का तयार करण्याचे काम सुरू केले. त्यांनी तयार केलेल्या पदार्थांना चांगली मागणी येऊ लागली. या पदार्थांच्या सोबतच दुधाचीही मागणी वाढली, त्यामुळे रेड्‌डी बंधूंची दुधाच्या विक्रीसाठीची काळजी संपली. आता ग्राहकच त्यांच्या दुधाची आणि दुधापासून तयार केलेल्या पदार्थांची वाट पाहत असल्याचे दिसून येते. 

गोठा तंत्रज्ञान... - जनावरांसाठी शेण-मूत्राचा निचरा होण्यासाठी योग्य उतार व गटरची सोय असलेला गोठा तयार केलेला आहे, तरीही गोठ्याची नियमित सफाई, शेण लगेच उचलण्यासाठी मजुरांना ते तत्पर ठेवतात. 
- दूध काढणी आणि अन्य कामांसाठी त्यांचा मजुरांवरच विश्‍वास आहे. अद्याप दूध काढणीचे यंत्र घेतलेले नाही. यंत्राचा वापर आणि स्वच्छता यासाठी स्वतः गोठ्याच्या परिसरामध्ये थांबण्याची आवश्‍यकता त्यांना वाटते, कारण दूध काढण्याच्या यंत्राची स्वच्छता योग्य प्रकारे न झाल्यास अनेक समस्या उद्‌भवू शकतात. 
- सध्या चारा कटाई आणि मिक्‍सिंग यासाठी यंत्राचा वापर केला जातो. 

दर्जेदार उत्पादन... मनवर ऊर्फ मुन्ना रेड्‌डी यांनी आपल्या उत्पादनाच्या दर्जावर विशेष लक्ष दिले आहे.
- विनाकारण रासायनिक औषधांचा वापर टाळला जातो. नैसर्गिक चारा आणि पशुखाद्य देण्यावर त्यांचा भर असतो. 
- जनावरांचे दूध काढताच ताजे दूध ग्राहकांपर्यंत पोचते केले जाते. 
- प्रक्रिया उद्योगातही कुठल्याही अन्य पदार्थांचा वापर केला जात नाही. उत्पादनाचा दर्जा व चव सातत्याने स्थिर ठेवली जाते. ग्राहकांची वाढती मागणी हेच त्यांच्या मालाच्या गुणवत्तेचे निदर्शक ठरत आहे. 

प्रगतीच्या दिशेने वाटचाल... रेड्‌डी बंधूंनी महाराष्ट्रातील अनेक अत्याधुनिक डेअरी प्रकल्पांना भेटी दिल्या असून, त्यांच्या व्यवस्थापन आणि पद्धतींचा आपल्या गोठ्यावर वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. 
- कृषी प्रदर्शनांना भेट देणे हा त्यांच्या आवडीचा विषय असून, महाराष्ट्रात कुठेही चांगले प्रदर्शन ते शक्‍यतो चुकवीत नाहीत. त्यातून आपल्याला नवे काही करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे ते सांगतात. 

उत्पन्नाचे अर्थशास्त्र... - सध्या त्यांच्याकडील 48 म्हशींपैकी 18 गाभण आहेत. अन्य म्हशींपासून 10 ते 12 लिटरप्रमाणे सुमारे 300 लिटर दूध मिळते. 
- गाई दहा असल्या तरी जास्त दुधाची एकच होलस्टिन फ्रिजीयन गाय आहे, ती दिवसाला 25 लिटर दूध देते. इतर जर्सी आणि गावरानी गाईंचे मिळून रोज 75 लिटर दूध होते. 
- दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री ते स्वतःच्या रेड्डीज गोकुळ डेअरीतून करतात. गाईचे दूध 45 रुपये लिटर, तर म्हशीचे 55 रुपये लिटरने विक्री केली जाते. या दराबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. शिल्लक दुधापासून विविध प्रकारची मिठाई बनवली जाते. त्याचप्रमाणे ऑर्डरप्रमाणे बासुंदी, दही, पनीर तयार करून विकत असल्याने अधिक नफा मिळतो. 
- खाद्यासाठी तूर, मका, गव्हांडा, चना कुटार यांचा ते वापर करतात. हिरवे गवत जनावरांना दोन्ही वेळेस दिले जाते. यासाठी त्यांना 58 जनावरांसाठी 5800 रुपये खर्च येतो. 
- जनावरांच्या कामासाठी दहा मजूर त्यांच्याकडे आहेत, त्यांच्या रोजच्या मजुरीसाठी दोन हजार रुपये खर्च होतो. 
- दूध विक्रीतून त्यांना साधारणपणे म्हशीच्या दुधाचे 16,500, तर गाईच्या दुधाचे 3375 रुपये रोज मिळतात. एकूण 19,875 रुपये मिळतात. यातून मजुरी, चारा, औषध व वाहतुकीचा खर्च साधारणपणे 9 हजार होतो. हा खर्च वजा केल्यास दहा हजार रुपये निव्वळ नफा उरतो. 
- जनावरांचे गोळा होणारे शेण आणि मूत्र यांचा वापर स्वतःच्या शेतासाठी खत म्हणून करतात, त्याची विक्री केली जात नाही. 

संपर्क - 
मनवर ऊर्फ मुन्ना रेड्‌डी, संचालक, रेड्डीज गोकुळ डेअरी 
9326666382 

गव्हांकुराच्या चाऱ्यातून दुधाळ गाईंचे केले पोषण

विंचुर्णी (ता. फलटण, जि. सातारा) येथील अनिल निंबाळकर यांनी दुष्काळी स्थितीतही चारा, पाणी व पशुखाद्य व्यवस्थापनात समतोल साधत दुग्ध व्यवसाय टिकवला आहे. पाण्याअभावी चारा उत्पादनाचे क्षेत्र घटले असताना निंबाळकर यांनी हायड्रोपोनिक्‍स तंत्राने गव्हांकुराच्या चाऱ्याची निर्मिती केली. त्यामुळे दुष्काळी स्थितीतही गाईंना पोषक आहार मिळतो आहे. 
अमोल जाधव 
फलटणच्या दक्षिणेस नऊ किलोमीटरवर विंचुर्णी हे गाव आहे. हे गाव पूर्णतः दुष्काळीपट्ट्यात येते. या गावात अनिल केशवराव निंबाळकर यांची 22 एकर शेती आहे. पाणीपुरवठ्यासाठी एक विहीर असून पाण्याच्या उपलब्धतेनुसार जिरायती पिके आणि जनावरांसाठी चाऱ्याची लागवड केली जाते. सन 1983 पासून निंबाळकर दुग्ध व्यवसायात आहेत. त्यांच्याकडे सहा होल्स्टिन फ्रिजीयन गाई, आठ कालवडी आणि तीन मुऱ्हा म्हशी आहेत. चाऱ्यासाठी त्यांच्याकडे ऊस, नेपिअर गवताच्या डीएचएन-6 जातीची तसेच कडवळाची लागवड असते. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची कमतरता भासत आहे. चाऱ्याच्या कमतरतेमध्ये जनावरांना पोषक आहार देण्यासाठी त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून गाईंच्या आहारात ऍझोला तसेच गव्हांकुराचा वापर सुरू केला आहे. या दोन्ही घटकांच्या आहारातील वापरामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत झाली आहे. हा पर्याय त्यांना फायदेशीर ठरला आहे. 

...असे आहे गाईंचे व्यवस्थापन - - पाच वर्षांपूर्वी निंबाळकरांनी मुक्त संचार पद्धतीने गाईंचे संगोपन सुरू केले. गोठ्यातच एका बाजूला सावलीसाठी शेड असून तेथे गाईंना पाणी व गव्हाणीची सोय केली आहे. सकाळी सहा वाजता यंत्राद्वारे दूध काढणी केली जाते. त्यानंतर प्रत्येक गाईस 15 किलो गव्हांकुराचा चारा आणि सात किलो ओला व वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी दिली जाते. 
- गोठ्यातील टाकीत पाणी भरलेले असते, त्यामुळे गाई दिवसभर गरजेनुसार पाणी पितात. 
- सायंकाळी चार वाजता प्रत्येक गाईला दहा किलो ओला व वाळलेला चारा कुट्टी तसेच अर्धा किलो सरकी पेंड, दीड किलो गव्हाच्या भुसा, एक किलो ऍझोला, वीस ग्रॅम खनिज मिश्रण एकत्र करून दिले जाते. दररोज 15 ते 20 किलो मूरघास गाईंना दिला जातो. सायंकाळी सहा वाजता यंत्राद्वारे दुधाची काढणी होते. 
-मुक्त संचार पद्धतीमुळे गाईंना चांगला व्यायाम होतो, त्या चांगल्याप्रकारे रवंथ करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहून दुधात सातत्य टिकते. गाईंना अंग घासण्यासाठी गोठ्यात मध्यभागी खांब उभा केला आहे. त्यावर गाईंना गरजेनुसार अंग घासता येते. 
- दर तीन महिन्यांनंतर पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार जंतनिर्मूलन आणि शिफारशीनुसार लसीकरण केले जाते. 
- गाई माजावर आल्यावर कृत्रिम रेतन पद्धतीचा वापर करून भरविल्या जातात. 
- तीन म्हशींसाठी स्वतंत्र गोठा बांधला आहे. 

हायड्रोपोनिक्‍स तंत्राने गव्हांकुर चारानिर्मिती - दुग्ध व्यवसायाच्यादृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाईंसाठी सकस चाऱ्याची उपलब्धता. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यावर विचार करत असताना निंबाळकरांना फलटण येथील गोविंद दूध डेअरीच्या माध्यमातून गव्हांकुरापासून चारानिर्मितीचा मार्ग गवसला. त्यांनी कृषी संशोधन केंद्र, मडगाव (गोवा) येथील गव्हांकुर चारानिर्मिती प्रकल्पांना भेट देऊन शास्त्रीय माहिती घेतली. गव्हांकुर निर्मिती करण्याच्या यंत्रणेची किंमत 15 लाख रुपये आहे. निंबाळकरांनी त्यातील तंत्र समजून घेऊन घरालगतच शेडनेटच्या साहाय्याने 15 x 10 फूट आकाराची खोली तयार केली. एका बाजूला दरवाजा बसवला. या खोलीत एकावेळी 75 ट्रे बसतील अशी सोय केली. 

गव्हांकुर तयार करताना सुरवातीला वीस लिटर पाण्यात 12 किलो उच्च प्रतीचा गहू 12 तास भिजविला जातो. त्यानंतर पाण्यातून काढून हा गहू पोत्यामध्ये 12 तास दडपून ठेवला जातो. त्यामुळे गव्हाला लवकर कोंब फुटतात. कोंब फुटलेले दीड किलो गहू तीन x दोन फूट आकाराच्या ट्रेमध्ये एकसारखे पसरून ठेवले जातात. हे ट्रे शेडनेटमधील कप्प्यात ठेवले जातात. गव्हांकुरला पाणी देण्यासाठी शेडमध्ये फॉगर्स बसविलेले आहे. त्यास टायमर लावला आहे. दर दोन तासांनंतर या खोलीत पाच मिनिटे पाणी फवारले जाते. शेडसह या तंत्रासाठी त्यांना 30 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. साधारण आठ दिवसांत हे गव्हांकुर सहा इंचांपर्यंत वाढतात. दीड ते दोन किलो गव्हापासून 14 किलो हिरवा चारा तयार होतो. जमिनीवर एक किलो हिरवा चारा तयार करण्यासाठी 60 ते 80 लिटर पाणी लागते. सदरच्या पद्धतीने चारा तयार करताना दोन ते तीन लिटर पाण्यामध्ये एक किलो हिरवा चारा तयार होतो. या तंत्रज्ञानातून दररोज 100 ते 120 किलोपर्यंत हिरवा चारा उपलब्ध होतो. त्यासाठीची साखळी त्यांनी व्यवस्थित बसवली आहे. दररोज उत्पादित होणारा चारा जनावरांना खाण्यास दिल्यानंतर कोंब आलेले गहू पुन्हा ट्रेमध्ये पसरून ठेवतात. या ट्रेमध्ये आठ दिवसांत गव्हांकुर तयार होतात. 

...असे झाले फायदे गव्हांकुराचा चारा अत्यंत पाचक असून त्याचे शरीरात 90 टक्‍क्‍यांपर्यंत पचन होते. यामुळे गाईंना पोषक आहार मिळाल्याने गाईंचे आरोग्य चांगले राहते. गाईंच्या दुधाची प्रत सुधारली आहे. पूर्णतः पांढरट दूध तयार झाल्याने त्यास चांगली चवही मिळते. या पद्धतीने मक्‍यापासूनही चारा तयार करता येतो. गव्हांकुरापासून चारानिर्मिती करण्यासाठी प्रतिकिलो केवळ दोन रुपये खर्च येतो. यासाठी मनुष्यबळ कमी लागते. गव्हांकुराच्या वापरामुळे 35 टक्के चारा व 50 टक्के पशुखाद्याची बचत झाल्याचे निंबाळकर सांगतात. 

"ऍग्रोवन'मधून मिळाले ऍझोला निर्मितीचे तंत्र.... - निंबाळकरांना दै. ऍग्रोवनमधून ऍझोला निर्मिती तंत्राची माहिती मिळाली. तसेच शिरवळ (ता. खंडाळा) येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील ऍझोला प्रात्यक्षिकाची पाहणी केली. त्यानंतर गोविंद डेअरीतील पशुतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी 18 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 20 सें.मी उंचीचे सिमेंट कॉंक्रिटचे दहा वाफे तयार केले. 
-वाफ्यातील संपूर्ण पाणी बाहेर काढण्यासाठी तळाला एक पाइप बसवली आहे. वाफ्याच्या खोलीपासून आठ सेंटिमीटर उंचीवर दुसरी पाइप बसविली. याद्वारे दर पंधरा दिवसांनी वाफ्यातून 25 टक्के पाणी काढून घेतले जाते. हे पाणी पिकाला दिले जाते. वाफ्याच्या खोलीपासून 12 सेंटिमीटरवर तिसरी पाइप बसवली आहे. त्याद्वारे शेडवरून पावसाचे पडणारे पाणी वाहून न जाता त्या पाइपमधून सर्व वाफ्यात समांतर पाणी राहण्याची व्यवस्था केली आहे. या वाफ्यांच्या निर्मितीसाठी त्यांना 45 हजार रुपये खर्च आला आहे. 
- वाफ्यामध्ये एका चौरस मीटरसाठी पाच किलो चाळलेली काळी माती, दोन किलो शेण स्लरी, 50 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 10 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून पाणी बारा इंचापर्यंत भरले जाते. सुरवातीला प्रत्येक वाफ्यात ऍझोलाचे एक किलो बियाणे सोडले जाते. ऍझोला ही तरंगती व शेवाळवर्गीय वनस्पती आहे. त्यांची वाढ होऊन 10 ते 12 दिवसांमध्ये पूर्ण वाफे भरले जातात. या वाफ्यातून एक चतुर्थांश ऍझोला दररोज काढून घेतला जातो. हा ऍझोला चाऱ्यासोबत जनावरांना पुरविला जातो. ही नत्र स्थिरीकरण करणारी वनस्पती असून जनावरांमध्ये अन्न पचनासाठी ती उपयुक्त ठरते. 

ऍझोलाचे फायदे - सध्या दररोज आठ वाफ्यांमधून 20 किलो ऍझोला मिळतो. ऍझोलामुळे पशुखाद्यामध्ये बचत झाली. यामध्ये प्रथिनांचे चांगले प्रमाण आहे. गाईंना ऍझोला खायला दिल्यानंतर दूध उत्पादनात फरक जाणवला. ऍझोला देण्याअगोदर 3.8 ते 4.0 पर्यंत दुधास फॅट होती. 28.5 ते 29 पर्यंत डिग्री तसेच 8.2 ते 8.5 पर्यंत एसएनएफ होता. त्याचबरोबर दुधात प्रोटिनचे प्रमाण 2.87 ते 2.92 मिळायचे. ऍझोलाचा वापर सुरू केल्यानंतर 4.1 ते 4.4 पर्यंत फॅट पोचली. डिग्री 31 व 9.1 पर्यंत एसएनएफ पोचला. तर 3.1 ते 3.3 पर्यंत प्रोटिनचे प्रमाण मिळत आहे.ऍझोलाच्या वापरामुळे त्यांना 25 टक्‍क्‍यांपर्यंत पशुखाद्याची बचत करता आली आहे. 

उत्पन्नाचे गणित - दिवसाला प्रति गाईपासून सरासरी 12 लिटर दूध मिळते. सध्या सहा गाईंपासून 70 लिटर दूध जमा होते. उत्पादित दुधाची गुणवत्ता चांगली असल्याने डेअरीकडून इतर उत्पादकांपेक्षा सरासरी तीन ते सहा रुपये प्रतिलिटरला दर वाढवून मिळत आहे. दरमहा दुग्ध व्यवसायातून त्यांना 40 ते 45 हजारांचे उत्पन्न मिळते. मुक्त संचार पद्धतीचा गोठा असल्याने मजूर खर्च अजिबात नाही. निंबाळकर स्वतः व त्यांची पत्नी सौ. छाया तसेच मुले ओंकार व प्रथमेश गोठा व्यवस्थापन सांभाळतात. खाद्य व इतर खर्च वगळता प्रतिमहिना वीस हजार निव्वळ नफा मिळतो. 

शेतीमध्ये कोणतेही रासायनिक खत न वापरता पूर्णपणे शेणखताचा वापर करतात. कंपोस्ट व गांडूळ खतही ते शेतावरच तयार करतात. पाण्याची उपलब्धता असणाऱ्या जवळच्या शेतकऱ्यांशी करार करून हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेतात. वर्षाकाठी गोठ्यातून पाच जातिवंत कालवडी तयार होतात. त्या गाभण राहिल्यानंतर विकतात. यातून दरवर्षी दीड लाखाचे उत्पन्न मिळते. त्यांनी प्रत्येक गाईचा विमाही उतरवला आहे. निंबाळकरांनी गोठ्यालगत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्राचीही उभारणी केली आहे. 

संपर्क - अनिल निंबाळकर - 9922576549 
(सर्व छायाचित्रे - अमोल जाधव) 

पशुखाद्यासाठी ऍझोला

ऍझोलामध्ये आवश्‍यक अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे, क्षार आणि शरीर वाढीसाठी आवश्‍यक घटक मुबलक प्रमाणात आहेत. ऍझोलामध्ये उच्च प्रथिने आणि कमी लिग्निन असल्याने जनावरे ऍझोला सहज पचवू शकतात. ऍझोलाचे घरच्या घरी कमी खर्चात उत्पादन घेणे शक्‍य आहे. डॉ. देवेंद्र जाधव, डॉ. आझाद कादरभाई 
ऍझोलामध्ये विविध खाद्य घटक जसे प्रथिने, आवश्‍यक अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे (अ, ब आणि बीटा कॅरोटिन), क्षार (कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, लोह, तांबे, मॅग्नेशिअम) व शरीरवाढीसाठी आवश्‍यक घटक मुबलक प्रमाणात असतात. शुष्क घटकांच्या प्रमाणानुसार, ऍझोलामध्ये 25-35 टक्के प्रथिने, 10 ते 15 टक्के क्षार आणि 7 ते 10 टक्के अमिनो आम्ले, जैविक घटक पॉलिमर असतात. ऍझोलामध्ये उच्च प्रथिने आणि कमी लिग्निन असल्याने जनावरे ऍझोला सहज पचवू शकतात. जनावरांना ऍझोला थेट अथवा खुराकात मिसळून देता येते. गाई, म्हशी, शेळी, वराह, कोंबड्यांना ऍझोलाचा खाद्य म्हणून वापर करता येतो. 

...असे घ्या ऍझोला उत्पादन * ऍझोला लागवड करावयाच्या ठिकाणच्या जमीन समतल करावी. 
* वाफा तयार करण्यासाठी विटांची 2 मी. x 2 मी.चौरसाकृती रचना करावी. 
* 2 मी. x 2 मी. आकाराचे प्लॅस्टिकचे कापड विटांनी बनविलेल्या चौरसाकृती खड्ड्यामध्ये अंथरावे. 
* 10 ते 15 किलो चाळून घेतलेली चांगली माती खड्ड्यामध्ये पसरावी. 
* दोन किलो शेण, 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट हे 10 लिटर पाण्यात मिसळून एकजीव करून खड्ड्यात कागदावरील मातीवर पसरवून गादी करावी. त्यावर पाण्याची पातळी 10 सें.मी. होईपर्यंत पाणी टाकावे. बायोगॅस युनिटमधील स्लरी व जनावरांच्या गोठ्यातील, स्वयंपाक घरातील वाया जाणारे पाणीदेखील ऍझोला खड्ड्यात वापरता येऊ शकते. 
* त्यामध्ये 500 ग्रॅम ते एक किलो ऍझोलाचे कल्चर समप्रमाणात पसरावे. त्यावर ताजे पाणी शिंपडावे. 
* एक आठवड्यात ऍझोला चांगले वाढते. जाड हिरव्या गालिच्याप्रमाणे दिसू लागते. 
* 20 ग्रॅम सुपर फॉस्फेट व एक किलो शेणाचे पाण्यातील मिश्रण पाच दिवसांपासून एकदा या खड्ड्यात मिसळावे. जेणेकरून ऍझोलाची वाढ झपाट्याने होऊन दैनंदिन 500 ग्रॅम उत्पादन मिळेल. 
* शिफारशीनुसार मॅग्नेशिअम, लोह, तांबे, सल्फर इ. क्षार असणारे मिश्रण दर आठवड्याला यात मिसळावे. 
* दर महिन्यातून एकदा पाच किलो चाळलेली माती या खड्ड्यात मिसळावी, यामुळे मातीतील जास्तीचे नायट्रोजन जमा होऊन अन्नघटकांची कमतरता होणार नाही. 
* दर सहा महिन्यांनी गादीमधील माती, पाणी बदलावे. नवीन ऍझोला कल्चर यात सोडावे. 
* जर ऍझोलामध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्याची विल्हेवाट लावून नव्याने ऍझोला लागवड करावी. 
* सुरवातीच्या लागवडीनंतर 15 दिवसांनी रोज उत्पादन मिळू शकते. ऍझोला गोळा करण्यासाठी चाळणी वापरावी. 
* ऍझोला वेगाने वाढतो आणि रोज 500 ते 600 ग्रॅम ऍझोला उत्पादन मिळू शकते. 
* गोळा केलेला ऍझोला स्वच्छ पाण्यात धुवावा जेणेकरून त्याचा शेणाचा वास निघून जाईल. 
* ऍझोला वाढीसाठी तापमान 20 ते 28 अंश सेल्सिअस, स्वच्छ सूर्यप्रकाश, 60 ते 80 टक्के आर्द्रता योग्य प्रमाणात पाणी (पाच ते 12 सें.मी.) आणि सामू चार ते 7.5 इतका योग्य असतो. 

ऍझोला उत्पादनाबाबत थोडेसे महत्त्वाचे - * ऍझोला धुण्याच्या वेळी जाळीवर धुतला तर छोटे वाढ न झालेले ऍझोलाचे तुकडे चाळून बाहेर येतात. हे तुकडे पुन्हा ऍझोला खड्ड्यामध्ये सोडावेत. 
* तापमान 25 अंश सेल्सिअसचे आत राखल्यास वाढ जोमाने होते. 
* ऍझोला खड्ड्याच्यावर शेडनेट बांधल्यास तीव्र सूर्यप्रकाशापासून त्याचे संरक्षण होईल. 
* उत्पादित ऍझोला रोजचे रोज काढणे आवश्‍यक आहे. अन्यथा, खड्ड्यामध्ये ऍझोला वाढीसाठी कमी जागा उरेल. 
* दुधाळ जनावरांवर घेतलेल्या चाचण्यांद्वारे असे सिद्ध झाले आहे, की रोजच्या आहारात दोन ते तीन किलो ऍझोला मिसळला तर जनावरांच्या दुधात सर्वसाधारणपणे 15 ते 20 टक्के वाढ होते. 
* दुग्ध उत्पादनात कोणताही बदल न होता, ऍझोला हे जनावरांच्या खुराकासाठी 15 ते 20 टक्के इतक्‍या प्रमाणात योग्य बदली खाद्य म्हणून वापरता येते. शिवाय दुधाची गुणवत्ता वाढते. जनावरांची तब्येत चांगली राहून आयुष्यमान वाढते. 

संपर्क - डॉ. कादरभाई - 9763707898 
(लेखक पशुवैद्यकीय चिकित्सालय, सातारा येथे कार्यरत आहेत.)

सुधारित तंत्र व व्यवस्थापनासून साकरला दुग्घव्यवसाय

जोडधंद्याची जोड दिल्यास शेती फायदेशीर ठरते. शिवाय जोडधंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचे जीवनमानही उंचावते. सोनार कामाचा पारंपरिक व्यवसाय सुरू ठेवीत पुसद (जि. यवतमाळ) येथील उमेश पंधे यांनी भोजला येथे पंधे डेअरी फार्म सुरू केला. गाई-म्हशींची सुयोग्य देखभाल व गोठा व्यवस्थापन ते करतात. दर दिवशी 150 लिटर दुधाच्या संकलनातून नफाही समाधानकारक मिळत आहे. आमीन चौहान 
उमेश व गणेश पंधे बंधूंकडे वडिलोपार्जित सहा एकर ओलिताची शेती आहे. पारंपरिक शेती करीत असतानाच या बंधूनी नोव्हेंबर 2011 मध्ये म्हैस विकत घेतली. त्यापासून बारा लिटर दूध दररोज मिळायचे. निम्मे दूध घरी ठेवून उर्वरित दुधाची ते घरूनच विक्री करीत. दुधाचा दर्जा चांगला ठेवल्याने मागणी वाढू लागली. त्याप्रमाणे व्यवसाय वाढविण्याचा निर्णय पंधे बंधूंनी घेतला. परभणी बाजारातून सहा जाफराबादी व चार मुऱ्हा म्हशी, तर नगर जिल्ह्यातील लोणी येथून 11 होलस्टिन फ्रिजीयन व एक फुले- त्रिवेणी अशा गाई विकत घेतल्या. आज त्यांच्याकडे 11 म्हशी व 12 गाई आहेत. 

-जाफराबादी म्हशीच्या दुधाला फॅट चांगला मिळतो, तर फुले त्रिवेणीपासून भरपूर दूध मिळते. 
-मुऱ्हा म्हशी स्वभावाने काहीशा चंचल असल्या तरी भरपूर दूध देतात. मात्र जाफराबादीच्या तुलनेत दूध पातळ असते.

...असे आहे गोठा व्यवस्थापन * जनावरांना बाराही महिने हिरवा चारा पुरविण्याचे नियोजन 
* वर्षभर पुरेल एवढा कोरडा चारा विकत घेऊन साठवला जातो. 
* कडबा कुट्टीद्वारे जनावरांना दिला जातो. 
* वर्षभर चाऱ्यासाठी एक एकरात मका व यशवंत फुले गवताची लागवड 
* तोंडखुरी व पायखुरी या रोगांसाठी नियमित लसीकरण, कासदाह रोग होऊ नये यासाठी काळजी. 
* गोठ्यातील शेण ट्रॉलीद्वारे उचलले जाते. 
* गोठा रोज धुऊन स्वच्छ केला जातो. 
* दर आठवड्याला जनावरांची तपासणी 
-जनावरांच्या निगेसाठी एक जोडपे ठेवले आहे. 
-जनावरांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी पशुचिकित्सक 
-पिण्याच्या पाण्यासाठी गोठ्यातच पाइपलाइनद्वारे व्यवस्था 

गाई व म्हशींच्या देखभालीसाठी 50 x 35 फुटाचे लोखंडी अँगलचे शेड. वरती कापडी आच्छादन व खाली सिमेंटचा बेड. दोन्ही बाजूला सिमेंटच्या पक्‍क्‍या गव्हाणी. गोठ्यात 'टेल टू टेल' पद्धतीने जनावरे बांधली जातात. एका बाजूने गाई तर दुसऱ्या बाजूने म्हशी बांधतात. गाईंसाठी मुक्त संचार गोठा पद्धत सुरू केली आहे. 

दुधाची काढणी यंत्राद्वारे होते. गोठा धुण्यासाठी पंधे यांनी स्वतःची पद्धत विकसित केली आहे. गव्हाणीला लागून जमिनीपासून दीड फूट उंच आडवे पीव्हीसी पाइप लावले आहेत. त्यांना विशिष्ट अंतरावर छिद्रे पाडली आहेत. पाणीपुरवठ्याच्या विहिरीवरील मोटारीला हा पाइप जोडला असून गोठा स्वच्छ करण्याच्या वेळी विशिष्ट दाबाने पाइपमधून पाणी येते. त्यामुळे दोन जनावरांच्या मधल्या जागेतून शेण निघून मधल्या नालीतून गोठ्याबाहेर संकलित होते. अशाप्रकारे कमी श्रमात गोठा स्वच्छ केला जातो. पशुचिकित्सक डॉ. सी. पी. भगवतकर व डॉ. काईट यांचे मार्गदर्शन मिळते. वडील दीपक पंधे व भाऊ गणेश यांचे मार्गदर्शन व मदत उमेश यांना होते. 

दूध उत्पादन व विक्री गाईंचे 100 लिटर व म्हशींचे 50 लिटर मिळून दररोज सुमारे 150 लिटर दूध मिळते. गाईच्या दुधाला प्रति लिटर 25 रु. तर म्हशीच्या दुधाला 40 रु. दर मिळतो. 100 लिटर दूध खासगी डेअरीला, तर 50 लिटर दुधाची घरूनच किरकोळ विक्री होते. दररोजच्या दूध विक्रीतून 4500 रुपये मिळतात. दररोजचा खर्च 2500 रु. वजा जाता 2000 रु निव्वळ नफा उरतो. 

उप-उत्पादन - जनावरांपासून मिळणारे अर्धे शेणखत शेताला उपयोगी पडते. दोन एकरात पंधे यांना यंदा वीस क्‍विंटल कापूस झाला. एक एकर सेंद्रिय पपईपासून 50 हजारांचे उत्पन्न मिळाले. उर्वरित शेणखताची विक्री होते. आतापर्यंत एक लाख रुपयांच्या शेणखताची विक्री केली आहे. शेणखताचा दर्जा चांगला असल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून त्याला मागणी आहे. रेडे आणि गोऱ्ह्यांची विक्री न करण्याचा पंधे यांचा संकल्प असून नजीकच्या माहूर येथील रेणुका देवस्थानाच्या गोरक्षण संस्थानास ते दान केले जातात. आतापर्यंत सात रेडे व दोन गोऱ्हे दान केले आहेत. 

पंधे बंधूंकडून शिकण्यासारखे काही - * पाणी, जागा व चारा यांचे योग्य नियोजन करूनच दुग्ध व्यवसाय करावा 
* दूरदृष्टी ठेवूनच चाऱ्याचे नियोजन आवश्‍यक. 
* मजूर नसल्यास स्वतः काम करण्याची तयारी ठेवावी. 
* घरपोच दुधाची विक्री व्यवस्था उभारल्यास नफा वाढतो. 
* नव्या गाई विकत आणल्यावर बदललेल्या वातावरणाचा परिणाम म्हणून प्रारंभी पुरेसे उत्पादन मिळत नाही. 
* म्हशींच्या तुलनेत गाईंची जास्त काळजी घ्यावी लागते. 
* स्थानिक बाजारात घरगुती ग्राहक म्हशीच्या दुधाला प्राधान्य देतात. 
* घरगुती ग्राहक दुधाला जास्त भाव देतात. 
* मुक्त गोठा पद्धती म्हशींपेक्षा गाईसाठी उपयुक्त. 
* शेतीविषयक साहित्य, पुस्तके वाचण्याची आवड. त्यातूनच दुग्ध व्यवसायाविषयी माहिती मिळविली. 

जास्त परिश्रम घेऊन दुधाच्या विक्रीसाठी दारोदार हिंडावे लागते. तरीही हा व्यवसाय वाढविणार आहे. जनावरांची संख्या वाढवून शहरात दुग्ध विक्री केंद्र तसेच दुग्ध प्रक्रिया उद्योग उभा करण्याचा मानस असल्याचे पंधे म्हणाले. 

संपर्क - उमेश पंधे, 9822592553 
पंधे डेअरी फार्म, भोजला, ता. पुसद, जि. यवतमाळ - 9822592553 
गिरिधर ठेंगे, (8575394868)

Wednesday, January 16, 2013

रोगांपासून वाचवा म्हशीच्या पारडांना


म्हशींच्या गोठ्यामध्ये शेण, मूत्र, सडलेला चारा इत्यादींमुळे सूक्ष्म जिवाणूंची झपाट्याने वाढ होते. त्यामुळे अनेक संक्रमणांचा आणि रोगराईचा धोका निर्माण होतो. म्हशीची पारडे आजारी पडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. आजारामुळे त्यांचा मृत्यूदर वाढू शकतो. त्यामुळे डेअरीचे भवितव्य संकटात येते. हे प्रकार टाळण्यासाठी म्हशीच्या पारड्यांचे चोख व्यवस्थापन केले पाहिजे.
म्हशीच्या वासरांमध्ये (पारडे) पहिल्या सहा महिन्यांत आणि त्यातल्या त्यात वयाच्या पहिल्या तीन महिन्यांत मृत्यूदर जास्त असतो. याचे प्रमुख कारण असे आहे की, गोठ्यातील अस्वच्छतेमुळे अनेक रोगांचे संक्रमण होते आणि कृमींच्या त्रासामुळे मृत्यूदर वाढतो. जेव्हा पारडे गोठ्यात इतरत्र चाटतात तेव्हा त्यांच्या पोटात कृमी, त्यांची अंडी आणि इतर सूक्ष्म जिवाणू प्रवेश करून अनेक प्रकारची संक्रमणे आणि आजार निर्माण करतात. हे टाळण्यासाठी स्वच्छता बाळगावी.
गोठ्यात आणि आसपास पडलेले शेण, मूत्र, कचरा वगैरे ताबडतोब दूर करून तेथे पाणी ओतून स्वच्छता करावी. सर्व वासरांना एकाच घमेल्यात दूध पाजू नये. दुसर्‍या घमेल्याची गरम पाण्याने व्यवस्थित स्वच्छता करून त्यात दूध पाजावे. उरलेले दूध दुसर्‍या पारड्यास पाजू नये. कारण त्यात पहिल्या पारड्याची लाळ मिसळलेली असते व त्यामुळे संक्रमण होऊ शकते. बिनाजोडाची गोल आकाराची कोरडी आणि स्वच्छ घमेली कल्हई केलेली किंवा ऍल्युमिनियमची घमेली दूध पाजण्यासाठी वापरावी. रिकामी घमेली प्रथम थंड पाण्याने स्वच्छ धुवावी मग त्यात गरम पाणी आणि धुण्याच्या सोड्याचे मिश्रण घालून ती स्वच्छ घासावी आणि परत गरम पाण्याने स्वच्छ घासावी. शेवटी ती उन्हात लोखंडी रॅकमध्ये उपडी (उलट) घालून चांगली कोरडी होईपर्यंत तापवून सुकवावी. दूध पाजण्याआधी एक तास आधीपर्यंत पाड्यांच्या तोंडाला दोरीची मुसकी बांधावी, दूध पाजल्यानंतर स्वच्छ कापडाने त्यांचे तोंड कोरडे करावे आणि त्यांना एक चिमूटभर मीठ चाटवावे म्हणजे त्यांना इतरत्र चाटण्याची इच्छा कमी होईल. नंतर परत एक तासापर्यंत त्यांच्या तोंडाला पुन्हा मुसकी बांधावी. यामुळे त्यांच्या इतरत्र चाटण्याच्या सवयीला पायबंद बसतो आणि त्यांना संक्रमणांचा आणि कृमीचा त्रास कमीत कमी होतो.
नाळ बांधणे
म्हैस व्यायल्यानंतर पारड्याची नाळ त्याच्या शरीरापासून एक ते दीड इंच अंतरावर आयोडीन किंवा तत्सम जंतुनाशक औषधात बुडविलेल्या दाट दोर्‍याने घट्ट बांधून उरलेला खालचा लोंबकळणारा भाग स्वच्छ ब्लेडने कापून घ्यावा. जखम भरेपर्यंत रोज जंतूनाशक औषध लावावे. यामुळे अनेक संक्रमणांपासून पारड्याचे रक्षण होईल.
चीक पाजणे
नुकत्याच जन्म झालेल्या पारड्यास अर्ध्या तासाच्या आत तिच्या (मातेचा) चिक पाजावा. त्यात गॅमा ग्लोबीलीन नावाची प्रतिपिंडे भरपूर असल्यामुळे वासराची रोगप्रतिबंधक शक्ती वाढते. त्यामुळे मृत्यूदर कमी होतो.
कृमीनाशक औषधी पाजणे
पारडाच्या आतड्यात अनेक प्रकारची कृमी होऊ शकतात. ते पाड्यांचे रक्त शोषण करतात. त्यामुळे खाल्लेला चारा व दूध त्यांच्या अंगी लागत नाही. त्यांची शरीरवाढ खुंटते म्हणून त्यांना दर तीन महिन्यांतून एकदा अलबेन्डॅझॉलसारखे कृमीनाशक औषध पाजावे.
बाह्य परजीवींचा नाश
बाह्य परजीवी जसे उवा, गोचीड, गोमाशा, पिसू वगैरे पारडांना चावतात आणि त्यांचे रक्त शोषण करतात. त्यामुळे त्या बेचैन राहतात. त्यांचे खाण्या-पिण्याकडे नीट लक्ष राहत नाही आणि त्यांना दुय्यम आजार जसे थायलेरियॅसिस, लेप्टोस्पायरोसिस, बॅबेशिओसिस वगैरे होण्याची शक्यता निर्माण होते. त्यांची वाढ खुंटते. म्हणून हे सर्व टाळण्यासाठी त्यांना रोज खरारा करावा. (अंगावर ब्रश फिरवावा) त्यांना रोज पाण्याने आंघोळ घालावी. एवढे करूनही बाह्य परजीवींचा उपद्रव झाल्यास तर त्यांच्या नाशासाठी योग्य औषध जसे सायपरमेट्रीन एक मिलिलीटर किंवा डेल्टामेट्रीन दोन मिलिलीटर प्रति लिटर पाण्यात मिसळून वेगळ्या पंपाने वासरांच्या शरीरावर फवारावे.
लसीकरण
पारडांना पावसाळ्याआधी पशूंच्या डॉक्टरांकरवी तोंडखुरी, पायखुरी रोग, घटसर्प, काळपोई आणि फर्‍या वगैरे रोगांविरुद्धच्या लसी टोचून घ्याव्यात. म्हणजे त्यांच्यात प्रतिकारशक्ती निर्माण होऊन त्यापासून त्यांचे रोगांपासून संरक्षण होईल.
- डॉ. सुनील रोकडे,
प्रमुख शास्त्रज्ञ (पशुधन उत्पादन आणि व्यवस्थापन) कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर

गाई- म्हशींमधील कासेच्या आजारावर करा उपचार

गाई, म्हशींना कास आणि सडाचे आजार झाल्यास त्यांच्या दूध उत्पादनावर परिणाम होतो. जनावरांचे आरोग्य खालावते. त्यामुळे व्यवस्थापन खर्च वाढत जातो. हे लक्षात घेऊन गाई, म्हशींच्या कासेची तपासणी करावी. आजाराची लक्षणे ओळखून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत. 

कासेचे व सडाचे आजार हे प्रामुख्याने 1) कासेच्या व सडांच्या त्वचेचे आजार, 2) सडाच्या पोकळीमधील विकार आणि सडाच्या तोंडाचे आजार या प्रकारात विभागले जातात. कास, सडाचे रोजच्या रोज निरीक्षण करावे. सड, कासेवर हात फिरवल्यास सहजासहजी आजाराची लक्षणे दिसतात. निरीक्षण करताना सडांवर ताज्या अथवा जुन्या जखमा झाल्या आहेत का हे पाहावे. अधू झालेल्या सडाचे आकारमान, जाडी या गोष्टींची इतर सडांशी तुलना करून पाहावी. सडाच्या वरच्या भागावर जखमा नसतील, सूज नसेल तर सड दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये अथवा अंगठा व पहिले बोट यामध्ये रोल करून पाहावा. यामुळे सडांची अंतर्गत पोकळीमधील विकार दिसून येतात. शंका असल्यास मधून मधून कासेची, सडांची तसेच दुधाची तपासणी पशुवैद्यकाकडून करून घ्यावी. 

1) सडांची संख्या चारपेक्षा जास्त असणे -
गाई-म्हशींमध्ये मागच्या किंवा पुढच्या सडाच्या जोडीच्या मध्ये लहान आकाराचे सड वाढलेले असतात. अशा सडांची दूध देण्याची कार्यक्षमता जनावर व्यायल्यानंतर कळून येते. अशा सडांचा धारा काढताना अडथळा निर्माण होतो. शास्त्रीयदृष्ट्या असे आढळून आले आहे, की अशा सडांचा दूध उत्पादनावर कोणताही फायदा आढळून येत नाही. 
उपचार -
अशा सडांमधून दूध येत असल्यास उपचार नाही केला तरी चालतो. मात्र सडांमधून दूध येत नसेल आणि धार काढताना अडथळा निर्माण होत असेल तर ते सड पशुवैद्यकाकडून स्थानिक पद्धतीची भूल देऊन शस्त्रक्रिया करून काढून घ्यावे. ही शस्त्रक्रिया जनावराच्या भाकड काळामध्येच करावी. 

2) इजा होऊन सड फाटणे - 
सडांवर जखमा होणे, ओरखडणे हे गाई-म्हशींच्या तुलनेने शेळ्या-मेंढ्यांमध्ये जास्त आढळून येते. कारण त्यांच्या कासेचा आकार निमुळता असतो व सडांची लांबी जास्त असते. शेळ्यांमध्ये काटेरी झुडपांमधून चरताना कासेवर व सडांवर काटेरी जखमा होतात. गोठ्यामध्ये ओबडधोबड दगडगोटे असल्यास बसताना, उठताना कासेवर, सडांवर जखमा होतात. 
उपचार -
जखम जर त्वचेच्या वरच्या भागावर असेल तर स्वच्छ पाण्यामध्ये जंतुनाशकाचे द्रावण टाकून धुऊन घ्यावी. 
जखमेवरची सडलेली त्वचा व घाण काढून घ्यावी. जखमेवर चार ते पाच दिवस प्रतिजैविके असलेले मलम लावावे. 
जखम अतिखोल असल्यास ताबडतोब जखमेवर टाके घालून घ्यावेत. टाके घातलेल्या सडामधील दूध शक्‍यतो सायफन ट्यूब टाकून काढावे. जखम संपूर्ण बरी होईपर्यंत जखमेची स्वच्छता ठेवावी व प्रतिजैविकाचे इंजेक्‍शन द्यावे. 

3) सडांवर इजा होऊन अनैसर्गिक छिद्र पडणे (टीट फिस्टुला) -
काटेरी वनस्पतींमध्ये चरताना काट्यांची इजा होणे, तार कुंपणाची इजा होणे इत्यादी धारदार व टोकदार वस्तूच्या इजेमुळे सडांवर खोलवर जखम होऊन सडाला छिद्र पडते. 
लक्षणे - 
सडांवर कापल्यासारखी खोल जखम होते, सडांवर सूज येते, जखमेतून दूध गळती होते, जखम लहान असल्यास फक्त कास भरल्यानंतर व दूध काढताना गळती होते. जखम मोठी असल्यास नेहमी जखमेतून दूध गळती होत राहते. 
उपचार - 
जखम लहान असल्यास पोटॅशिअम परमॅंगनेटच्या खड्याने छिद्रावर दाब द्यावा व जखमेची मलमपट्टी करावी. 
छिद्राचा आकार मोठा असल्यास त्यावर शस्त्रक्रिया करून घेऊन छिद्र बंद करून घ्यावे. 
अशा प्रकारची शस्त्रक्रिया जनावराच्या भाकड काळामध्ये करून घेतल्यास फायदेशीर ठरते. मात्र दुभत्या जनावरांमध्ये तातडीचा उपाय म्हणून करावी लागते. 

4) एकमेकांना जुळलेले सड असणे - 
यामध्ये दोन किंवा अधिक सड कातडीच्या भागावर एकमेकांना जुळलेले असतात. 
उपचार - अशा सडांवर छोटीशी शस्त्रक्रिया करून एकमेकांपासून मोकळे करता येतात. 

5) कास, सडांवर चामखिळीसारख्या गाठी वाढणे -
यामध्ये सडांवर व कासेवर एक किंवा एकापेक्षा जास्त गाठी वाढलेल्या असतात. याचा प्रादुर्भाव पॅपिलोमा विषाणूंमुळे होतो. अशा गाठी संसर्गजन्य असतात. याचा प्रादुर्भाव गोठ्यातील दुसऱ्या जनावरांना होतो. काही गाठी जन्मजात असतात. 
लक्षणे - 
सडांवर किंवा कासेवर चामखिळीसारख्या गाठींची वाढ झालेली दिसून येते. याचा दूध उत्पादनावर जास्त कोणताही परिणाम होत नाही. 
गाठी तडकल्यानंतर फुटून कासेवर व सडांवर जखमा होतात व धार काढताना जनावरास वेदना होतात. धारा काढताना अडथळा निर्माण होतो. 
उपचार -
गाठी मोठ्या आकाराच्या असतील तर गाठीच्या तळाशी नायलॉनचा धागा घट्ट बांधून ठेवावा. कालांतराने रक्तपुरवठा बंद होऊन गाठ गळून पडते. छोट्या आकाराच्या जास्त गाठी असतील तर पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार मलम लावावे. 
मोठ्या आकाराच्या गाठी शस्त्रक्रिया करून घेऊन काढाव्यात. अशा गाठी काढून त्यापासून लस बनवून ती जनावरास कातडीखाली टोचली असता गाठी संपूर्णपणे नाहीशा होतात. पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ येथे लस तयार करून दिली जाते. 

6) सडामध्ये दुधाचे खडे तयार होणे -
दुधातील क्षाराचा थर जमा होऊन कालांतराने त्याचे खड्यात रूपांतर होते; परंतु अशा प्रकारचा आजार दुर्मिळ आहे. 
लक्षणे - दूध काढताना अडथळा निर्माण होतो, दुधाची धार सरळ येत नाही, सडांवर दाबून पाहिले असता खडे जाणवतात. 
उपचार - 
क्षाराचे खडे लहान असल्यास दुधावाटे आपोआप बाहेर पडतात. खडे मोठे असल्यास बाहेरून सड दाबल्यास लक्षात येते. 
असे खडे चिमट्याच्या साह्याने पशुवैद्यकाकडून फोडून घ्यावेत, दुधावाटे पिळल्यास खडे बाहेर पडतात. खडा फारच मोठा असल्यास शस्त्रक्रिया करून काढावा लागतो. 

7) सडाच्या पोकळीमध्ये पडद्याची जाळी वाढणे (टीट स्पायडर) - 
यामध्ये सडाच्या अंतर्गत पोकळीमध्ये पडदा वाढलेला असतो. त्यामुळे दूध येण्यास अडथळा निर्माण होतो. हा विकार आनुवंशिक असू शकतो. सडांची अंतर्गत वाढ संपूर्णपणे झालेली नसते. सडांवर इजा होणे, गाठ वाढणे तसेच जंतुसंसर्गामुळे होऊ शकतो. 
दूध काढण्याची अयोग्य पद्धतीमुळे हा आजार होतो. 
लक्षणे - सडातून दूध येण्यास अडथळा निर्माण होतो. अडथळ्याच्या वरच्या भागावर दूध साकळलेले असते. खालच्या भागावर पोकळी असल्याचा भास होतो. काही वेळेस सडातून दूध पूर्णपणे बंद होते 
उपचार -
पडदा लहान असेल तर हडसन स्पायरल टीट नावाच्या हत्याराने काढता येतो. अडथळा मोठा असेल तर शस्त्रक्रिया करून काढावा लागतो. जनावराच्या भाकड काळामध्येच शस्त्रक्रिया करून घ्यावी. 

8) सडाच्या पोकळीमध्ये गाठ वाढणे (टीट सिर्स्टन) -
यामध्ये सडाच्या पोकळीमध्ये अनियमित आकाराची गाठ वाढलेली असते. त्यामुळे सडामधून दूध येण्यास अडथळा निर्माण होतो. दुभत्या जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणावर हा आजार दिसतो. अयोग्य पद्धतीने दूध काढल्याने हा आजार होतो. वारंवार सडांना होणाऱ्या इजा यासाठी कारणीभूत ठरतात. 
लक्षणे - आजाराची सुरवात सडाच्या एका भागावर होते, पूर्ण सडामध्ये गाठ पसरते. गाठीचा आकार तिचे स्वरूप व मूळ कारणावर अवलंबून असतो. गाठ जर सडाच्या टोकावर असेल तर आजार बरा होण्याची शक्‍यता वाढते, मात्र गाठ खूप आतल्या भागात असेल तर उपचार करणे त्रासदायक होते. गाठीमुळे दुधाची धार नीट येत नाही. 
उपचार -
गाठ लहान असेल तर छोट्या शस्त्रक्रियेने टीट ट्यूमर एक्‍सट्राक्‍टर काढून ठीक करता येते. गाठ मोठी असल्यास मोठी शस्त्रक्रिया करून काढून घ्यावी लागते. 

9) सडाच्या तोंडाचे आकुंचन होणे (कॉन्ट्राक्‍टेड स्पिंक्‍टर) - 
सडाच्या तोंडाचे आकुंचन होऊन दूध येण्यास त्रास होतो. सडाच्या तोंडावर इजा होणे, विकार आनुवंशिक असू शकतो, अतिरिक्त गाठीची तोंडाशी झालेली वाढ ही या आजाराची कारणे आहेत. 

10) कास दाह -
दूध काढण्याची अयोग्य पद्धतीमुळे कासदाह होतो. धार काढताना दूध सहजासहजी बाहेर येत नाही. सडांवर खूप दाब द्यावा लागतो 
दुधाची धार बारीक येते व सरळ येत नाही. पूर्ण दूध काढण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो. 
उपचार - 
सूज नसेल तर सड स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. सडाचे निर्जंतुकीकरण करावे. सडाच्या तोंडाच्या छिद्रामध्ये टीट प्लग हळुवारपणे आत सरकवावा. पाच ते सहा दिवसांसाठी प्लग तसाच ठेवावा, त्यामुळे तोंडाचे प्रसारण होते. विकार बरा न झाल्यास पशुवैद्यकाकडून शस्त्रक्रिया करून घ्यावी. 

11) सडाचे तोंड मोठे होणे -
सडाच्या तोंडावर तीव्र इजा झाल्याने त्या छिद्राचा आकार मोठा झालेला असतो. त्यामुळे सतत दूध गळत राहते. 
या आजारामुळे सडातून सतत दूध गळत राहते, कासदाह होतो. 
उपचार - 
सडाच्या तोंडाशी लहान आकाराच्या सुईने ल्युगॉल्स आयोडीन टोचले असता सडाच्या तोंडाचे आकुंचन होते. 

12) सडाचे तोंड बंद होणे (ब्लाईड टीट) - 
या आजाराचे कारण आनुवंशिक असू शकते. सडाच्या तोंडावर तीव्र इजा होणे, पैलारू कालवडीमध्ये सडांची वाढ नीट झालेली नसणे या कारणाने हा आजार होतो.
आजाराची लक्षणे म्हणजे अशा सडांवर तोंडाशी छिद्र नसते, सडामध्ये दूध असते मात्र दूध बाहेर येत नाही 
उपचार -
पशुवैद्यकाकडून सुईच्या साह्याने सडास छिद्र करून घ्यावे. जखम बरी होईपर्यंत जखमेवर मलम लावावे. 

... असे आहेत कास, सडांचे आजार -
1) चारपेक्षा जास्त सड असणे, एकमेकांना चिकटलेले सड, जुळलेले सड 
2) सडाच्या बाह्य भागावरील जखमा. 
3) सडांना अनैसर्गिक छिद्र पडणे, फिस्टुला तयार होणे 
4) सडांवर आणि कासेवर चामखिळीसारख्या गाठी वाढणे, सडावरच्या कातडीवर चिरा पडणे 

सडाच्या पोकळीमधील आजार -
1) पोकळीमधील अंतर्गत झालेली गाठीची वाढ 
2) मुतखड्याप्रमाणे दुधाचे खडे तयार होणे 
3) सडाच्या पोकळीमध्ये पडद्याची वाढ होणे 
4) सडांची पोकळी पूर्णतः अथवा अर्धवट बंद होणे 

सडाच्या तोंडाचे आजार - 
1) सडाच्या तोंडाचे आकुंचन पावणे, सडाच्या तोंडाचे छिद्र मोठे होणे 
2) सडाच्या तोंडाचे छिद्र फाटणे, सडाचे तोंड बंद होणे 

संपर्क - डॉ. शाहीर गायकवाड - 9004226664 
(लेखक पशुवैद्यकीय शल्यचिकित्सा विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

Sunday, January 13, 2013

दुग्ध व्यवसायातील कष्टाने दिली आर्थिक प्रगतीची संधी...

सातारा जिल्ह्यातील मसूर (ता. कऱ्हाड) येथील किशोर जगदाळे यांनी शेतीच्या बरोबरीने दुग्ध व्यवसायातही चांगला जम बसविला आहे. पशू व्यवस्थापनातील बारकावे लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने त्यांनी म्हशींची संख्या वाढवत नेत दुग्ध व्यवसाय किफायतशीर केला आहे. दुग्ध व्यवसायातील त्यांचे अनुभव मार्गदर्शक आहेत. 

सातारा जिल्ह्यातील मसूर (ता. कऱ्हाड) येथील किशोर निवृत्ती जगदाळे सात वर्षांपूर्वी स्थानिक बॅंकेत पिग्मी एजंट म्हणून काम करत होते. यासाठी त्यांना मसूर गावासह कोरेगाव तालुक्‍यातील गावांमध्ये रोजची सुमारे 30 किलोमीटरची फिरती व्हायची. त्यातून महिन्याकाठी चार हजारांचा मोबदला मिळायचा; परंतु स्वतःची शेती विकसित करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. नोकरीच्या फिरतीमधून त्यांना शेतीमधील पीक बदल आणि दुग्ध व्यवसायाची माहिती लोकांकडून मिळत गेली. या माहितीतून त्यांनी सन 2003 पासून वडिलोपार्जित शेतीच्याबरोबरीने टप्प्याटप्प्याने दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. एकाचवेळी 10 ते 15 म्हशी खरेदी न करता पहिल्यांदा एका म्हशीपासून त्यांनी दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. पुढे आर्थिक जोखमीचा अंदाज घेत त्यांनी एकीच्या दोन, दोनच्या चार, चारच्या आठ या सूत्राने गोठ्यात म्हशी वाढविल्या. म्हशींपासून मिळणारे शेण न विकता चांगल्या पद्धतीने शेणखत तयार करून स्वतःच्या शेतीला वापरले, त्यामुळे जमिनीचा कसही सुधारला, त्यामुळे पीक उत्पादनही वाढले. गेल्या सात वर्षांत दुग्ध व्यवसायात प्रगती करताना त्यांनी खपेल एवढ्या दुधाची घरातूनच हातविक्री केली. या दुग्ध व्यवसायातून आता त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिरावले आहे. 

टप्प्याटप्प्याने वाढविल्या म्हशी - 
शेती आणि दुग्धोत्पादनाबाबत श्री. जगदाळे म्हणाले, की माझ्याकडे वडिलोपार्जित साडेचार एकर शेती आहे. शेतीच्या बरोबरीने घरी दोन बैल, दोन म्हशी आणि एक गाय होती. त्यामुळे जनावरांच्या व्यवस्थापनाची माहिती होती. शेतीच्या बरोबरीने दुग्ध व्यवसाय करायचा असल्याने भांडवलाचा प्रश्‍न होता. हाती घेतलेला व्यवसाय टिकावा आणि वाढावा या हेतूने सुधारित तंत्रज्ञानाची माहिती घेतली. दुग्ध व्यवसायाला सुरवात करताना मुऱ्हा आणि मेहसाणा जातीच्या दोन म्हशी विकत घेतल्या. त्याबरोबरीने वडिलांनी सांभाळलेल्या म्हशींचेदेखील चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले. गोठ्यातच रेडक्‍यांचे चांगले नियोजन केले. पुढील टप्प्यात गोठ्यात चांगल्या म्हशी ठेवण्याच्यादृष्टीने भांडवल गोळा करून चार मुऱ्हा म्हशी विकत घेतल्या. जनावरांच्या बाजारात खरेदीचा अनुभव नसल्याने पहिल्यांदा म्हैस खरेदीमध्ये फसवणूक झाली, त्यामुळे दूध उत्पादन घटले; परंतु न डगमगता अभ्यासू पशुपालक, पशुतज्ज्ञ तसेच दै. "ऍग्रोवन'मध्ये आलेल्या पशुपालनासंबंधी लेखांच्या वाचनातून म्हशींचे व्यवस्थापन सुधरविले. या अभ्यासाचा व्यवसायात उपयोग केल्याने पुढे म्हशींची निवड करताना फसगत झाली नाही. म्हैस खरेदीसाठी कोणतेही कर्ज न घेता एकीच्या दोन, दोनच्या चार, चारच्या आठ म्हशींच्या पैदाशीतून गोठ्याचा विस्तार वाढवला. शेती तसेच पशुपालनाचा व्याप वाढल्याने नोकरी सोडून दिली. सध्या माझ्याकडे मुऱ्हा जातीच्या 11, मेहसाणा जातीची एक आणि मुऱ्हा जातीचा संकर केलेल्या तीन म्हशी अशा एकूण 15 म्हशी, चार रेडक्‍या, एक मुऱ्हा जातीचा रेडा आहे. 

म्हशींचे व्यवस्थापन -
म्हशींच्या व्यवस्थापनाबाबत श्री. जगदाळे म्हणाले, की सुरवातीपासून स्वभांडवल उभारणीच्या मूलमंत्राचा उपयोग मला चांगला झाला, त्यामुळे केवळ गोठ्याच्या नूतनीकरणासाठी बॅंकेचे 65 हजारांचे साहाय्य घ्यावे लागले. त्यातून तीन टप्प्यांत गोठा व मजुरांना निवाऱ्याची सोय केली आहे. बॅंकेची नोकरी सोडल्याने मला अडीच लाख रुपये इतका फंड मिळाला, त्यातून ट्रॅक्‍टरची खरेदी केली. वैरणीसाठी कुट्टी मशिन घेतले आहे. गोठ्यातील व्यवस्थापनासाठी दोन मजूर आहेत. गोठ्याची इमारत राहत्या घराइतकी सुसज्ज ठेवली आहे. तीन टप्प्यांत 44 फूट बाय 44 फूट आकाराचा गोठा बांधला आहे. गोठ्यात दोन फूट रुंद आणि तीन फूट उंचीची गव्हाण आहे. गव्हाणीपासून मलमूत्राच्या नाल्यापर्यंत साधारण 14 फुटांचे अंतर राखले आहे. दोन म्हशींतील अंतर पाच फुटांचे राखून दावण केली आहे. 

गोठ्यातील व्यवस्थापन पहाटे साडेचारला सुरू होते. शेण बाजूला केल्यानंतर प्रत्येक म्हशीला वीस किलो ओला व वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी दिली जाते. दूध उत्पादनानुसार म्हशींना पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार पशुखाद्य मिश्रण दिले जाते. रेडकांना वयानुसार चारा व पशुखाद्य देतो. चाऱ्याच्या बरोबरीने गहू भुश्‍श्‍याचा वापर करतो. सकाळी सहा वाजेपर्यंत दूध काढणी पूर्ण होते. त्यानंतर म्हशींना गव्हाणीत पाणी पिण्यासाठी दिले जाते. जनावरांच्या पाण्यासाठी शेतातील विहिरीतून दोन हजार फूट पाइपलाइनने बांधीव टाकीत पाणी सोडले आहे. त्या टाकीतील पाणी योग्य उतार देऊन सायफन पद्धतीने गव्हाणीत सोडले जाते. सकाळी दूध काढल्यानंतर जनावरे व गोठा स्वच्छ केला जातो. दुपारी साडेतीनच्या दरम्यान मजूर गोठा स्वच्छ करतात. चार वाजता ठरलेल्या प्रमाणानुसार चारा व खाद्यमिश्रण दिले जाते. त्यानंतर पाचपर्यंत दूध काढणी पूर्ण होते. 

एका मुऱ्हा म्हशीपासून प्रति दिन सरासरी 12 लिटर, मुऱ्हा संकर असलेल्या एका म्हशीपासून दहा लिटर आणि मेहसाणा म्हशीपासून प्रति दिन 12 लिटर दूध मिळते. म्हशींच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी खासगी पशुवैद्यकाचा सल्ला घेतला जातो. वेळेवर लसीकरण केले जाते, तसेच योग्यवेळीच रेतन केले जाते. 

सद्य:स्थितीत प्रति दिन सरासरी 100 ते 120 लिटर दूध उत्पादन होते. त्यापैकी खपेल एवढ्या दुधाची घरातूनच हातविक्री होते. दुधाची गुणवत्ता चांगली असल्याने रतीब आणि ठरलेली गिऱ्हाईके घरी येऊन दूध खरेदी करतात. हातविक्रीच्या दुधातून नफ्याची अपेक्षा न ठेवता बाजारभावापेक्षा दोन रुपये कमी दराने विक्रीचे धोरण ठेवले आहे, त्यामुळे दुधाला चांगली मागणी असते. सध्या प्रति दिन 40 लिटर दुधाची हातविक्री होते. दुधाच्या हातविक्रीचे काम पत्नी सौ. वंदना, मुले श्‍वेता व शुभम पाहतात. हातविक्रीतून उरलेले दूध गावातील खासगी डेअरीस दिले जाते. डेअरीमध्ये फॅटच्या हिशेबाने दर मिळत असल्याने चांगला नफा मिळतो. शेतातील व्यवस्थापनासाठी वडिलांची मदत होते. 

चाऱ्याचे नियोजन - 
साडेचार एकरांपैकी गोठा, वैरण ठेवण्यासाठी आणि दळणवळणासाठी 10 गुंठे जागा ठेवली आहे. उरलेल्या क्षेत्रात उसाबरोबर सोयाबीन, भुईमूग, चारापिकांची लागवड केली जाते. चाराटंचाईच्या काळात काही गुंठ्यांतील उसाचा वापर चाऱ्यासाठी केला जातो. काही वेळेस चाऱ्यासाठी ऊस विकत घेतला जातो. परिसरातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन आणि गव्हाचे सुमारे 25 ट्रेलर भुसकट गोळा करून ठेवले आहे. गरजेनुसार कडबा विकत घेतला जातो. जवळच्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर सुमारे सहा महिने दररोज साधारण पाचशे रुपयांचे ऊसवाढे चाराकुट्टीसाठी विकत घेतले जातात. म्हशींना चारा कुट्टी करून दिला जातो. 

गेल्या सात वर्षांत दूध व्यवसायातून श्री. जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळाले. दिवसेंदिवस वाढलेले खतांचे दर व मजुरीवर मात करीत त्यांनी स्वकष्टातून शेती समृद्ध करण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. स्वतःच्या शेतीबरोबर दुसऱ्याची दोन एकर शेती त्यांनी निम्म्या हिश्‍श्‍याने कसण्यास घेतली आहे. या वर्षी त्यांनी दीड एकरावर हळदीची लागवड केली आहे. सव्वा दोन एकर ऊस लागवडीतून 125 टन उत्पादन मिळते. गोठ्यामुळे त्यांच्याकडे शेणखत मोठ्या प्रमाणात तयार होते; परंतु या शेणखताची त्यांनी आतापर्यंत एकदाही विक्री केलेली नाही. सर्व शेणखत ते स्वतःच्या शेतीसाठी वापरतात. यामुळे जमिनीचा पोत सुधारून पीक उत्पादन वाढले आहे. 

श्री. जगदाळे यांची दुग्ध व्यवसायातील उलाढाल.... 
जून 2011 ते डिसेंबरअखेरची मिळकत ः 
1) 8400 लिटर दुधाच्या हातविक्रीतून ः दोन लाख 68 हजार 800 रुपये (दर प्रति लिटर 32 रुपये). 
2) डेअरीला 14 हजार 700 लिटर दुधाच्या विक्रीतून ः चार लाख 11 हजार 600 रुपये (दर प्रति लिटर सरासरी 28 रुपये). 
3) आतापर्यंत एकूण व्यवस्थापन खर्च ः तीन लाख 83 हजार 400 रुपये (प्रति दिन सरासरी 1800 रुपये). 

संपर्क - श्री. जगदाळे - 9850813601